क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडू आपल्या विचित्र हरकतींसाठी लक्षात राहतात. कोणाची हेअर स्टाईल, कोणाची कपड्यांची पद्धत. याचबरोबर काही खेळाडू आपल्या क्रिकेट साधनांसाठी देखील प्रसिद्ध झाले. पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती, अशी अफवा उठली. तर गिलख्रिस्टने २००७ वर्ल्डकप अंतिम सामन्यात ग्लव्हजमध्ये स्कॉश बॉल लपविला होता, अशा अनेक गोष्टी क्रिकेट जगतात सांगितल्या जातात.
२०१० आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना, ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडन याने ‘मुंगूस बॅट’ ( Mongoose Bat ) या अनोख्या बॅटचा वापर केलेला. साधारण क्रिकेट बॅटपेक्षा अत्यंत वेगळ्या आकाराची ही बॅट होती. त्यावेळी या बॅटने अनेक वृत्तपत्रांचे मथळे लिहिले गेले होते.
परंतु, क्रिकेटमध्ये ही अशी वेगळ्या पद्धतीची बॅट वापरायची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी देखील एक वेगळ्या पद्धतीची बॅट क्रिकेट जगताने पाहिली होती. योगायोगाने, ती बॅट सुद्धा एका ऑस्ट्रेलियननेच वापरलेली. हा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली ( Dennis Lillee )
संपूर्ण क्रिकेट विश्वात आपल्या आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजीसाठी डेनिस लिली प्रसिद्ध होते. डेनिस लिली हे नाव एकूण अनेक खेळाडूंची घाबरगुंडी उडत. परंतु एकदा गोलंदाजीची दहशत असणारा हा खेळाडू आपल्या बॅट साठी प्रसिद्ध झाला.
१९७९ मध्ये इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. पहिली कसोटी पर्थच्या वाका मैदानावर होती. वाकाची खेळपट्टी ही जगातील सर्वात वेगवान खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वाकाच्या त्या ताज्यातवान्या विकेटवर इयान बोथम यांनी ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. एकाहून एक सरस फलंदाज ऑस्ट्रेलियन संघात असताना किम ह्युज यांच्या ९९ धावांनी ऑस्ट्रेलियाला तारले होते. पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची अवस्था होती २३२/८. सर्व प्रमुख फलंदाज बाद झालेले होते.
दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला आणि पहिल्या दिवशीचे नाबाद फलंदाज डेनिस लिली व डायमॉक हे मैदानात उतरले. अचानक सर्वांचे लक्ष डेनिस लिली यांच्या बॅटकडे गेले. ती बॅट चमकत होती. कारण ती पारंपारिक लाकडाची बॅट नसून ॲल्युमिनियम धातु पासून बनलेली होती. त्या बॅटला कॉमबॅट ( ComBat ) असे नाव दिले गेले होते.
दुसऱ्या दिवसाचे पहिले षटक इयान बोथम टाकत होते. पहिले तीन चेंडू बॅटला लागलेच नाहीत आणि चौथ्या चेंडूपासून खऱ्या नाटकाला सुरुवात झाली. लिली यांनी चौथ्या चेंडूवर एक स्ट्रेट ड्राईव्ह मारला आणि तीन धावा पळून काढल्या. तिकडे ड्रेसिंग रूममध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार ग्रेग चॅपेल वैतागले. त्यांना वाटले ह्या चेंडूवर चार धावा मिळायला हव्या होत्या. चॅपेल यांनी बारावा खेळाडू रोडनी हॉग यांना ती बॅट घेऊन यायला सांगितले.
मैदानावर इंग्लंडचे कर्णधार माइक ब्रेअर्ली ( Mike Brearley ) यांनी पंचांकडे तक्रार केली की, या ॲल्युमिनियम बॅटने चेंडूचा आकार बदलू शकतो. पंचांनी लिलीला बॅट बदलण्यास सांगितले तोपर्यंत बारावा खेळाडू हॉग मैदानात लाकडी बॅट घेऊन आले होते. परंतु लिली यांनी बॅट बदलण्यास साफ इन्कार केला. ते पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज झाले. इंग्लंडचे खेळाडू खेळण्यास तयार होईना. लिली, ब्रेअर्ली आणि पंचांदरम्यान १० मिनिटे चर्चा झाली. लिली बॅट बदलणार असतील तरच, सामना पुढे सुरू राहील असे इंग्लंडने सांगितले. लिली लाकडी बॅट वापरण्यास तयार झाले.
लाकडी बॅट घेतल्यानंतर लिली यांनी आपली ॲल्युमिनियम बॅट जवळपास चाळीस यार्डावरून पव्हेलीयनकडे रागात फेकली. विस्डेनने या प्रकाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक लाजिरवाणी गोष्ट अशी टिप्पणी केली होती.
खरंतर, लिली यांचा मित्र ग्रॅम मोनाघन याने शाळकरी मुलांसाठी अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या ॲल्युमिनियमच्या बॅटी बनवल्या होत्या. त्याच्याच एका जाहिरातीचा भाग म्हणून लिली यांनी ही बॅट कसोटी सामन्यात वापरण्याचे वचन मोनाघन यांना दिले होते. कारण, त्यावेळी क्रिकेट सामन्यात बॅटचा आकार, वजन इत्यादी कसलीही प्रमाणे नव्हती.
असे म्हटले जाते, लिली यांच्या या प्रकारानंतर ॲल्युमिनियम बॅटच्या खपात प्रचंड वाढ झाली होती. मोनाघन यांनी त्यातून झालेल्या नफ्याचा काही भाग लिली यांना देखील दिला होता.
त्या सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी त्या बॅटवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. इंग्लंडचे कप्तान माइक ब्रेअर्ली यांनी त्यावर संदेश लिहिला होता, ” Good Luck With The Sales ” इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील हा सामना त्या बॅटसाठीच ओळखला जातो.या प्रकारानंतर क्रिकेटमध्ये नियम केला गेला की बॅट ही फक्त लाकडाची असेल.