मुंबई, दिनांक 13 फेब्रुवारी ः हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने येथील मुंबई फुटबॉल एरीनावर मुंबई सिटी एफसीला 2-0 असे हरविले. दोन्ही गोल पुर्वार्धात झाले. चौथ्याच मिनिटाला रॉलीन बोर्जेसने खाते उघडले, तर नायजेरीयाच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याने यंदाच्या मोसमातील 12वा गोल नोंदवित गोल्डन बुटच्या शर्यतीत आघाडी घेतली.
या विजयासह नॉर्थइस्ट युनायटेडने बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान भक्कम केले. गुवाहाटीत मुंबईने एकमेव गोलने बाजी मारली होती. या पराभवाची नॉर्थइस्टने दुप्पट गोल करीत परतफेड केली. त्यामुळे समान गुण असूनही त्यांना गुणतक्त्यात मुंबईला मागे टाकता आले. नॉर्थइस्ट युनायटेडने 16 सामन्यांत सातवा विजय मिळविला असून सहा बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 27 गुण झाले. मुंबईचेही 27 गुण आहेत.
मुंबईला 16 सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला असून आठ विजय व तीन बरोबरींसह त्यांचे 27 गुण आहेत. यात दोघांचा गोलफरक चार (21-17) असा समान आहे. नॉर्थइस्टने चारवरून दोन क्रमांक झेप घेत दुसरे स्थान गाठले. मुंबईची एक क्रमांक घसरण झाली. बेंगळुरू एफसी 15 सामन्यांतून 31 गुणांसह आघाडीवर आहे.
नॉर्थइस्टने सुरवात धडाकेबाज केली. चौथ्याच मिनिटाला त्यांनी खाते उघडले. किगन परेराने डावीकडून जोरदार घोडदौड केली. त्याने रॉलीन बोर्जेसला अप्रतिम पास दिला. बोर्जेसला बरीच मोकळीक मिळाली, मग त्याने नेटच्या डाव्या कोपऱ्यात फटका मारत लक्ष्य साधले.
नॉर्थइस्टचा दुसरा गोल 33व्या मिनिटाला झाला. यावेळी उजवीकडून चाल रचण्यात आली. फेडेरीको गॅलेगोने रिगन सिंगला पास दिला. रिगनने पलिकडील बाजूला असलेल्या ओगबेचे याच्या दिशेने चेंडू मारला. ओगबेचेने गुडघ्याने स्पर्श करीत चेंडूला नेटची दिशा दिली.
पुर्वार्धात नवव्या मिनिटाला मुंबईची बरोबरीची संधी थोडक्यात हुकली. अरनॉल्ड इसकोने रॅफेल बॅस्तोसला पास दिला. उजवीकडे बॉक्सलगत बॅस्तोसला संधी होती, पण त्याने मारलेला चेंडू बारच्या वरील भागाला लागून बाहेर गेला.
अकराव्या मिनिटाला पॅनागिओटीस ट्रीयाडीसने डावीकडून मारलेल्या चेंडूवर बोर्जेसने उडी घेतली, पण त्याने मारलेला चेंडू थेट अमरींदर सिंग याच्या हातात गेला. पंधराव्या मिनिटाला ओगबेचेने मारलेला चेंडू अमरींदरने कसाबसा अडविला. विसाव्या मिनिटाला ट्रीयाडीसच्या प्रयत्नातही अचूकता नव्हती.
तेवीसाव्या मिनिटाला सौविक चक्रवर्तीने उजवीकडून मारलेल्या चेंडूवर रॅफेल बॅस्तोसने हेडिंग केले, पण नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमारने चेंडू आरामात अडविला.
उत्तरार्धाच्या अखेरीस मुंबईचे काही प्रयत्न फसले. 71व्या मिनिटाला इसोकोच्या पासवर मोडोऊ सौगौ फिनिशिंग करू शकला नाही. 75व्या मिनिटाला कॉर्नरवर बॅस्तोसने मारलेला फटका स्वैर होता. 79व्या मिनिटाला इसोकोचा फटका पवनच्या डोक्यावरून गोलपोस्टला लागला.