क्रिकेटमधील बऱ्याच खेळाडूंची नावे ही खूप मजेदार किंवा खूप मोठी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचे पूर्ण नाव वांगीपुरपु वेंकट साई लक्ष्मण आहे, तर श्रीलंकेचा गोलंदाज चमिंडा वास याचे पूर्ण नाव वर्नाकुलासुरिया पाताबेंडेगे उशांत जोसेफ चमिंडा वास. त्यांचे पूर्ण नाव घेताना चांगल्या चांगल्याची स्थिती अधिकच वाईट होते.
क्रिकेटमध्ये असेही काही खेळाडू आहेत ज्यांची नावे क्रिकेटमधील एखाद्या संज्ञेशी जुळतात. अशाच पाच क्रिकेटपटूंबद्दल या लेखात जाणून घेणार आहोत.
क्रिकेटमधील एखाद्या संज्ञेशी जुळणाऱ्या नावांचे ५ क्रिकेटपटू –
१. ग्रेगोर मेडेन (Gregor Maiden) – स्कॉटलंड
मेडेन – म्हणजे एक निर्धाव षटक ज्यामध्ये गोलंदाजाने एकही धाव दिलेली नाही.
स्कॉटलंडच्या ग्रेगर मेडनने आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. प्रामुख्याने फलंदाज असणारा हा खेळाडू पार्ट टाइम ऑफ स्पिनर गोलंदाजी आणि यष्टीरक्षणही करायचा. २००३ मध्ये त्याने लँकशायरसाठी एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळला.
भारत ‘अ’ विरुद्धच्या एका सामन्यात मेडेनने ख्रिस स्किल्डसह ९ व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली होती. ही जागतिक विक्रमी भागीदारीमध्ये मेडेनने ६२ धावांचे योगदान दिले होते.
त्याच्या नावात मेडन असले तरी मात्र त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही मेडन अर्थात निर्धाव षटक टाकले नाही.
स्कॉटलंडकडून ७ वनडे सामन्यात त्याने ८४ धावा केल्या पण एकही विकेट मिळवली नाही. त्याने ३ टी-२० सामन्यात २ विकेट घेतल्या परंतु टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने एकही धाव केलेली नाही.
२. विल्यम रोलर (William Roller) – इंग्लंड
रोलर – एक असे यंत्र जे क्रिकेट खेळपट्टी व्यवस्थित करण्यास उपयुक्त पडते
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू विल्यम रोलरने १२० प्रथम श्रेणी-सामने खेळले. त्याने शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आणि त्याच्या वेस्टमिन्स्टर स्कूल या संघात त्याचा समावेश होता. परंतु, तो इंग्लंडकडून कधीही कसोटी सामना खेळला नाही.
१८८१ ते १८९० पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या संघाचा नियमित सदस्य होता. त्यावेळी त्याच्या संघाने ६ वेळा काउंटी अजिंक्यपद जिंकले. रोलर जो एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता, त्याने १२० प्रथम श्रेणी सामन्यांत ३८२० धावा केल्या आणि १९० विकेट्स घेतल्या. त्याची सर्वाधिक धावसंख्या २०४ होती आणि त्याने ७ शतके ठोकली होती. या व्यतिरिक्त त्याने ४ डावात पाच बळी घेतले.
क्रिकेटबरोबरच रोलर एक उत्तम जलतरणपटू होता. याशिवाय तो फुटबॉलही खेळला आणि बिआरिझ गोल्फ क्लबचा कर्णधारही होता.
३. स्टीफन प्लंब (Stephen Plumb) – इंग्लंड
प्लंब – जेव्हा एखादा फलंदाज एलबीडब्ल्यू बाद असतो तेव्हा प्लंब असे म्हणतात.
स्टीफन प्लंबने एसेक्सकडून काऊन्टी क्रिकेट खेळले आहे. परंतु, त्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हता. त्यांना इंग्लंडकडून खेळण्याची संधीही मिळाली नाही. १९७७ मध्ये ते एसेक्स संघ सोडून नॉरफोक संघात गेले. लिंकनशायरकडूनदेखील सामनेदेखील खेळले.
