2018 या वर्षाचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत. भारतीय संघासाठी हे वर्ष चांगले ठरले असले तरीही यावर्षी चेंडू छेडछाड प्रकरण, रमेश पोवार – मिताली राज वाद ही प्रकरणे क्रिकेट जगतात चांगलीच गाजली.
असेच 2018 मध्ये गाजलेले हे टॉप 5 वादग्रस्त प्रकरणे:
शास्त्रींचे वादग्रस्त विधान –
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत 1-2 असा तर इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत 4-1 असा पराभूत झाला होता. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मागील 20 वर्षातील परदेशात सर्वोत्तम कामगिरी करणारा हा संघ आहे, असे वादग्रस्त विधान केले होते.
त्यांच्या या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यामुळे शास्त्रींना सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयची नेमुन दिलेली समीतीसमोर स्पष्टीकरणही द्यावे लागले होते.
नागिन डान्स –
यावर्षी मार्चमध्ये पार पडलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यादरम्यान नागिन डान्स प्रकरण गाजले होते. या सामन्यात बांगलादेशने शेवटच्या षटकात विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी नागिन डान्स करत श्रीलंकेच्या खेळाडूंना डिवचले होते.
त्याआधी याच सामन्यात बांगलादेशचा खेळाडू नरुल हसन हा सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून संघातील खेळाडूंना संदेश देण्यासाठी मैदानात आला असताना त्याने श्रीलंकेचा कर्णधाक थिसरा परेराशी वाद घातला होता. त्यांच्यातील वाद इतका वाढला की सामना पुढे चालू होईल का यांवर शंका उपस्थित झाली होती. या प्रकरणात त्याला आयसीसीने दोषी देखील ठरवले होते.
पोवार-मिताली वाद –
भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज मिताली राजला काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे अनेकांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
या प्रकरणानंतर मितालीनेही बीसीसीआयला पत्र लिहून भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवारांवर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती (सीओए) सदस्य डायना एडलजी यांच्यावरही तिने यांच्यावरही भेदभाव केल्याचा आरोप केला होता.
पण तिच्या या आरोपांना उत्तर देताना हे सर्व आरोप पोवार यांनी नाकारले. तसेच तिला तिच्या कमी स्ट्राइक रेटमुळे संघात न घेण्याचे कारण पोवार यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र या वादामुळे पोवार यांचे प्रशिक्षकपद कायम करण्यात आले नाही. त्यांच्याऐवजी डब्ल्यूव्ही रमण यांची भारतीय महिला संघाचे नवीन प्रशिक्षकपदी घोषणा करण्यात आली.
वॉर्नर – डीकॉक वाद –
यावर्षी ऑस्ट्रेलियाने केलेला दक्षिण आफ्रिका दौरा सर्वाधिक वादग्रस्त ठरला. या दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच वाद पहायला मिळाले. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील डर्बन कसोटीमध्ये तिसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉक यांच्यात चांगलेच वाद झाले.
त्यांच्यातील वाद इतके वाढले होते की उस्मान ख्वाजा आणि नॅथन लायनने मध्यस्थी करत या दोघांना बाजूला केले होते. हे वाद दोन्ही संघ ड्रेसिंग रुममध्ये जात असताना घडला होता. याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या दोघांवर आयसीसीने नंतर कारवाई केली होती.
चेंडू छेडछाड प्रकरण –
यावर्षी सर्वाधिक क्रिकेटविश्व ढवळून निघाले ते चेंडू छेडछाड प्रकरणामुळे. हे प्रकरणही ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातच घडले. या दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला कॅमेरामनने चेंडूवर सँडपेपर घासताना टिपले. त्यामुळे हे प्रकरण बाहेर आले.
नंतर या प्रकरणात त्यावेळीचे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर हे देखील यात सामील होते हे उघड झाले. तसेच चेंडू छेडछाड प्रकरणाची सर्व योजना वॉर्नरची होती हे देखील समोर आले. पर्यायाने स्मिथ आणि वॉर्नरला आपले पद सोडावे लागले.
त्यानंतर स्मिथ आणि वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी 1 वर्षांची बंदी घालण्यात आली. तसेच बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या:
–हे ५ तरुण खेळाडू २०१९मध्ये होऊ शकतात टीम इंडियाचे शिलेदार
–जर टीम इंडियाने कसोटी जिंकली तर आयसीसी क्रमवारीत होणार हे मोठे बदल
–बापरे! कोहली तिसऱ्या कसोटीत १० दिग्गजांचे १० विक्रम मोडणार