मलेशियात सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेत आज भारताने श्रीलंकेविरुद्ध 7 विकेटने विजय मिळवला. या सामन्यात भारताची महान क्रिकेटपटू मिताली राजने आज आंतरराष्ट्रीय टी20 मधील मोठा विक्रम केला आहे.
तिने आज आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 2000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये हा टप्पा पार करणारी ती पहिलीच आणि एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.
तिने आज 33 चेंडूत 23 धावांची खेळी केली. तिला निलक्षी डी सिल्वाने बाद केले. त्यामुळे आता तिने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 74 सामन्यात 38.01 च्या सरासरीने 2015 धावा केल्या आहेत.
भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंपैकीही अजून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कोणाला 2000 धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय पुरूष क्रिकेटपटूंमध्ये अव्वल स्थानी असणाऱ्या विराट कोहलीला 2000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी अजून 17 धावांची गरज आहे.
त्यामुळे मिताली राज भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू ठरली आहे.
याबरोबरच आंतरराष्ट्रीय महिला टी20 मध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारी ती एकूण सातवी तर पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
Congratulations to @M_Raj03 on reaching 2,000 T20I runs – the first player to reach the landmark for @BCCIWomen 👏 #INDvSL #WAC2018 pic.twitter.com/dWmslbT5CG
— ICC (@ICC) June 7, 2018
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू:
2015 धावा: मिताली राज
1983 धावा:विराट कोहली
1852 धावा: रोहित शर्मा