प्लंबने श्रीलंका, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडसारख्या संघाविरुद्ध काऊन्टीसह प्रथम श्रेणी सामने देखील खेळले.
५ प्रथम श्रेणी सामान्यांमध्ये त्यांनी २१५ धावा केल्या आणि ३ विकेट्स घेतले. क्रिकेट व्यतिरिक्त ते गोल्फ देखील खेळले. प्रथम श्रेणी सामन्याशिवाय त्यांनी ६४ अ दर्जाचे सामने खेळले आणि ११०९ धावा केल्या तसेच २६ विकेट्स घेतल्या. त्यांच्या नावावर ४ अर्धशतके आहेत आणि त्यांची सर्वोच्च धावसंख्या ६३ आहे.
४. निक नाइट (Nick Knight) – इंग्लंड
निक – बॅटची हलकी कडा घेऊन चेंडू जाणे.
निक नाईट २००० मध्ये मार्कस ट्रेस्कोथिकबरोबर इंग्लंड क्रिकेट संघाचा सलामीवीर होता आणि दोघांची जोडी खूप चांगली होती. इंग्लंडकडून निक नाईटने १०० वनडे सामने खेळले आणि ४०.४१ च्या सरासरीने ३६३७ धावा केल्या. त्यांनी ५ शतके ठोकली होती ज्यात १९९६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक नाबाद १२५ धावा केल्या होत्या. वनडेत भारताविरुद्धही त्याने शतकही केले.
निक नाइटनेही १७ कसोटी सामनेही खेळले असुन केवळ २३.९६ च्या सरासरीने आणि एका शतकाच्या मदतीने ७१९ धावा केल्या. १९९६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ११३ धावा ही सर्वाधिक धावसंख्या होती.
प्रथम श्रेणीमध्ये निक नाइटने वॉरविक्शायरकडून मिडलसेक्सविरुद्ध तिहेरी शतकही केले आहे. प्रथम श्रेणीमध्ये त्यानी ४० शतके केली. वॉरविक्शायर व्यतिरिक्त तो एसेक्सकडूनही खेळला आहे.
निक नाइटच्या कारकीर्दीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, २००३ च्या विश्वचषकात शोएब अख्तर टाकलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद गतीचा चेंडू निकने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला होता.
अ दर्जाच्या सामन्यांमध्ये निक नाईटने ३० शतके केली आहेत. याशिवाय त्यांनी २३ टी२०सामनेही खेळले आहेत.
५. जेक बॉल (Jake Ball) – इंग्लंड
बॉल (चेंडू) – प्रथम श्रेणी आणि कसोटीसाठी लाल आणि गुलाबी, वनडे सामन्यांसाठी पांढरा बॉल असतो. तसेच क्रिकेटमध्ये केशरी आणि निळ्या रंगाचे बॉल देखील वापरले गेले आहेत.
जेक बॉल हा इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे जो आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळला आहे. २०१६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध लॉर्डस येथे त्याने पदार्पण केले. परंतु त्या सामन्यात तो फक्त एक विकेट घेऊ शकला. याशिवाय इंग्लंडकडून जेक बॉलने १८ वनडे आणि २ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने देखील खेळले आहेत. वनडे सामन्यात त्याने एका डावात ५ विकेटही घेतल्या आहेत.
प्रथम श्रेणीमध्ये त्याने चांगला खेळ केला. त्यात ६३ सामन्यात १९१ बळी घेतले आहेत. काउन्टीमध्ये तो नॉटिंगहॅमशायरकडून खेळतो. या व्यतिरिक्त त्याने अ श्रेणीच्या ९६ सामन्यात ११८ बळी आणि ६५ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये ७० विकेट्स घेतल्या आहेत.
तो एक गोलंदाज असल्याने समालोचन करताना समालोचक बॉलने ‘बॉल’ असे अतिशय मजेदार वाक्य उच्चारात होते.
वाचनीय लेख –
चष्मा घालून खेळणारे १० दिग्गज क्रिकेटपटू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवूनही या ५ दिग्गज क्रिकेटपटू कधीही झाले नाहीत कर्णधार
अशा १३ घटना जेव्हा शिवसेनेने केला भारत-पाकिस्तान सामन्यावेळी राडा