मुंबई । कोरोना विषाणूमुळे टी 20 विश्वचषक 2020 रद्द झाला आणि त्यासह आयपीएल 2020 च्या नियोजनाचा मार्गही मोकळा झाला. मात्र, टी 20 विश्वचषक रद्द झाल्याने आता एमएस धोनीसारखे दिग्गज विश्वचषक खेळू शकतील काय, असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे. कारण आता पुढचा टी 20 वर्ल्ड कप नोव्हेंबर 2021 मध्ये होईल आणि हा भारतीय दिग्गज पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकून राहिल याची शक्यता फारच कमी आहे.
याच महिन्यात धोनी 39 वर्षांचा झाला आहे आणि पुढच्या वर्षी तो 40 वर्षांचा होईल. जरी तो तंदुरुस्त असला तरी त्याचे वय व फॉर्म निवडीत मोठा अडथळा ठरू शकतो. आता हा प्रश्न देखील आहे की धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधीपर्यंत खेळत राहू इच्छित आहे. आता टीम इंडियाला रिषभ पंत आणि केएल राहुलच्या रूपात दोन यष्टीरक्षक फलंदाज मिळाले आहेत, अशा परिस्थितीत धोनीच्या टी 20 वर्ल्ड कप 2021 ची शक्यता फारच कमी आहे. धोनी (एमएस धोनी) अखेरचा सामना आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये खेळला होता आणि हा त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा विश्वचषक असू शकेल.
टी 20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने यावर्षी निवृत्ती मागे घेतली होती, पण टी 20 विश्वचषक 2020 रद्द झाल्यावर आता त्याचे काय होईल हे कोणालाही माहिती नाही. पुढच्या वर्षी ब्राव्होदेखील 38 वर्षांचा होईल आणि आता तो 2021 टी 20 विश्वचषकामध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.
टी -20 क्रिकेटचा बादशहा ख्रिस गेल 2019 पासून टी 20 सामना खेळला नाही. यावर्षी टी -20 विश्वचषक झाला असता तर वेस्ट इंडिजच्या संघाने ख्रिस गेलला संधी दिली असती. नोव्हेंबर 2021 पर्यंत ख्रिस गेल 42 वर्षांचा होईल आणि आता विश्वचषक स्पर्धेत चाहत्यांना हा दिग्गज खेळाडू खेळताना दिसण्याची चिन्ह फारच कमी आहेत.
खतरनाक फलंदाज एबी डिव्हिलियर्स टी 20 विश्वचषक 2020 साठी निवृत्तीनंतर परत येऊ शकेल अशी बर्यापैकी जोरदार चर्चा झाली होती, परंतु आता स्पर्धा रद्द झाल्याने त्याच्या परत येण्याच्या आशा मावळल्या आहेत. पुढच्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत डीव्हिलियर्स 38 वर्षांचा होतील. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ त्याला संधी देणार की नाही हा औत्सुक्याचा विषय आहे. टी 20 वर्ल्ड कप 2020 रद्द झाल्याने डिव्हिलियर्स, डेल स्टेन व्यतिरिक्त इम्रान ताहिर यांनाही फटका बसेल.
‘यॉर्कर स्पेशलिस्ट’ लसिथ मलिंगाने अलीकडेच म्हटले आहे की, टी 20 विश्वचषक 2020 च्या बाद फेरीत खेळण्याचे आपले लक्ष्य आहे. परंतु आता ही स्पर्धाच रद्द झाली आहे, त्यामुळे श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूस धक्का बसला आहे. पुढच्या वर्षी लसिथ मलिंगा 38 वर्षांचा होईल आणि त्याची फिटनेसही तितकीशी चांगली नाही.
अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांना पाकिस्तानच्या टी -20 संघात स्थान मिळाले आहे. हाफिज 39 व शोएब मलिक 38 वर्षांचा आहे. हाफिजने यापूर्वी म्हटले होते की टी 20 विश्वचषक 2020 नंतर तो या खेळाला निरोप देईल, पण आता स्पर्धा रद्द झाल्याने पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार्या टी 20 विश्वचषकात या दोघांचेही खेळणे कठीण झाले आहे.
वाचा- आणि जयसुर्याने भारताच्या सर्वात महत्त्वाच्या क्रिकेटरचे करियर अक्षरश: संपवले