मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये आयपीएलचा १३वा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार केला.
या सामन्यात किंग्ज ११ पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय़ घेतला. मुंबईकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहितने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीला खणखणीत चौकार मारत एक खास विक्रम केला. तो आयपीएलमध्ये ५ हजार धावा करणारा तिसरा खेळाडू झाला.
यापुर्वी सुरेश रैनाने २३ मार्च २०१९ रोजी ५ हजार धावांचा टप्पा पार केला होता. तर विराट कोहलीने २८ मार्च २०१९ रोजी हा कारनामा केला होता. रोहितने १९२ आयपीएल सामन्यात ३१.७२च्या सरासरीने ५०१३ धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी असून त्याने १८० सामन्यात ५४३० तर सुरेश रैनाने १९३ सामन्यात ५३६८ धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये ५ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितची सरासरी सर्वात कमी आहे परंतू त्याने या धावा करताना तब्बल २०१ षटकार मारले आहेत. या सामन्यात रोहितने खेळलेला पहिलाच चेंडू सीमारेषा पार केला. आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार मारण्याचा कारनामा त्याने तब्बल १८व्यांदा केला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
५४३०- विराट कोहली, १८० सामने
५३६८- सुरेश रैना, १९३ सामने
५०१३- रोहित शर्मा, १९२ सामने
४७९३- डेव्हिड वॉर्नर, १२९ सामने
४६४८- शिखर धवन, १६२ सामने