टी२० क्रिकेट आल्यापासून चाहत्यांना क्रिकेटचे हे प्रारूप सर्वाधिक आवडू लागले. फलंदाजांकडून मोठे फटके आणि मैदानावर धावांचा वर्षाव होताना दिसत असतो. कारण, २० षटकांच्या सामन्यात प्रत्येकजण आपल्या संघासाठी चौकार आणि षटकारांच्या मदतीने अधिकाधिक धावा जमविण्यासाठी प्रयत्नशील असतो. प्रत्येक देशाने आपली स्वतःची एक टी२०लीग सुरु केलेली आहे.
इंडियन प्रीमियर लीग बद्दल बोलायचे झाले तर, बऱ्याच युवा भारतीय क्रिकेटपटूंना हे आपली प्रतिभा दाखवण्याचे व्यासपीठ मिळाले आहे. प्रस्थापित भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या खांद्यालाखांदा लावून खेळायची संधी त्यांना मिळत असते.
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी, खेळाडूंना फ्रँचायझीमार्फत भरमसाठ रक्कम दिली जाते. परंतु, असे काही खेळाडू आहेत ज्यांनी टी२० विश्वचषक गाजवला. मात्र, आयपीएलमध्ये ते साफ अपयशी ठरले. तर आज आपण अशा ५ खेळाडूंबद्दल चर्चा करूया, ज्यांनी टी२० विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे पण, आयपीएलमध्ये आपल्या नावाला साजेसा खेळ करू शकले नाहीत
१) मार्लन सॅम्युअल्स
वेस्ट इंडिजचा मार्लन सॅम्युअल्स नेहमीच वेस्टइंडीजच्या टी२० संघाचा प्रमुख खेळाडू होता. संघाच्या मधल्या फळीला बळकटी देत त्याने वेस्ट इंडीजसाठी अनेक सामने जिंकवले. टी२० स्वरूपात कॅरेबियन खेळाडूंना सर्वाधिक मागणी आहे कारण, त्यांच्याकडे स्फोटक फलंदाजी करण्याची मोठी क्षमता आहे, जे फ्रँचायझीसाठी विजयाचे सूत्र आहे.
सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजने जिंकलेल्या २०१२ आणि २०१६ च्या टी२० विश्वचषकात अनेक महत्त्वपूर्ण खेळ्या खेळल्या आहेत. त्यावेळी, तो जगातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक होता.
२०१२ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने नाबाद ७८ धावांची खेळी केली होती. जी क्रिकेटप्रेमींच्या कायमची लक्षात राहिली आहे. २०१६ च्या अंतिम सामन्यातही एकट्याने ८५ धावांवर नाबाद राहात वेस्ट इंडीजला दुसरे विजेतेपद मिळवून दिले.
सॅम्युअल्सला त्याच्या प्रदर्शनामुळे, आयपीएलमधील पुणे वॉरियर्स इंडिया संघाकडून करार मिळाला होता. परंतु, तो तिथे आपली फलंदाजी कौशल्ये दाखवू शकला नाही. ८ सामन्यात १०० च्या स्ट्राइक रेटने तो अवघ्या १२४ धावा करू शकला.
एका साधारण फलंदाजासाठी या धावा ठीक मानल्या जाऊ शकतात. पण, सॅम्युअल्सच्या क्षमतेचा विचार केल्यास हा आकडा निराशाजनक होता. त्यानंतर, २०१७ मध्येही त्याची निवड दिल्ली कॅपिटल्समध्ये करण्यात आली. परंतु तेथेही तो ५ सामन्यांत २७ धावा बनवू शकला. यानंतर तो पुन्हा कधीही आयपीएल खेळताना दिसला नाही.
२) ओएन मॉर्गन
इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गनचा खेळ आपणा सर्वांना माहित आहे. मॉर्गन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इच्छेनुसार, षटकार आणि चौकार मारण्यासाठी ओळखला जातो. कारकीर्दीच्या सुरुवातीला, मॉर्गनला मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी तितकासा आदर्श खेळाडू मानले जात नव्हते.
पण, आपल्या फलंदाजीने त्याने सर्व टीकाकारांचे तोंडे बंद केली. २०१० च्या टी२० विश्वचषकात मॉर्गनने इंग्लंड संघाला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या मॉर्गनने आयपीएलमध्ये चार संघांसाठी आपले कौशल्य दाखवली. पण, तो आयपीएलमध्ये फ्लॉप झाला.
२०१० मध्ये तो आरसीबी संघात सामील झाला होता पण, त्यानंतर एका वर्षातच त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून तीन मोसम खेळले. जेथे तो धावा करण्यात थोडाफार यशस्वी झाला. २०१२ च्या आयपीएल जिंकलेल्या कोलकाता संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.
