भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनदीप सिंग याला पितृशोक झाला आहे. मनदीप सध्या यूएईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, तो यूएईत असतानाच त्याच्यावर हे भावनिक संकट कोसळले आहे.
पंजाबच्या मुळ जालंधर येथील रहिवासी असलेल्या मनदीप सिंग याचे वडील हरदेव सिंग यांचे आज गुरूवारी (२२ ऑक्टोबर) निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतू, आज त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दुसरीकडे नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
मनदीप सिंग सध्या किंग्ज इलेव्ह पंजाब संघासाठी युएईत असून पुढील सामन्यासाठी दुबईत आला आहे. तो वडीलांच्या अंत्यविधीसाठी भारतात येणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेले नाही.
मनदीप सिंगची क्रिकेट कारकिर्द
२८ वर्षीय मनदीप सिंग भारताकडून ३ टी२० सामने खेळला आहे. यात त्याने ४३.५च्या सरासरीने ८७ धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब व रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाकडून त्याने सामने खेळले आहेत. १० ऑक्टोबर रोजीच त्याने आयपीएल कारकिर्दीतील १००वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला. आयपीएल कारकिर्दीत खेळलेल्या १०० सामन्यात त्याने २१.६९च्या सरासरीने १५६२ धावा केल्या. यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे.