आज विंडीजचा महान माजी फलंदाज शिवनारायन चंद्रपाॅलचा ४८ वा वाढदिवस. विंडीजकडून हा खेळाडू तब्बल २१ वर्ष कसोटी क्रिकेट खेळला.
कसोटी क्रिकेटमध्ये १६४ सामन्यात ११८६७ धावा या खेळाडूने केल्या. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८व्या स्थानी असणाऱ्या या खेळाडूच्या वाट्याला मात्र म्हणावे असे प्रेम कधीच आले नाही.
अशा या महान खेळाडूबद्दल काही माहित नसलेल्या खास गोष्टी-
१. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा शेवटचा कसोटी सामना हा शिवनारायन चंद्रपाॅलचा १५०वा कसोटी सामना होता. त्यामुळे या सामन्यात चंद्रपाॅललाही विशेष सन्मानित करण्यात आले होते.
२. चंद्रपाॅल हा त्याच्या विचित्र स्टाॅंन्ससाठी ओळखला जात असे. त्या स्टाॅंन्सला क्रॅब स्टाॅन्स म्हणतात.
३. विंडीजकडून १०० कसोटी खेळणारा चंद्रपाॅल हा पहिला भारतीय वंशाचा क्रिकेटर होता.
४. चंद्रपाॅलने दोन वेळा कसोटीत नाबाद २०३ धावा केल्या. एकदा त्याने दक्षिण आफ्रिका तर दुसऱ्यांदा बांगलादेशविरुद्ध त्याने हा कारनामा केला. कसोटी कारकिर्दीतील हीच त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली.
५. चंद्रपाॅल हा त्याच्या बचावात्मक खेळासाठी ओळखला जात असे. परंतु त्याने २००३मध्ये कसोटीत चक्क ६९ चेंडूत शतकी खेळी केली होती. त्यावेळी तो कसोटीत वेगवान शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरा होता.
६. सर्वाधिक वेळा कसोटीत नाबाद शतक करण्याचा विक्रम चंद्रपाॅलच्या नावावर आहे. त्याने ३० शतकांपैकी १८वेळा नाबाद रहाण्याचा पराक्रम केला आहे.
७. एक फलंदाज म्हणुन चंद्रपाॅल हा अनेक वेळा आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे.
८. चंद्रपाॅलने २००५-०६मध्ये १४ कसोटी आणि १६ वनडेत विंडीजचे नेतृत्व केले.
हेही वाचा- गोष्ट वेस्ट इंडिजच्या अशा क्रिकेटरची, जो कायमच संघाचा तारणहार ठरला!