रणजी ट्रॉफी 2018 स्पर्धेत शुक्रवारपासून 6 व्या फेरीतील सामने सुरु झाले आहेत. या फेरीतील मिझोराम विरुद्ध सिक्कीम सामन्यात 27 वर्षीय मिलिंद कुमारने सिक्कीमकडून खेळताना 139 धावांची खेळी करताना मोठा पराक्रम केला आहे.
या सामन्यात मिझोरामने नाणेफेक जिंकून सिक्कीमला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. पण सिक्कीमची सुरुवात खराब झाली त्यांनी 92 धावांतच 4 विकेट गमावल्या. पण त्यानंतर मिलिंदने अन्य फलंदाजांना साथीला घेत 136 चेंडूत 139 धावांची आक्रमक शतकी खेळी केली. यात त्याने 18 चौकार मारले.
याबरोबरच त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत खास पराक्रमही केला आहे. त्याने रणजी क्रिकेटच्या या मोसमात 1000 धावा पूर्ण केल्या असून त्याने या फक्त 6 सामन्यातील 9 डावात पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत एका मोसमात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.
तसेच त्याने या विक्रमाच्या यादीत डब्ल्यूव्ही रमण आणि एस श्रीराम यांची बरोबरी केली आहे. रमण यांनी तमिळनाडूकडून खेळताना 1988-89 च्या रणजी ट्रॉफी मोसमात 9 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर श्रीराम यांनी 1999-00 च्या रणजी ट्रॉफी मोसमात तमिळनाडू संघाकडूनच 9 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
या यादीत अव्वल क्रमांकावर रुसी मोदी असून त्यांनी मुंबईकडून खेळताना 1944-45 च्या रणजी ट्रॉफी मोसमात 7 डावात 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. या पराक्रमाच्या आसपास अजूनही कोणाला जाता आलेले नाही.
मुळचा दिल्लीच्या असणाऱ्या मिलिंदने यावर्षी 6 सामन्यातील 9 डावात खेळताना 2 द्विशतके, 2 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. त्याने या 9 डावात 261, 224,133,61,13,13,96,77, 139 अशा मिळून 1017 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 10 विकेट्सही घेतल्या आहेत.
त्याच्या मिझोराम विरुद्धच्या शतकाच्या जोरावर सिक्कीमने पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना 10 बाद 332 धावा केल्या आहेत.
रणजी ट्रॉफी मोसमात सर्वात जलद 1000 धावा-
7 डाव – रुसी मोदी (1944-45) (मुंबई)
9 डाव – डब्ल्यूव्ही रमण (1988-89) (तमिळनाडू)
9 डाव – एस श्रीराम (1999-00) (तमिळनाडू)
9 डाव – मिलिंद कुमार (2018-19) (सिक्कीम)
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: मिशेल स्टार्कने दिला तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का
–Video: सुपरमॅन कोहलीचा हा अफलातून झेल पाहिला का?
–१९९० नंतर टीम इंडियाच्या बाबतीत केवळ चौथ्यांदाच घडले असे काही…