भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मागील २ वर्षांपासून मर्यादीत षटकांच्या भारतीय संघातून बाहेर आहे. तो शेवटचा वनडे सामना फेब्रुवारी २०१८ मध्ये खेळला आहे, तर शेवटचा टी२० सामना ऑगस्ट २०१६मध्ये खेळला आहे. यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने राग व्यक्त केला आहे.
आकाशने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलाताना म्हटले आहे की रहाणे वनडेत चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत होता, तरीही त्याला दूधातून माशी बाजूला करावी तसे वनडे संघातून बाजूला केले गेले.
आकाश म्हणाला, ‘तो चौथ्या क्रमांकावर चांगला खेळत होता. जर त्याने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे, सातत्य राखले आहे आणि त्याचा स्ट्राईक रेटही ९४ च्या आसपास आहे, तरीही त्याला आणखी संधी का नाही देत?’
‘त्याला अचानक वगळण्यात आले. जसे दूधातून माशी बाजूला केली जाते. असे का केले? मला वाटते हे कठोर पाऊल होते.’
याबरोबरच आकाशने असेही म्हटले की रहाणे पारंपारिक पद्धतीने फलंदाजी करतो जे भारतीय वनडे क्रिकेटच्या पद्धतीनुसार योग्य आहे. तसेच रहाणे चांगला खेळत असतानाही त्याला वगळणे हे चूकीचे असल्याचेही आकाशने म्हटले आहे.
आकाश म्हणाला, ‘जर भारत इंग्लंड सारखा झाला असता तर त्यांनी प्रत्येक सामन्यात ३५० धावा केल्या असत्या. या एकमेव मार्गाने ते खेळतात. मग ते त्यांच्या बाजूने जावो अगर न जावो. पण आपण तसे करत नाही. आपण अजूनही पारंपारिक पद्धतीने खेळतो. आपण आजही एक एक खेळी उभी करतो आणि असा संघ निवडतो, जो ३२५ च्या आसपास धावा करुन देऊ शकतो. त्यामुळे रहाणे त्यात फिट झाला असता.’
‘त्यामुळे माझ्या मतानुसार, रहाणे जेव्हा चांगला खेळत होता तेव्हा त्याला वनडे संघातून काढणे योग्य नव्हते. तो दक्षिण आफ्रिकेतही चांगला खेळला होता. मला आठवते २०१८ मधली ही गोष्ट आहे. त्याला आणखी संधी मिळायला हवी.’
रहाणेने आत्तापर्यंत ९० वनडे सामने खेळले असून यात त्याने ३५.२६ च्या सरासरीने २९६२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतकांचा आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने या दरम्यान २७ सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याने या २७ सामन्यात ३६.६५ च्या सरासरीने ८४३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
रहाणेने त्याच्या शेवटचा वनडे सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्यूरियन येथे २०१८ मध्ये खेळला होता, ज्यात त्याने नाबाद ३४ धावा केल्या होत्या.
असे असले तरी रहाणेसाठी आता मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे सोपे असणार नाही. कारण सध्या मधल्या फळीत भारताकडे विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत असे पर्याय आहेत. तर सलामीसाठी रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ असे पर्याय आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
पहिल्या कसोटीसाठी संघात जागा न मिळाल्याने चिडला ‘हा’ इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज
वानखेडेवर २ खुर्च्या आता असणार राखीव, हा व्यक्ती घेऊ शकतो पत्नीसह कोणत्याही मॅचचा आनंद
असा देवमाणूस; ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे सायन्स