क्रिकेटच्या कोणत्याही स्वरुपात यष्टीरक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते. यष्टीरक्षक नेहमी सावध असणे आवश्यक आहे, कारण त्याला एकाच वेळी बर्याच गोष्टी कराव्या लागतात. झेल पकडण्यापासून ते यष्टिचित करण्यापर्यंत यष्टीरक्षकाला नेहमी तयार असावे लागते.
आयपीएल ही एक स्पर्धा आहे जिथे प्रत्येक विभागात सर्वोत्कृष्ट खेळाडू पाहायला मिळतात. आयपीएलमध्येही फलंदाज आणि गोलंदाजांसह यष्टीरक्षकांची भूमिका देखील खूप महत्वाची राहिली आहे. त्यांनी आपल्या शानदार यष्टिरक्षणाद्वारे संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.
आयपीएल दरम्यान यष्टिरक्षणामध्ये केलेल्या सर्व विक्रमांमध्ये भारतीय खेळाडूंची नावे शीर्षस्थानी आहेत. या लेखामध्ये तुम्हाला २ दिग्गज यष्टिरक्षकांबद्दल सांगू ज्यांनी या स्पर्धेत यष्टीरक्षण करताना १०० झेल घेतले आहेत.
आयपीएलमधील दोन यष्टिरक्षक ज्यांनी घेतलेत १०० झेल
२. एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील दिग्गज यष्टीरक्षक असला तरी आयपीएलमध्ये यष्ट्यांमागे सर्वाधिक झेल पकडण्याच्या बाबतीत तो दुसर्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या १३ व्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने पंजाबचा कर्णधार केएल राहुलचा झेल घेत आयपीएलमध्ये १०० झेल पूर्ण केले.१९५ आयपीएल सामन्यात एमएस धोनीने विकेटच्या मागे १०० झेल पूर्ण केले आहेत.
धोनीपूर्वी आयपीएलमध्ये यष्टीमागे १०० झेल पूर्ण करण्याचा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने केला होता. असे असले तरी, धोनी आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स (झेल आणि यष्टीचीत मिळून) घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत १९५ सामने खेळताना १४३ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
१. दिनेश कार्तिक
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक आयपीएलमधील सर्वाधिक झेल घेणारा यष्टीरक्षक खेळाडू आहे. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसह अनेक संघांसाठी आयपीएल खेळले आहे. दिनेश कार्तिकने आयपीएलमधील आपल्या कारकीर्दीत यष्टीमागे एकूण १११ झेल घेतले आहेत.
दिनेश कार्तिकने आयपीएलमधील १८६ सामन्यांमध्ये आतापर्यंत यष्टीमागे १४१ गडी बाद केले आहेत. त्यामध्ये १११ झेल आणि ३० यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहेत.