भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यांची चाहते कायम वाट पाहत असतात. पुर्वी भारत पाकिस्तानमधील संबंध चांगले असताना भारत पाकिस्तान दौऱ्यावर किंवा पाकिस्तान भारत दौऱ्यावर येत असे. अशावेळी ज्या देशात सामना असेल त्या देशातील स्टेडियम पुर्णपणे भरुन जात असतं.
भारत-पाकिस्तान देशात आजपर्यंत १३१ वनडे सामने झाले आहेत. ज्यापैकी ५४ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर, ७३ सामन्यात पाकिस्तानच्या वाट्याला यश आले आहे.
खेळात एक संघ जिंकणार तर एक संघ हारणार हे ठरलेले असते. पण, असे २ भारतीय कर्णधार आहेत. ज्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी नेतृत्त्व केलेल्या सामन्यात एकदाही पराभवाचा सामना केलेला नाही.
तर जाणून घेऊया, त्या २ भारतीय कर्णधारांविषयी- 2 Indian Captains Never Loss In ODI Against Pakistan
१. रोहित शर्मा
भारताचा हिटमॅन रोहित शर्मा हा जगातील सर्वश्रेष्ठ सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे. तसं पहिलं तर, गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. परंतु, जर विराटला विश्रांतीची गरज पडल्यास निवडकर्त्यांना त्याच्या पर्यायाचा विचार करण्याची जास्त गरज पडत नाही. ते वनडे किंवा टी२० सामना असेल तर रोहितला प्राधान्य देतात.
आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या २ वनडे सामन्यात रोहितने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. या दोन्ही सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला होता.
पहिला सामना दुबई येथे १९ सप्टेंबर २०१८ला झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारताला १६३ धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तत्कालिन भारतीय संघाचा कर्णधार रोहितने ३९ चेंडूत ५२ धावा आणि शिखर धवनने ५४ चेंडूत ४६ धावा केल्या होत्या. तर, अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिकच्या प्रत्येकी ३१ धावांमुळे भारताने केवळ २९ षटकात २ बाद १६४ धावा करत तो सामना जिंकला होता.
दूसरा सामना दुबई येथे २३ सप्टेंबर २०१८ला झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारताला २३८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने सलामीला फलंदाजी करत शतक केले होते. ११९ चेंडूत त्याने १११ धावांची तूफानी खेळी केली होती. तर, रोहितबरोबर सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या शिखर धवनने १०० चेंडूत ११४ धावा केल्या होत्या. त्यांच्या शतकी खेळींमुळे भारताने ४०व्या षटकात १ बाद २३८ धावा करत तो सामना खिशात घातला होता.
२. मोहिंदर अमरनाथ
मोहिंदर अमरनाथ हे त्यांच्या काळातील शानदार अष्टपैलू क्रिकेटपटू होते. १९८४मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची वनडे मालिका झाली होती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अमरनाथ यांच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्वपद सोपवण्यात आले होते. सियालकोट येथे ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असताना ४० षटकात ३ बाद २१० धावा झाल्या होत्या.
परंतु, भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याचे वृत्त मिळाल्यामुळे तो सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे सामना अनिर्णीत राहिला. मालिकेतील तिसरा सामनाही रद्द केला गेला.
अमरनाथ यांनी त्यांच्या वनडे कारकिर्दीत ८५ सामन्यात ३०.५४च्या सरासरीने १९२४ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या २ शतकांचा आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, त्यांनी वनडेत एकूण ४६ विकेट्स घेतल्या होत्या.
बाकी जे कर्णधार पाकिस्तानविरुद्ध खेळले त्यांना पहावा लागला पराभव
मोहम्मद अझरुद्दीन (१६), सचिन तेंडूलकर (११), सौरव गांगुली (१०), कपिल देव (९), एमएस धोनी (७), के श्रीकांत (५), राहुल द्रविड(४), सुनिल गावसकर (३), बिशनसिंग बेदी (२), अजय जडेजा (२), विराट कोहली (२), रवी शास्त्री (१) आणि दिलीप वेंगसरकर (१) यांना पाकिस्तानविरुद्ध एकतरी पराभव पहावा लागला आहे.
ट्रेंडिंग लेख-
एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय…
विश्वचषक इतिहासातील ‘हे’ ५ अविस्मरणीय सामने, जे…
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर देशाचे पंतप्रधान झालेले ५ खेळाडू