कसोटी क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्वात मोठे स्वरुप आहे. अमर्यादित षटकांच्या या क्रिकेट प्रकारात फलंदाज तास-न-तास मैदानावर फलंदाजी करतात आणि अधिकाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न करतात. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा, जो रुट, स्टिव्ह स्मिथ आणि केन विलियम्सनसारख्या अनेक फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या विक्रमांचा ढीग रचला आहे.
तसं तर, कसोटी सामन्यात एखाद्या संघाने ४००पेक्षा जास्त धावसंख्या उभारली, तर त्या संघाचा पलडा भारी असल्याचे समजले जाते. कारण, अधिकतर ४००पेक्षा जास्त धावा केलेल्या संघांनी सामने जिंकलेले आपण पाहिले आहे. जर एखाद्या संघाने कसोटीत ५००पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला तर त्या संघाचा विजय निश्चितच आहे, असे समजले जाते. अधिकतर ५००पेक्षा जास्त धावा करणारा संघ तो कसोटी सामना जिंकतो किंवा सामना अनिर्णीत राहतो. खूप कमीवेळा एवढा विशाल धावसंख्या उभी केल्यानंतरही संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
दुर्दैवाने ऑस्ट्रेलिया संघासोबत असे घडले आहे, तेही एकदा नव्हे तर दोनदा. या लेखात त्या २ सामन्यांची माहिती देण्यात आली आहे. तर बघूयात, कसोटीत ५००पेक्षा जास्त धावा करुनही पराभूत होणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाच्या त्या २ सामन्यांविषयी (2 Times When Australia Lost Test Match Despite Scoring More Than 500 Runs) –
२. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – सिडनी, डिसेंबर १८९४
डिसेंबर १८९४ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे खेळण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच डावात ५८६ धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सईद ग्रेगरी यांच्या २०१ आणि जॉर्ज गिफन यांच्या १६१ धावांचा समावेश होता.
त्यानंतर इंग्लंड संघ केवळ ३२५ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर इंग्लंड संघाला फॉलोऑन मिळाला. इंग्लंडने त्यांच्या दूसऱ्या डावात अलबर्ट लॉर्ड यांच्या ११७ धावांच्या दमदार खेळीमुळे ४३७ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला दूसऱ्या डावात १७७ धावांचे आव्हान दिले होते.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी त्यांच्या दूसऱ्या डावात सुरुवातीला ३ विकेट्स गमावत १३० धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हान पूर्ण करणे खूप वाटत सोपे होते. पण, इंग्लंडचे गोलंदाज बॉबी पील यांनी पूर्ण सामन्याचा कायापालट केला. त्यांनी जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन करत केवळ ६७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. तर, जॉनी ब्रिग्स यांच्या ३ विकेट्समुळे इंग्लंडने तो सामना १० धावांनी जिंकला होता आणि ऑस्ट्रेलियाला एवढी दमदार सुरुवात करुनही परावभाचा स्वाद चाखावा लागला होता.
१. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – ऍडलेड, डिसेंबर २००३
२००३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील दूसरा सामना ऍडलेड स्टेडियमवर खेळण्यात आला होता. हा सामना राहुल द्रविड आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांच्या शानदार खेळीसाठी ओळखला जातो. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५५६ धावा केल्या होत्या. यात रिकी पाँटिंगच्या २४२ धावांच्या अफलातून खेळीचा समावेश होता.
यावेळी भारतानेही ऑस्ट्रेलियाला शानदार प्रतिउत्तर देताना पहिल्या डावात ५२३ धावा केल्या होत्या. यात द्रविडच्या शानदार २३३ धावांचा आणि लक्ष्मणच्या १४८ धावांचा समावेश होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दूसऱ्या डावात भारतीय गोलंदाज अजित आगरकरनी केवळ ४१ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ केवळ १९६ धावांवर सर्वबाद झाला.
म्हणून भारताला त्यांच्या दूसऱ्या डावात विजयासाठी २३० धावांची गरज होती. द्रविडने या डावातही ७२ धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. भारताने तो सामना ४ विकेट्सने जिंकला होता. अशाप्रकारे कसोटीत ५००पेक्षा जास्त धावा करुनही सामना गमावण्याची ही ऑस्ट्रेलियाची दूसरी वेळ होती.
ट्रेंडिंग लेख –
ऍशेस विजयासह २३ ऑगस्ट रोजी क्रिकेट विश्वात काय काय खास घडलं?
देशासाठी ७१ कसोटी खेळून एकही वनडे सामना खेळायला न मिळालेल्या दिग्गजाची गोष्ट
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या षटकाराने एका पाकिस्तानी क्रिकेटपटूची प्रेमकहाणी सुरु होण्याआधीच आली होती संपुष्टात
बीसीसीआयने धोनीला असा काही झटका दिला की त्याला निवृत्तीचाच घ्यावा लागला निर्णय
…म्हणून धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवले, सौरव गांगुलीने केला खुलासा