जगाभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसची झळ आता क्रिकेटविश्वालाही बसत आहे. आता बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफे मोर्तझाचा कोव्हिड-१९ चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ३६ वर्षीय मोर्तझा सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे.
मोर्तझाचा भाऊ मोर्सलीनने क्रिकबझला सांगितले की ‘माझ्या भावाला २ दिवसापासून ताप होता. त्याची काल रात्री तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आवा आहे. त्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.’
मोर्तझाने आपल्या कारकिर्दीत ३६ कसोटीत ७८ विकेट्स, २२० वनडेत २७० विकेट्स आणि ५४ टी२० सामन्यात ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
याआधी मोर्तझाच्या सासुला देखील कोरोना व्हायरसची लागण झाल्येचे वृत्त आले होते. शनिवारी त्याच्या सासूची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यात रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. सासूला कोरोनाची लागण झाल्याने मोर्तझा रविवारी झालेल्या ‘क्रिकेटर वेलफेयर एसोसिएशन ऑफ बांग्लादेश’ च्या बैठकीस उपस्थित राहू शकला नव्हता.
त्याने मार्चमध्ये कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या ३०० कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशमध्ये आता १ लाखापेक्षाही अधिक कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर आली आहेत.
मोर्तझाच्या आधी बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू नफीस इक्बालचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती स्वतः नफीस याने दिली आहे. नफीस हा बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम इक्बालचा मोठा भाऊ आहे. त्याने चितगाव येथील घरामध्ये स्वतःला आयसोलेट केले आहे.
नफीसने २००३ साली बांगलादेश संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या ३४ वर्षीय नफीसने ११ कसोटी सामन्यात ५१८ धावा केल्या आहेत तर १६ वनडे सामन्यात त्याच्या नावावर ३०९ धावांची नोंद आहे.
तसेच आत्तापर्यंत पाकिस्तानच्या काही क्रिकेटपटूंना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यात शाहिद आफ्रिदी, तौफिक उमर, जफर सरफराज, रियाझ शेख या खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका मधील एका क्रिकेटपटूला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच स्कॉटलंडचा मजीद हक हा कोरोना पॉझिटिव्ह आढळणारा पहिला क्रिकेटपटू होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
इंग्लंडला जाण्यापूर्वी शोएब मलिक ‘या’ कारणासाठी भारतात येणार
बांगलादेशच्या पहिल्या कसोटी विजयाचा साक्षीदार असलेल्या क्रिकेटपटूला झाली कोरोनाची बाधा
बीसीसीआयने या संघाला अजून दिले नाही बक्षीसाचे १ कोटी रुपये; या खेळाडूने उपस्थित केला प्रश्न