– अनिल भोईर
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आयपीएल २०२१ चा उत्तरार्ध खेळला जात असून, स्पर्धा आता अधिकच रोमांचक वळणावर आली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स व रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ प्रत्येकी आठ सामने जिंकून प्ले ऑफसाठी पात्र होण्याच्या अगदी नजीक आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या नावापुढे पात्र असा शिक्का लागलेला नाही. सर्व संघांनी आतापर्यंत प्रत्येकी १०-१० सामने खेळले आहेत. याचा अर्थ सर्व संघ आणखी चार सामने खेळतील. केवळ दोन विजय मिळवल्याने सनरायझर्स हैदराबाद या प्ले ऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडला. प्ले ऑफसाठी ८ पैकी ७ संघात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज आपण याच प्लेऑफच्या समीकरणांबाबत जाणून घेऊया.
चेन्नई सुपर किंग्स-
सामने १० (गुण १६)
चेन्नई सुपर किंग्सला प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ एका सामन्यात विजय मिळवावा लागेल. यदाकदाचित त्यांनी उर्वरित सर्व सामने गमावले व इतर आणखी कोणत्या संघांचे १६ गुण झाले तरी, नेट रनरेटच्या निकषावर त्यांना अंतिम चारमध्ये प्रवेश करण्याची संधी असेल. तरीही, विजय मिळवून दिमाखात प्ले ऑफ्समध्ये जाण्याचा चेन्नई प्रयत्न करेल.
दिल्ली कॅपिटल्स-
सामने १० (गुण १६)
चेन्नईप्रमाणेच दिल्ली कॅपिटल्सला देखील प्ले ऑफ्समध्ये जाण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. तेदेखील चारही सामन्यात पराभूत झाले तरी, पुन्हा त्यांना प्लेऑफ्स प्रवेशासाठी इतर संघाच्या कामगिरीवर व नेट रनरेटच्या भरवशावर राहावे लागेल. दिल्लीचा रनरेट सध्या उत्कृष्ट असल्याने कोलकाता, पंजाब, राजस्थान व मुंबई यांपैकी कोणतेही ३ संघ किमान १ सामना हरल्यास दिल्ली आपोआप प्ले ऑफ्ससाठी पात्र होईल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर-
सामने १० (गुण १२)
विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने उर्वरित ४ पैकी ३ सामने जिंकले तर १८ गुणांसह प्लेऑफ्ससाठी पात्र होतील. मात्र, २ विजय व २ पराभव झाल्यास १६ गुणांस चांगल्या नेट रनरेटच्या आधारे किंवा कोलकाता, पंजाब, राजस्थान व मुंबई यांच्यापैकी कोणतेही ३ संघ किमान १ सामना हरल्यास आरसीबी प्ले ऑफ्ससाठी पात्र होईल. मात्र, ते उर्वरित ४ पैकी केवळ १ सामना जिंकल्यास त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवावे लागेल.
कोलकाता नाईट रायडर्स-
सामने १०, (गुण ८)
दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी सर्व सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. मात्र, तीन विजय व एका सामन्यात पराभूत झाल्यास त्यांचे १६ गुण होतील. त्यानंतर नेट रनरेटच्या आधारे किंवा राजस्थानचा १ व मुंबईचा १ पराभव झाल्यास ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
पंजाब किंग्स-
सामने १० (गुण ८)
जय पराजयाच्या नावेवर हेलकावे खात असलेल्या पंजाब किंग्सला प्ले ऑफ्स फेरी गाठण्यासाठी उर्वरित ४ पैकी ४ सामने जिंकावेच लागतील. १६ गुणांसह चांगल्या नेट रनरेटच्या आधारे व राजस्थानचा १ सामन्यात पराभव झाल्यास ते प्ले ऑफ्ससाठी पात्र होतील. उर्वरित ४ पैकी ३ सामने जिंकल्यास नेट रनरेट व इतर सामन्याच्या निकालावर त्यांना अवलंबून राहावे लागेल.
राजस्थान रॉयल्स-
सामने १० (गुण ८)
सलग दोन पराभव झाल्याने राजस्थान रॉयल्सला उर्वरित ४ पैकी ४ सामने जिंकावे लागतील. १६ गुणांस चांगल्या नेट रनरेटच्या आधारे व पंजाबचा १ सामन्यात पराभव झाल्यास त्यांना प्ले ऑफ्ससाठी पात्र होण्याची संधी असेल. उर्वरित ४ पैकी ३ सामने जिंकल्यास नेट रनरेट व इतर सामन्याच्या निकालावर त्यांची घोडदौड ठरेल.
मुंबई इंडियन्स-
सामने १० (गुण ८)
गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचा उत्तरार्ध निराशाजनक ठरत आहे. प्ले ऑफ्समध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सला उर्वरित ४ पैकी ४ सामने जिंकावे लागतील. १६ गुणांस चांगल्या नेट रनरेटच्या आधारे व कोलकताचा १ सामन्यात पराभव झाल्यास ते प्ले ऑफ्ससाठी पात्र होतील. उर्वरित ४ पैकी ३ सामने जिंकल्यास नेट रनरेट व इतर सामन्याच्या निकालावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.