भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार 24 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे पार पडली. या सभेत जय शहा यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन, आयसीसीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले आहे. सभेमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. आपण या लेखात बघणार आहोत बीसीसीआयच्या सभेतील टॉप 10 महत्त्वाच्या बाबी.
1) आयपीएल 2022 मध्ये असणार 10 संघ –
आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयने स्पष्ट केले की आयपीएल 2022 मध्ये 10 संघ असतील. बीसीसीआयने हे देखील स्पष्ट केले की कालावधी कमी असल्यामुळे 2021 मध्ये 8 संघासोबतच आयपीएल स्पर्धा होणार आहे.
2) प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंना दिले जाणार उत्तम मानधन –
वार्षिक सर्वसाधारण सभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार, पुरुष व महिला खेळाडूंना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये योग्य मानधन दिले जाईल. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात प्रथम श्रेणी खेळाडूंचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
3) राजीव शुक्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष –
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला यांची बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. शुक्ला उत्तराखंडचे माहीम वर्मा यांची जागा घेतील. बैठकीमध्ये सौरव गांगुली यांना अध्यक्ष पदावर कायम ठेवण्यात आले आहे.
4) ऑलम्पिकमध्ये क्रिकेट खेळण्याबाबत केले समर्थन –
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीशी सल्लामसलत करून 2028 ऑलम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत बीसीसीआयने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
5) जय शहा यांची आयसीसीमध्ये प्रतिनिधी म्हणून निवड –
वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार जय शहा हे आयसीसीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधी असतील.
6) बीसीसीआयमधून केपी राव यांचे निलंबन-
बिहार संघाचे माजी कर्णधार केपी राव यांची बीसीसीआय मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. राव प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये संचालनाचे काम करत होते, मात्र कोरना काळात त्यांनी समाधानकारक कामगिरी न केल्यामुळे त्यांची हाकालपट्टी करण्यात आली.
7) पंचांच्या निवृत्तीचे वय वाढवले –
बीसीसीआयचे करारबद्ध पंच व स्कोरर यांचे निवृत्तीचे वय 55 वरून 60 करण्यात आले आहे.
8) बीसीसीआय 39 करोड डॉलरचे नुकसान उठवण्यास तयार –
बीसीसीआयने स्पष्ट केले की पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकमध्ये, भारत सरकारकडून जर करमाफी करण्यात आली नाही तर बीसीसीआय 39 करोड डॉलरचे नुकसान उठवण्यास तयार आहे.
9) सौरव गांगुली करत असलेल्या जाहिरातींबद्दल चर्चा करण्यात आली नाही –
सौरव गांगुली यांच्यावर बीसीसीआयच्या स्पॉन्सर घटकांच्या विरोधात जाहिराती करण्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र या संदर्भात बैठकीमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही .
10) पुढील वर्षी होऊ शकते महिलांची कसोटी मालिका –
बीसीसीआयने स्पष्ट केले की पुढील वर्षी दोन सामन्यांसाठी महिलांची कसोटी मालिका होऊ शकते, मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी काय करू मग? सोडून टाकू सगळं?’, केएल राहुलला दुसऱ्या कसोटीत संधी न दिल्याने मिम्स व्हायरल
स्मिथची प्रतिक्षा आणखी वाढली! ऑस्ट्रेलियात असून ‘एवढे’ महिने भेटला नाही पत्नीला
“अजिंक्य स्वभावाने जरी शांत दिसत असला तरी तो आक्रमक कर्णधार”, पाहा कोणी केलंय हे विधान