मुंबई । माजी दिग्गज खेळाडू इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तान क्रिकेट संघाने 1992 मध्ये प्रथमच वनडे विश्वचषकावर नाव कोरले. या संघाला 1999 मध्ये पुन्हा एकदा विजेतेपदची संधी मिळाली होती. 1999च्या वनडे विश्वचषकात पाकिस्तानची टीमने अंतिम फेरी गाठली होती, परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
आता पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आमिर सोहेलला वाटते की, 1999 मध्ये पाकिस्तानचा संघ एका लोकल संघाप्रमाणे वनडे विश्वचषकात खेळला. संघ निश्चितच अंतिम फेरी गाठला होता, परंतु त्या सामन्यात 132 धावांवर बाद झाला होता. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मध्ये ऑस्ट्रेलियाला सोपे लक्ष्य मिळाले. जे कांगारू संघाने सहज पार केले.
आमिर सोहेलने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले की, “माझ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगू शकतो की या स्पर्धेदरम्यान संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट संघ स्थानिक संघासारखा खेळला. एका सामन्यात काही फलंदाजीची लाईनअप होती, मग दुसर्या सामन्यात ती लाइनअप बदलली.”
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 6 कसोटी आणि 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा आमिर सोहेल म्हणाला की, “शाहिद आफ्रिदीला सलामीवीर म्हणून प्रयत्न करून संघ व्यवस्थापनाने मोठी चूक केली. कारण अर्थातच तो अष्टपैलू होता, परंतु संघाला गरज असेल तेव्हा तो चांगली ना गोलंदाजी करत होता ना त्याला फलंदाजी करता आली. त्याचे प्रदर्शन सामान्य राहिले.”
आफ्रिदीची संघात निवड करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे आमिर सोहेल यांनी सांगितले.
ते म्हणाले, “आफ्रिदी केवळ कमी उसळी घेणाऱ्या आणि सपाट खेळपट्टीवर चांगला खेळ करत विरोधी संघातल्या गोलंदाजांवर दडपण आणायचा. 1999च्या विश्वचषकातील आव्हानात्मक परिस्थितीत हा एक मोठा धोका होता. त्याला फलंदाजी करणे किंवा गोलंदाजी करणे शक्य नव्हते. वसीम अक्रमच्या जागी मी कर्णधार असतो तर मी मोहम्मद युसुफला संधी दिली असती.”
1999 च्या विश्वचषकात आफ्रिदीने सुमार कामगिरी केली. त्याने संपूर्ण स्पर्धेत खेळलेल्या 7 डावात फक्त 63 धावा केल्या.