सौरव गांगुली निःसंशयपणे भारताच्या इतिहासातील एक महान क्रिकेटपटू आणि कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला नवीन उंचीवर नेले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक वाद असूनही, गांगुलीच्या कष्ट आणि कर्तृत्वावर कधीच शंका घेतली जात नाही.
सौरव गांगुलीबद्दल २० रंजक गोष्टी –
१) क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा सौरव गांगुली हा उजवा फलंदाज होता. पण नंतर त्याने डावखुऱ्या हाताने फलंदाजी करायला सुरुवात केली. त्याचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुली हा, डाव्या हाताने फलंदाजी करत आणि सौरव त्याच्याप्रमाणे खेळण्याच्या प्रयत्नात कायमस्वरूपी डाव्या हाताने खेळू लागला.
२) जून १९९६ रोजी सौरव गांगुलीने लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण करताना १३१ धावा केल्या. आत्तापर्यंत लॉर्ड्सवर कोणत्याही खेळाडूने कसोटी पदार्पणात केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
३) सौरव गांगुली हा विश्वचषक बाद फेरीत शतक ठोकणारा पहिला भारतीय होता. २००३ विश्वचषकाच्या उपांत्यसामन्यामध्ये गांगुलीने केनिया विरुद्ध नाबाद १११ धावा फटकावल्या जे विश्वचषकातील बाद फेरीच्या टप्प्यात भारतीय फलंदाजाकडून पहिले शतक होते.
४) कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकली आहेत. २००३ वर्ल्डकपमध्ये त्याने ३ शतके ठोकली होती, जे अजूनही सर्वाधिक आहेत.
५) डावखुरा फलंदाज व कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने सर्वाधिक वनडे शतक ठोकली आहेत. गांगुली कर्णधार म्हणून ११ एकदिवसीय शतके ठोकून पहिल्या तर सनथ जयसूर्या १० शतकांसह दुसर्या स्थानावर आहे.
६) डावखुरा फलंदाज म्हणून सौरव गांगुलीने भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या प्रकारात गांगुलीने आंतरराष्ट्रीय वनडे व कसोटीमध्ये मिळून एकूण आंतरराष्ट्रीय धावा १८,४३३ केल्या आहेत. यात कसोटीत ७,२१२ आणि एकदिवसीय सामन्यात ११,२२१ धावांचा समावेश आहे.
७) सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतके (कसोटीत १६ आणि एकदिवसीय सामन्यात २२) आहेत. जी कोणत्याही डावखुऱ्या भारतीय फलंदाजांपेक्षा जास्त आहेत.
८) भारताबाहेर सौरव गांगुलीने कर्णधार म्हणून १२ शतके केली आहेत.
९) सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजीतील सर्वात्तम भागीदार मानले जातात. गांगुली-तेंडुलकरच्या जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत.
१०) सौरव गांगुली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार सामनावीर पुरस्कार जिंकणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. हे पुरस्कार त्याने १४ ते २१ सप्टेंबर १९९७ दरम्यान मिळवले.
११) सौरव गांगुलीने आपल्या कारकीर्दीत तब्बल ३१ वनडे सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
१२) एकदिवसीय कारकीर्दीत ३११ सामन्यांच्या २३६ डावात सौरव गांगुली सलामीचा फलंदाज म्हणून खेळला. तर, ११३ कसोटींच्या १८८ डावात सलामीवीराची भूमिका पार पाडली.
१३) सौरव गांगुलीच्या कसोटी कारकीर्दीची सरासरी ४२.१७ आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट अशी की, संपूर्ण कसोटी कारकीर्दीत गांगुलीची कसोटी सरासरी कधीही ४० च्या खाली गेली नाही.
१४) भारतीय कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने भारताबाहेर ११ कसोटी सामने जिंकले आहेत.
१५) सौरव गांगुलीकडे विश्वचषकात एका डावात भारतीय फलंदाजाकडून सर्वोच्च वैयक्तिक धावांचा विक्रम आहे. गांगुलीने १९९९ साली श्रीलंकेविरुद्ध टॉन्टन येथे झालेल्या विश्वचषकातील सामन्यात १८३ धावा केल्या होत्या.
१६) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ९००० धावांचा विक्रम गांगुलीच्या नावे होता. त्याने २२८ डावात ९००० धावा पूर्ण केल्या होत्या. पुढे हा विक्रम, भारताच्याच विराट कोहलीने १९४ डावात ९००० करत मोडीत काढला.
१७) सौरव गांगुलीकडे भारतीय कर्णधारद्वारे एकदिवस सामन्यांमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी केल्याचा विक्रम देखीलआहे आहे. गांगुलीने, कानपूर येथे झिम्बाब्वे विरुद्ध ही कामगिरी केली होती. त्याच्या गोलंदाजीचे पृथक्करण १०-१-३४-५ असे होते.
१८) सौरव गांगुली एका एकदिवसीय सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. १७ सप्टेंबर १९९६ रोजी टोरोंटो येथे, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. या सामन्यात त्याने नाबाद ११ धावा केल्या होत्या.
१९) जेव्हा सौरव गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले तेव्हा भारताने एकही सामना गमावला नाही. त्याच्या १६ कसोटी शतकांपैकी भारताने १२ सामने अनिर्णित राहिले आहेत आणि ४ कसोटी सामने जिंकले आहेत.
२०) आयपीएलच्या इतिहासातील पहिला चेंडू खेळण्याचा मान देखील सौरव गांगुलीकडे जातो. त्याने कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या प्रवीण कुमार चेंडू खेळला होता.