२०१६ साली तो सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळला. संघाने विजेतेपद मिळवले पण त्यात मॉर्गनचे तितकेसे योगदान नव्हते. २०१७ मध्ये पंजाबसाठी खेळताना त्याची कामगिरी अतिशय सुमार राहिल्याने संघातून बाहेर गेला. २०२० आयपीएल लिलावत पुन्हा कोलकाता संघाने त्याला खरेदी केले आहे.
३) युवराज सिंग
२००७ च्या टी२० विश्वचषकातील साखळी सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सलग ६ षटकार ठोकून युवराजने इतिहास रचला आणि त्याला सिक्सर किंग असे नाव देण्यात आले.
एवढेच नव्हे तर, या विश्वचषकात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात युवराज सिंगने फलंदाजी आणि गोलंदाजीद्वारे मोलाचे योगदान दिले. पण, या सिक्सर किंगची बॅट आयपीएलमध्ये त्याच्या नावाप्रमाणे तळपू शकली नाही.
तो आयपीएलमध्ये तब्बल सहा संघांसाठी खेळला. खरं तर, त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळेच तो एका संघातून दुसर्या संघामध्ये जात होता. २०१९ मध्ये अगदी कमी किंमतीत मुंबई इंडियन्सने त्याला संघात स्थान दिले. जिथे त्याला फक्त ४ सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये तो ९८ धावा करू शकला. चारही सामन्यात गोलंदाजी करताना त्याला एकही बळी मिळाला नाही.
जून २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दुबईतील टी१० लीग मध्ये सहभागी झाल्याने, तो आता आयपीएलसाठी पात्र ठरू शकत नाही.
४) अँजेलो मॅथ्यूज
श्रीलंका क्रिकेट संघ सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खूपच खराब कामगिरी करत आहे. परंतु, याआधी श्रीलंका संघाने टी२० क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवलेले दिसून येते. त्यांनी सलग २ टी२० विश्वचषकच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आणि २०१४ मध्ये भारतासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत विजेतेपद मिळवले.
या सर्व काळात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. दोन्ही विश्वचषक गाजवल्यानंतर, आयपीएलमध्ये मात्र तो, अयशस्वी ठरला.
आपल्या स्फोटक फलंदाजी आणि शानदार गोलंदाजी या कौशल्यांमुळे त्याने आयपीएलच्या लिलावात आपल्यावर उच्च बोली लावण्यास फ्रॅंचाईजींना भाग पाडले.२००९-१० च्या काळात मॅथ्यूजने कोलकाता नाईट रायडर्स संघाबरोबर खेळताना चांगली कामगिरी केली. त्यानंतर त्याला पुणे संघाने विकत घेतले पण मॅथ्यूज फ्लॉप होऊ लागला आणि २० सामन्यात तो फक्त ३०० धावा करू शकला. २०१७ आयपीएलमध्ये तो दिल्लीसाठी खेळताना अखेरचा दिसला होता.
५) कार्लोस ब्रेथवेट
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेटचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर त्याने मारलेले गगनचुंबी षटकार येतात. कार्लोस ब्रेथवेट हा वेस्टइंडीज टी२० संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे.
२०१६ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, ब्रेथवेटने अखेरच्या षटकात इंग्लंडच्या बेन स्टोक्सला सलग चार षटकार मारत वेस्ट इंडीजला विजेतेपद मिळवून दिले होते.
त्याच वर्षी त्याची निवड दिल्ली कॅपिटल्सच्या संघात झाली होती. त्या ठिकाणी ठीकठाक कामगिरी त्याने केली. २०१७ मध्ये सनरायझर्स हैदराबादला त्याने काही विजय मिळवून दिले. मात्र, अंतिम ११ मध्ये तो आपले स्थान टिकवू शकला नाही. २०१८ साली कोलकाता संघाकडून खेळताना तो सपशेल अपयशी ठरला. त्यानंतर त्याला कोणत्याही संघाने निवडले नाही.
ट्रेंडिंग लेख –
असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे या ४ युवा खेळाडूंना टीम इंडियात मिळू शकते एंट्री
५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे! आयसीसीच्या फेसबुक पेजने रचला इतिहास, व्हिडिओ चॅनेलला तब्बल १.६५ अब्ज वेळा पाहण्यात आले
अवघ्या ७० मिनिटांत ठोकले होते शतक, ९९ वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित
‘ह्या’ बलाढ्य संघाविरुद्ध टीम इंडियाची ही महत्त्वाची मालिका पुढील वर्षापर्यंत स्थगित