क्रिकेटमध्ये कमी वयात जर पदार्पण करणाऱ्या खेळाडूची चर्चा होते, तेव्हा सर्वप्रथम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव घेतले जाते. सचिनने 16 वर्षे 205 दिवसांच्या वयात आपले कसोटी पदार्पण केले होते. तसेच, तो भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू होता. तरीही तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल, की भारतीय महिला क्रिकेटमध्ये 9 खेळाडू अशा आहेत, ज्यांनी 17 पेक्षा कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
पुरुष क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू कुवेतचा मीत भवसार आहे. त्याने 14 वर्षे 211 दिवसाच्या वयात मालदीव्जविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पाकिस्तानचे हसन रझा यांच्या नावावर सर्वात कमी वयात कसोटीत पदार्पण करण्याचा विक्रम आहे. त्याने 14 वर्षे 227 दिवसांच्या वयात 24 ऑक्टोबर, 1996मध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. सर्वात कमी वयात वनडेत पदार्पण करण्याचा विक्रमही हसनच्या नावावर आहे. त्यांनी 14 वर्षे 233 दिवसांच्या वयात झिंबाब्वेविरुद्ध पदार्पण केले होते.
महिला क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी सर्वात युवा खेळाडू ही जर्सीची निया ग्रेग आहे. तिने केवळ 11 वर्षे 40 दिवसांच्या वयात फ्रांसविरुद्ध आपले पदार्पण केले होते. महिला कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये हा विक्रम पाकिस्तानची सज्जीदा शाहच्या नावावर आहेत. तिने कसोटीत 12 वर्षे 178 दिवसांच्या आणि वनडेत 12 वर्षे 171 दिवसांच्या वयात आयर्लंडविरुद्ध खेळताना हा विक्रम केला होता.
चला तर मग जाणून घेऊया त्या 10 भारतीय खेळाडूंविषयी, ज्यांनी 17 पेक्षा कमी वयात क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
17 पेक्षा कमी वयात पदार्पण करणारे 10 भारतीय क्रिकेटपटू- 10 Indian Cricketers Debut before 17 Years Record
1. सचिन तेंडुलकर (16 वर्षे आणि 205 दिवस)
भारतीय संघाचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पुरुष क्रिकेटमधील एकमेव असा फलंदाज आहे, ज्याने 17 वर्षांपेक्षा कमी वयात आपले पदार्पण केले होते. त्याने 15 नोव्हेंबर, 1989 साली कराची येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 16 वर्षे 205 दिवसांच्या वयात हा विक्रम केला होता. वनडे क्रिकेटमध्ये सचिनने हा विक्रम 16 वर्षे 238 दिवसांच्या वयात केला होता. तो 18 डिसेंबर, 1989 साली गुजरांवाला येथे पाकिस्तानविरुद्ध आपले वनडे पदार्पण केले होते.
2. गार्गी बॅनर्जी (14 वर्षे आणि 165 दिवस)
गार्गी बॅनर्जी (Gargi Banerji) भारतीय संघाकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी महिला खेळाडू आहे. तिने 1 जानेवारी 1978 साली कोलकातामध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे विश्वचषकात केवळ 14 वर्षे आणि 165 दिवसांच्या वयात हा विक्रम आपल्या नावावर केला होता. गार्गीने केलेला हा विक्रम मागील 42 वर्षांपासून कोणीही मोडू शकले नाही.
3. शेफाली वर्मा (15 वर्षे आणि 239 दिवस)
24 सप्टेंबर, 2019 साली सूरत येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) केवळ 15 वर्षे आणि 239 दिवसांच्या वयात आपले आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ती भारताकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी खेळाडूदेखील बनली आहे. याव्यतिरिक्त भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारी युवा फलंदाजदेखील आहे.
4. रजनी वेणुगोपाल (15 वर्षे आणि 283 दिवस)
रजनी वेणुगोपालने (Rajani Venugopal) 7 मार्च 1985 साली कटक येथे न्यूझीलंडविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. तसेच सर्वात कमी वयात म्हणजेच 15 वर्षे आणि 283 दिवसांच्या वयात कसोटी पदार्पण करणारी भारतीय महिला बनली होती. यानंतर 15 मार्च 1985 साली त्याने न्यूझीलंडविरुद्धच पटनामध्ये 15 वर्षे आणि 291 दिवसांच्या वयात आपले वनडे पदार्पण केले होते.
5. तिरुष कामिनी (16 वर्षे आणि 136 दिवस)
13 डिसेंबर 2006 साली जयपूर येथे तिरुष कामिनीने (Thirush Kamini) पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकात 16 वर्षे आणि 136 दिवसांच्या वयात आपले वनडे पदार्पण केले होते. भारताकडून वनडेत पदार्पण करणारी तिसरी सर्वात युवा महिला खेळाडू आहे.
6. रिचा घोष (16 वर्षे आणि 137 दिवस)
12 फेब्रुवारी 2020 साली मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध रिचा घोषने (Richa Ghosh) 16 वर्षे आणि 137 दिवसांच्या वयात आपले टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी ती दुसरी सर्वात युवा खेळाडूही बनली होती.
7. नीलिमा जोगळेकर (16 वर्षे आणि 184 दिवस)
1 जानेवारी 1978 साली कोलकाता येथे विश्वचषकाच्या सामन्यातून नीलिमा जोगळेकरने (Nilima Joglekar) इंग्लंडविरुद्ध 16 वर्षे आणि 184 दिवसांच्या वयात वनडेत आपले पदार्पण केले होते. याच सामन्यात गार्गी बॅनर्जीने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. जो आजही कायम आहे.
8. स्नेहा दीप्ती (16 वर्षे आणि 204 दिवस)
स्नेहा दीप्तीने (Sneha Deepthi) 2 एप्रिल 2013 मध्ये बडोदा येथे बांगलादेशविरुद्ध 16 वर्षे आणि 204 दिवसांच्या वयात आपले आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या 10 दिवसांनंतर अहमदाबाद येथे बांगलादेशविरुद्ध 16 वर्षे आणि 214 दिवसांच्या वयात आपले वनडे पदार्पण केले होते.
9. मिताली राज (16 वर्षे आणि 205 दिवस)
भारतीय क्रिकेट संघाची महान फलंदाज आणि दिग्गज कर्णदार मिताली राजने (Mithali Raj) 26 जून 1999 साली मिल्टन केन्स येथे आयर्लंडविरुद्ध 16 वर्षे आणि 205 दिवसांच्या वयात आपले वनडे पदार्पण केले होते. तरी मिताली मागील 21 वर्षांपासून भारतीय संघाकडून खेळत आहे.
10. स्म्रीती मंधना (16 वर्षे आणि 261 दिवस)
भारतीय संघाची दिग्गज महिला फलंदाज स्म्रीती मंधानाने (Smriti Mandhana) 5 एप्रिल 2013 साली बडोदा येथे बांगलादेशविरुद्ध 16 वर्षे आणि 261 दिवसांच्या वयात आपले आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते. याच्या 5 दिवसांनंतरच अहमदाबादमध्ये 10 एप्रिल 2013 साली स्म्रीतीने बांगलादेशविरुद्ध 16 वर्षे आणि 266 दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या फलंदाजीने सर्वांना भूरळ पाडणारे जगातील ३ धडाकेबाज खेळाडू
-वनडेत धोनीने त्या ३ धडाकेबाज खेळी करूनही भारताच्या पारड्यात आले नाही यश
-सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात मैदान गाजवत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज