ऑस्ट्रेलिया दौरा मार्च २०२०नंतरचा भारतीय क्रिकेट संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा ठरणार आहे. यासाठी सोमवारी खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी निवड समितीवर टीकेची झोड उठवली आहे.
भारतीय क्रिकेट निवड समितीने निवड केलेल्या खेळाडूंमध्ये काही प्रतिभावान खेळाडूंना स्थान दिले गेले नाही. तर काही खेळाडूंना आश्चर्यकारकरित्या स्थान देण्यात आले आहे. काही खेळाडू चांगला खेळ करत असूनही त्यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.
या दोन खेळाडूंची निवड होणे होते अपेक्षित
१) सुर्यकुमार यादव
सुर्यकुमार हा गेली ११ वर्षे मुंबई रणजी संघासाठी उत्तम कामगिरी करीत आहे. मागील दोन वर्षांपासून तो मुंबई इंडियन्स संघासाठी देखील चांगली कामगिरी करीत आहे. सुर्यकुमारने त्याच्या कारकिर्दीत १६० सामन्यांत ३१.३८ च्या सरासरीने आणि १३९.९१ च्या स्ट्राईक रेटने ३२९५ धावा केल्या आहेत. याचदरम्यान त्याने १७ अर्धशतक ठोकले आहेत. त्यामुळे त्याची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होणे स्वाभाविकपणे होते. तसेच आयपीएल दरम्यान त्याची निवड होईल, असे अनेक तज्ञांना वाटत होते.
२) युजवेंद्र चहल
युजवेंद्र चहल हा भारतासाठी गेल्या काही वर्षांपासून महत्त्वाचा फिरकीपटू ठरला आहे. क्रिकेटच्या दोन प्रकारांमध्ये त्याने उत्तम खेळ केलेला आहे. निर्णायक क्षणी विकेट काढून त्याने संघाला सामन्यात परत आणण्याचे काम केले आहे. शिवाय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा तो सध्याचा महत्त्वाचा फिरकीपटू आहे.
चहलला आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे कसोटी सामन्यात खेळण्यासाठी चहल आतुर होता. त्याने खेळलेल्या ३१ प्रथम श्रेणी सामन्यांत ४८ डावात तब्बल ८४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची कसोटी संघात निवड न होणे म्हणजे नवलच.
दोन असे खेळाडू ज्यांची झाली आश्चर्यकारकरित्या निवड
१) संजू सॅमसन
२०२० च्या सुरुवातीला व कोरोनाचा हाहाकार माजण्यापूर्वी भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. ज्यात संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु तो तिथे सपशेल अपयशी ठरला. आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत त्याने धडाकेबाज अर्धशतक झळकावली. परंतु त्यानंतर सॅमसनचा खेळात सातत्य राहिले नाही. मात्र असे जरी असले तरीही इतर चांगली कामगिरी केलेले खेळाडू संघात स्थान मिळण्याची वाट पाहात असताना त्याची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी करण्यात आली आहे.
२) वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्ती हा फिरकी गोलंदाज आहे. अलीकडेच आयपीएलमध्ये घेतलेल्या पाच विकेट्स नंतर त्याचे नाव चर्चेत आले आहे. या अगोदर त्याची गोलंदाजी ही साधारण मानली जात होती. परंतु त्याचीही निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करण्यात आली. विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिन्ही अनुभवी गोलंदाजांना निवडण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी कमी आणि वेगवान गोलंदाजांसाठी जास्त अनुकूल समजली जाते. ऑस्ट्रेलिया संघ देखील त्यांच्या संघात फक्त एकच फिरकी गोलंदाज खेळवतो. अशात भारतीय संघ चक्रवर्तीच्या रुपात चौथा स्पिनर का नेत आहे हा मोठा प्रश्न आहे? चक्रवर्ती ऐवजी एखादा अतिरिक्त फलंदाज निवडला जाणे आवश्यक होते.