आज न्यूझीलॅंडचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज राॅस टेलरचा ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. वनडे क्रमवारीत हा खेळाडू सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मापाठोपाठ तिसऱ्या स्थानी आहे. २०१८ आणि २०१९ साल या खेळाडूसाठी अनेक अर्थांनी खास राहिले आहे.
अशा या खेळाडूने वाढदिवसाच्या दिवशीच एक खास कारनामा केला होता. त्याने ८ मार्च २०११ मध्ये विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध १२४ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या होत्या. अशी कामगिरी करणारा तो वनडे क्रिकेटमधला तिसराच खेळाडू ठरला होता. तेव्हा त्याचे वय केवळ २७ वर्षे होते.
हा विश्वचषक भारत- श्रीलंका आणि बांगलादेशने मिळून आयोजीत केला होता. यातील कॅंडी येथे झालेल्या सामन्यात टेलरने अतिशय स्फोटक खेळी केली होती. २९ षटकांत ४ बाद ११३ अशा अवस्थेतून त्याने संघाला बाहेर काढत ५० षटकांत ७ बाद ३०२ धावांचा टप्पा गाठून दिला होता. त्याने या सामन्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरची अशी काही धुलाई केली होती की त्याचा हा कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला होता. अख्तरच्या ९ षटकांत तब्बल ७७ धावा न्यूझीलंड संघाने केल्या होत्या. या सामन्यात टेलर नाबाद राहिला होता.
या खेळाडूंनी वनडेत केल्या आहेत वाढदिवसाच्या दिवशी शतकी खेळी-
वाढदिवसाच्या दिवशी वनडेत पहिल्यांदा शतकी खेळी करण्याचा विक्रम विनोद कांबळी याच्या नावावर आहे. त्याने १८ जानेवारी १९९३ रोजी वयाच्या २१ वर्षी शतक केले होते. त्याने ही शतकी खेळी इंग्लड संघाविरुद्ध केली होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वयाच्या २५व्या वाढदिवसाच्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शारजात १३४ धावांची खेळी केली होती. सनथ जयसुर्याने ३९व्या वाढदिवसाच्या दिवशी बांगलादेश संघाविरुद्ध १३० धावांची खेळी कराची शहरात केली होती.