भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सिडनी क्रिकेट ग्राउंडवर टी२० मालिकेतील अखेरचा सामना खेळला जातो आहे. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात पाच बाद १८६ धावा फटकावल्या आहेत. भारताला मालिकेत ‘क्लिन स्विप’ करण्यासाठी १८७ धावांचे आव्हान पार करावे लागेल.
भारताने जिंकली नाणेफेक
भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाकडून पुनरागमन करणारा कर्णधार ऍरॉन फिंच खातेही न उघडता तंबूत परतला. त्यानंतर मात्र अनुभवी स्टीव स्मिथ व यष्टीरक्षक मॅथ्यू वेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनीही समजूतदारीने खेळत, खराब चेंडूंचा समाचार घेत चौकार षटकार लगावले. दोघांनी दुसऱ्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली.
मॅक्सवेलचा ‘बिग शो’
स्मिथ परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात उतरला. मॅक्सवेलने पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांचा घाम काढायला सुरुवात केली. दरम्यान वेडने मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना फक्त ३६ चेंडूत ५४ धावा तडकावल्या. त्याच्या या स्फोटक खेळीत ३ चौकार व ३ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. मॅक्सवेलला आपल्या खेळीदरम्यान तीन जीवदाने मिळाली.
वेडची आकर्षक खेळी
एका बाजूने मॅक्सवेल भारतीय गोलंदाजांची पिसे काढत असताना वेडने देखील भारतीय गोलंदाजांवर आक्रमण सुरू ठेवले. त्याने ८० धावांची दमदार खेळी केली. त्यात ७ चौकार व २ षटकार समाविष्ट होते. वेड ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला.
भारतीय गोलंदाजांचे पुनरागमन
मॅक्सवेल-वेड जोडीने १० षटकात ९० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकात काहीसे पुनरागमन केले. या पाच षटकांत भारताने ४६ धावा देत ऑस्ट्रेलियाचे ३ गडी बाद केले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर युजवेंद्र चहल व टी नटराजनने प्रत्येकी एक बळी मिळविला. ऑस्ट्रेलियाने २० षटकांच्या अखेरीस १८६ धावा धावफलकावर लावल्या.
भारतीय संघाने वनडे मालिकेत पराभव पत्करल्यानंतर टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. सलग तिसरा विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करण्याची नामी संधी भारतीय संघाकडे असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आपला सन्मान वाचवण्यासाठी खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ऑस्ट्रेलियाच्या नवोदित अष्टपैलूचा दणका; शतकी खेळीनंतर ‘पृथ्वी शॉ’ला केले सापळा रचून बाद
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