मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आज (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा दहावा सामना झाला. नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि बेंगलोर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने ३ विकेट्स गमावत २०१ धावांचा डोंगर उभा केला.
बेंगलोरने दिलेल्या २०२ धावांंच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक आले होते. यादरम्यान रोहितला एक खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी होती. त्याला आयपीएल इतिहासात ५००० धावांचा आकडा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील होण्यासाठी केवळ १० धावांची आवश्यकता होती. परंतु तो ८ धावा करत वॉशिंग्टन सुंदर टाकत असलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पवन नेगीच्या हातून झेलबाद झाला. त्यामुळे त्याचा ५००० धावा करण्याचा विक्रम केवळ २ धावांनी हुकला. आता त्याला २ धावा करण्यासाठी ३ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
२००८पासून आयपीएलचा भाग असलेल्या रोहितने आतापर्यंत १९१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१.६३ च्या सरासरीने ४९९८ धावा केल्या आहेत.
आजवर केवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा फलंदाज सुरेश रैना यांनी हा कारनामा केला आहे. विराट त्याच्या १७९ सामन्यातील ५४२७ धावासंह या यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. तर रैनाने १९३ सामन्यात ५३६८ धावा करत या यादीत दूसरा क्रमांक पटकावला आहे.