विक्रम… क्रिकेट बनलेलेच आहे, नवनवे विक्रम बनवण्यासाठी आणि जुन्या विक्रमांना मोडण्यासाठी. क्रिकेट इतिहासात अनेक विक्रमांची नोंद आहे. त्यातही जर टी२० क्रिकेटविषयी पाहायच झाल तर, फक्त २० षटके असल्यामुळे फलंदाज दमदार फटकेबाजी करत अनेक विक्रम करतात. परंतु, असेही काही विक्रम असतात, जे नकळत क्रिकेटपटूंच्या नावावर नोंदवले जातात. अशा विक्रमांपैकी एक म्हणजे, शून्यावर बाद होण्याचा विक्रम.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम श्रीलंकाच्या तिलकरत्ने दिलशान, पाकिस्तानच्या उमर अकमल आणि आयर्लंडच्या केविन ओ’ब्रायन यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. तिघेही टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०वेळा बाद झाले आहेत. तर, भारताकडून रोहित शर्मा सर्वाधिक ६ वेळा टी२०त शून्यावर बाद झाला आहे.
याप्रमाणेच टी२० क्रिकेटमध्ये असेही काही फलंदाज आहेत, जे त्यांच्या टी२० कारकिर्दीत एकदाही शून्यावर बाद झाले नाहीत. या यादीत दक्षिण आफ्रिकाचा डेविड मिलर हा अव्वल क्रमांकावर आहे. तो ७८ टी२० सामन्यांत ६८ डावांत फलंदाजी करताना एकदाही शून्यावर बाद झालेला नाही. भारताविषयी पाहायचे झाले तर, असे फक्त दोनच फलंदाज आहेत, जे १०पेक्षा जास्त डावात फलंदाजी करुन एकदाही शून्यावर बाद झालेले नाहीत.
तर जाणून घेऊया, त्या २ भारतीय खेळाडूंविषयी
2 Indian Players Never Got Duck In International Career
इरफान पठाण (२४ सामने १४ डाव)
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण हा त्याच्या टी२० कारकिर्दीत एकदाही शून्यावर बाद झाला नाही. २००६मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून आपल्या टी२० कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या इरफानने कारकिर्दीत २४ टी२० सामने खेळले होते. या २४ सामन्यांपैकी १४ डावात फलंदाजी करताना इरफानने एकूण १७२ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद ३३ धावांचा समावेश होता.
रविश्चंद्रन अश्विन (४६ सामने ११ डाव)
भारताचा माजी फिरकीपटू रविश्चंद्रन अश्विन हादेखील त्याच्या टी२० कारकिर्दीत एकदाही शून्यावर बाद झाला नाही. अश्विनने २०१०मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि २०१७मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने शेवटचा टी२० सामना खेळला. दरम्यान अश्विनने ४६ सामने खेळले होते. त्यापैकी ११ डावात फलंदाजी करताना अश्विनने १२३ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद ३१ धावंचा समावेश होता.
ट्रेंडिंग लेख-
‘या’ ५ भारतीय फलंदाजांनी घ्यायला पाहिजे कसोटीतून निवृत्ती, पुनरागमनाची शक्यता आहे खूप कमी
टी२०मध्ये शेवटचे षटक निर्धाव टाकणारे ४ गोलंदाज; एक नाव आहे भारतीय
परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात…