एक असा नेता, ज्याने त्याच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत एकदाही लोकसभा निवडणुक जिंकली नाही. तरीही त्यांची गणना महान राजकारणी नेत्यांमध्ये केली जाते. गेल्या ६ वर्षांपासून भारतावर राज करत असणाऱ्या भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे संकटमोचक, व्यवसायाने वकिल असे महान व्यक्तित्त्व म्हणजे ‘अरुण जेटली’.
कसल्याही प्रकारची कुटुंबीय राजकीय पार्श्वभूमी नसतानाही राजकारणाचा उंबरठा ओलांडणारा हा नेता २८ डिसेंबर १९५२ रोजी जन्माला आला. वडील महाराज किशन जेटलींच्या वकिलीचा आणि आई रतन प्रभा यांच्या समाज सेवेचा प्रभाव जेटलींवर पडला होता. लहानपणीपासूनच त्यांना अभ्यासात खूप रुची होती. ‘दिलवाल्यांच्या दिल्ली’त जेटली लहानाचे मोठे झाले होते.
सेंट झेवियर्स विद्यालय, दिल्लीतून आपले विद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण श्रीराम वाणिज्य महाविद्यालियातून पूर्ण केले. त्यानंतर वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्ली विद्यापीठात प्रवेश केला. ७०व्या दशकाच्या सुरुवातीला जेटली यांची भाजपाच्या अखिल भारतीय युवा परिषदेत निवड झाली होती. तिथूनच जेटलींच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली.
१९७४मध्ये जेटली दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनले. त्यांचे हे यश सर्वसाधारण नव्हते. कारण, त्यावेळी भारतात क्राँगेस हा सर्वाधिक शक्तिशाली राजकीय पक्ष होता. आणि त्यांच्या राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा (एनएसयूआय) प्रभाव देशभरातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांवर होता. अशा वेळी जेटलींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बॅनरखाली त्यांच्या विद्यापीठात निवडणूक लढवत भाजपाच्या विद्यार्थी संघटनेचा हिरवा झेंडा हवेत झळकावला होता. त्यांच्या या यशाने दिल्ली विद्यापीठातील एनएसयूआयचे वर्चस्व मोडकळीस आणले होते.
नुकतेच जेटलींनी त्यांच्या राजकीय शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती की, १९७५मध्ये एक मोठा प्रसंग घडला. २५ जून १९७५ रोजी जेटली नारायणामधल्या त्यांच्या घराच्या अंगणात झोपले होते. बाहेरच्या आवाजाने त्यांना जाग आली. पाहिलं तर त्यांचे वडील काही पोलिसांसोबत वाद घालत होते. हे पोलीस जेटलींना अटक करायला आले होते. हे पाहून जेटली त्यांच्या घराच्या मागच्या दरवाज्याने बाहेर पडले. त्याच गल्लीतल्या मित्राच्या घरी त्यांनी ती रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठाच्या व्हाईस चॅन्सलरच्या ऑफिसबाहेर गोळा केलं.
तिथे जेटलींनी एक भाषण दिलं आणि त्या सगळ्यांनी मिळून इंदिरा गांधींच्या पुतळ्याचं दहन केलं. थोड्याच वेळात डीआयजी पी. एस. भिंडर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जेटलींना अटक केले. तिहार जेलमध्ये ज्या सेलमध्ये जेटलींना ठेवण्यात आलं होतं त्याच सेलमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि के. आर. मलकानी यांच्यासह ११ राजकीय कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. जेटलींना याचा खूप फायदा झाला. आपल्या १९ महिन्यांच्या कारागृह यात्रेत जेटलींना वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लोकांना पाहण्याची, त्यांना समजून घेण्याची, राजकारणाचे डावपेच समजून घेण्याची संधी मिळाली. जेटलींसाठी तो त्यांच्या जिवनाचा टर्निंग पाँईन्ट ठरला.
पुढे जाऊन जेटलींनी अनेक राजकारणाशी जुळलेल्या गोष्टींमध्ये आपला सहभाग नोंदवला. जेटलींनी त्यांच्या जिवनात केवळ एकवेळा, २०१४मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी नरेंद्र मोदींचा पूर्ण भारतभर बोलबाला होता. त्यावेळी भाजपाच्या लहान-मोठ्या उमेदवारांनीही लाखो मतांनी विजय मिळवले होते. पण, अमृतसर लोकसभा सीटवरुन निवडणूक लढवणारे जेटली काँग्रेसचे उमेदवार अमरिंदर सिंग यांच्या हातून लाखांहून जास्त मतांनी पराभूत झाले होते. असे असले तरी, २०१४मध्ये भारतात भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते, म्हणून पंतप्रधान मोदींनी जेटलींवर अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती. सोबतच त्यांना कॉर्पोरेट अफेयर्स मंत्री आणि संरक्षणमंत्रीही बनवण्यात आले होते.
हे सगळं काही ठीक आहे, पण सर्वांना विचार पडला असेल की, क्रिकेट क्षेत्रात या राजकारणी नेत्याविषयी आम्ही का एवढी माहिती सांगतोय. तर, अरुण जेटली यांनी त्यांच्या राजकारण क्षेत्रातील योगदानाबरोबर क्रिकेट क्षेत्रातही मोलाचा वाटा उचलला होता.
भारताचे अर्थमंत्री बनण्यापुर्वी जेटली हे दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए)चे अध्यक्ष होते. १९९९ ते २०१२ या १३ वर्षांमध्ये त्यांनी अनेक दिल्लीवासी क्रिकेटपटूंचे भविष्य घडवले होते. त्यांच्या काळात दिल्लीच्या अनेक क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यामध्ये विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, इशांत शर्मा, विराट कोहली अशा अनेक महान क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
जेटली आणि दिल्लीकर क्रिकेटपटूंची नाळ ही आई आणि तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या नाळेप्रमाणे जोडली गेली आहे. भारतीय संघातील अनेक दिल्लीकर क्रिकेटपटू त्यांना आपल्या वडीलांप्रमाणे मानतात. भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या वडीलांचे २००६मध्ये निधन झाले होते. यावेळी जेटलींनी विराटच्या घरी जाऊन त्याच्या वडीलांना श्रद्धांजली वाहिली होती. जेटलींचे भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीरसोबतचे नातेही खूप चांगले होते. पण, जेटलींचे सर्वात जवळचे आणि घट्ट नाते होते ते, ‘नजफगडचा नवाब’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागसोबतचे.
अरुण जेटली आणि विरेंद्र सेहवाग यांच्यातल्या नात्याविषयी बोलण्यापुर्वी आपण सेहवागकडे वळूया.
कायम आपल्याच धूंदीत असणाऱ्या, आलेला चेंडू फक्त लांब टोलावण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सेहवागचा जन्म २० ऑक्टोबर १९७८ ला दिल्लीमध्ये झाला होता. लहान असतानाच सेहवागला क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती. त्याच्या वडीलांनीही त्याला पाठींबा दिल्यामुळे सेहवागने क्रिकेट क्षेत्रात कारकिर्द घडवायचे ठरवले.
अरुण जेटलींच्या डीडीसीए अध्यक्षपदाच्या काळात, १९९७-९८ला सेहवागने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून पदार्पण केले होते. हरियाणा विरुद्ध रणजी ट्रॉफीतील त्याचा पहिला डाव खेळताना सेहवागने खणखणीत ११८ धावांची शतकी खेळी केली होती. तीही ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत. त्यानंतर पुढील हंगामात सेहवागला दुलिप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकडून खेळण्याची संधी मिळाली. या हंगामात तो दुलिप ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज ठरला.
एवढेच नव्हे तर, देशांतर्गत कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर लगेच २ वर्षांनी अर्थात १९९९मध्ये सेहवागला पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण, आपल्या पहिल्या सामन्यात जास्त विशेष कामगिरी न करु शकलेला सेहवाग पुढे २० महिने भारतीय संघातून बाहेर राहिला. त्यामुळे या काळात त्याने देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.
दरम्यान एक वेळ अशी आली की, सेहवागने दिल्ली क्रिकेट संघ सोडण्याचे मन बनवले होते. झाले असे की, सेहवागला हरियाणा क्रिकेट संघाशी जुळण्याची ऑफर मिळाली होती. म्हणून त्याने स्वत:ला हरियाणा संघात सामाविष्ट होण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली होती. पण, सेहवागच्या या निर्णयाची भनक जेव्हा जेटलींना लागली, तेव्हा त्यांनी सेहवागला रोखण्याचे ठरवले. जेटलींनी सेहवागला अशाप्रकारे समजवले की, त्याने हरियाणा संघात सामील होण्याच्या निर्णयाची माघार घेतली होती.
जर सेहवागच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर, सेहवागची गणना भारतीय संघातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद सेहवागच्या नावावर आहे. भारतीय कसोटी इतिहासात २ त्रिशतकांची नोंद करणाऱ्या सेहवागने कसोटीत १०४ सामन्यात २३ शतके केली आहेत. दरम्यान त्याने ८५८६ धावा केल्या आहेत. तर, वनडेत दुसरे सर्वात वेगवान द्विशतक करण्याऱ्या सेहवागने २५१ सामन्यात ८२७३ धावांची नोंद केली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरुपात त्याने १९ सामने खेळत ३९४ धावा केल्या आहेत.
भारताचा या धुरंधर फलंदाजाने २००४मध्ये त्याच्या जिवनातील नव्या पर्वाची सुरुवात केली होती. सेहवागच्या जिवनातील या नव्या पर्वाला अरुण जेटलींनी चार-चाँद लावले होते.
जेटलींनी अनेक दिल्लीकर क्रिकेटपटूंचे भविष्य सवारले होते, हे तर आहेच. पण, त्यांची क्रिकेट क्षेत्रातील चर्चा तेव्हा जास्त रंगली, जेव्हा त्यांनी ‘मुल्तानचा सुल्तान’ म्हणून ओखळल्या जाणाऱ्या सेहवागचे आपल्या सरकारी निवासामध्ये लग्न लावून दिले होते. आपली प्रेयसी अंजली अहलावतला जवळपास ३ वर्षे डेट केल्यानंतर २२ एप्रिल २००४ रोजी सेहवागने तिच्यासोबत लग्न केले. यावेळी अरुण जेटलींनी त्यांच्या दिल्लीतील ९, अशोका रोडवर स्थित असलेल्या सरकारी निवासस्थानामध्ये त्यांच्या लग्नाचे आयोजन केले होते.
१९९९ मध्ये जेटलींना अशोक रोडच्या पक्ष मुख्यालयाच्या बाजूचा तो सरकारी बंगला देण्यात आला होता. जेटलींनी त्यांचा तो बंगला भाजपाच्या नेत्यांना दिला, म्हणजे पक्षाच्या ज्या नेत्यांना राजधानीत घर मिळू शकणार नव्हतं, त्यांना आसरा मिळाला असता. याच निवासस्थानामध्ये क्रिकेटर विरेंद्र सेहवागचे लग्न झाले होते. शिवाय वीरेंद्र कपूर, शेखर गुप्ता आणि चंदन मित्रांच्या मुलांची लग्नंही इथेच झाली.
नेहमी लोकांना मदत करणाऱ्या जेटलींनी सेहवागच्या लग्नाचे पूर्ण आयोजन स्वत: लक्ष घालून करुन घेतले होते. त्यांनी लग्न समारंभाची तयारी करणाऱ्या स्टाफला मदत केली होती. सोबतच कॅटरीनची व्यवस्थादेखील स्वत: केली होती. अगदी आपल्या मुलाच्या लग्नाप्रमाणे सर्व तयारी करुनदेखील जेटलींना सेहवागच्या लग्नाला हजेरी लावता आली नव्हती. त्यावेळी ते बेंगलोरमध्ये प्रचार करण्यासाठी गेले होते. सेहवागच्या लग्नामध्ये अनेक क्रिकेटपटू, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकारणी नेत्यांनी हजेरी लावली होती. मोठ्या धूमधडाक्यात सेहवागचे लग्न झाले होते. सेहवागच्या लग्नाला आता जवळपास १६ वर्षे झाली आहेत. त्याला आर्यवीर आणि वेदांत अशी दोन मुलेही आहेत.
जेटलींच्या आपल्या जिवनातील योगदानाला सेहवाग कधीही विसरु शकणार नाही. आपल्या क्रिकेट कारकिर्दीपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत हात असणाऱ्या जेटलींच्या सहयोगासाठी सेहवाग नेहमी खंबरीपणे उभारला आहे.
२०१५मध्ये अर्थमंत्री बनून जेटलींना एक वर्षही झाले नव्हते की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या नेत्यांसोबत मिळून जेटलींवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्यांचे म्हणणे असे होते की, जेटलींनी त्यांच्या १३ वर्षांच्या डीडीसीए अध्यक्षपदाच्या काळात अनेक घोटाळे केले होते. अशा कठीण परिस्थितीत सेहवागने जेटलींचे पूर्णपणे समर्थन करत त्यांना पाठिंबा दिला होता.
अशा या महान नेत्याने गतवर्षी २४ ऑगस्टला दिर्घ आजारामुळे जगाचा निरोप घेतला. त्यांची काल पहिली पुण्यतिथी होती.
ट्रेंडिंग लेख –
जेव्हा एका कैद्याच्या समर्थनार्थ चक्क खेळपट्टीवर खड्डे करून भरण्यात आले होते तेल…
किचनमधील धुरामुळे झाला होता राडा, चालू क्रिकेट सामन्यात अग्निशामक दल घुसले मैदानात
हे ५ क्रिकेटर आता खेळताय फक्त एक क्रिकेटर म्हणून, भविष्यात होणार आपल्याच संघाचे कर्णधार
महत्त्वाच्या बातम्या –
राजवाड्यासारखे आहे रैनाचे घर, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्
अशाप्रकारे इंग्लंडचे खेळाडूचं ठरले अँडरसनच्या रस्त्यातील काटा, ६०० विकेट्सचा विक्रम हुकला