गोल्ड कोस्ट | ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला टेबल टेनिसमध्ये तिसरे पदक मिळाले आहे. मनिका बत्रा आणि मौमा दास या जोडीने टेबल टेनिसच्या महिला दुहेरीमध्ये रौप्य पदक मिळवले आहे.
भारताच्या मनिका बत्रा आणि मौमा दास या जोडीला अंतिम सामन्यात सिंगापूरच्या फेंग तियानवेई आणि यु मेंग्यू जोडीने पराभूत केले. त्यामुळे मनिका आणि मौमा यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
फेंग आणि मेंग्यू या दोघींनीही सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला होता. त्यांनी मनिका आणि मौमा या भारतीय जोडीला ५-११, ४-११, ५-११ असे तीन गेममध्ये पराभूत करून सामना ०-३ ने जिंकला आणि सुवर्णपदकही पटकावले.
याआधी याच स्पर्धेत मनिकाने भारताला सिंगापूरविरुद्ध झालेल्या महिला सांघिक स्पर्धेत एकेरीत सामन्यात विजय मिळवत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. जागतिक क्रमवारीत 58 व्या स्थानावर असलेल्या बत्रासाठी हे आजपर्यंतचे सगळ्यात मोठे यश आहे.
भारताला २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये ३ पदके मिळाली आहेत. यात महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावले आहे तर आज मनिका बत्रा आणि मौमा दास यांनी महिला दुहेरीत रौप्य पदक मिळवले आहे.
भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ मध्ये ४२ पदके मिळवली आहेत. यात १७ सुवर्णपदके, ११ रौप्यपदके आणि १४ कांस्यपदकांचा समावेश आहे.