मुंबई । 2019च्या विश्वचषकातील सेमीफायनलच्या सामन्यानंतर धोनी निवृत्त कधी होणार या चर्चेला सुरुवात झाली. त्या विषयांवरील चर्चेने आज देखील तितकाच जोर धरला आहे. दरम्यान, एमएस धोनी कधी निवृत्त होणार याचा खुलासा समालोचक संजय मांजरेकर यांनी केला आहे.
2017 साली कर्णधार विराट कोहलीच्या लग्नात संजय मांजरेकर आणि एमएस धोनी यांनी धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भवितव्यावर चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान तो कधी निवृत्त होणार आहे याबाबतची माहिती धोनीने संजय मांजरेकर यांना दिली होती.
मांजरेकर म्हणाले की, “विराट कोहलीच्या लग्नाच्या वेळी मी त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली होती. मला तो म्हणाला की जोपर्यंत मी संघातील वेगवान धावपटूला मागे टाकत आहे, तोपर्यंत मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी स्वत: ला फिट समजेन.
स्टार स्पोर्ट्स ‘क्रिकेट कनेक्ट’ शोमध्ये मांजरेकर म्हणाले की, “सचिन तेंडुलकर आणि धोनीसारखे लोक चॅम्पियन क्रिकेटपटू आहेत. ते खेळाडू कधीच अनफिट दिसणार नाहीत.”
गेल्या वर्षीच्या विश्वचषक उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला होता. या सामन्यानंतर एमएस धोनी क्रिकेटपासून दूर होता. धोनीने आता रांचीमध्ये सराव सुरू केला असला तरी युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून होणार्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तो स्वीकारणार आहे.
“आंतरराष्ट्रीय स्तराच्या तुलनेत आयपीएलमध्ये धोनी खूप यशस्वी होत आहे. याचे एक कारण म्हणजे फलंदाज म्हणून त्याला हे ठाऊक आहे की, तेथे फक्त चार ते पाच गोलंदाज आहेत ज्यांच्याविरुद्ध सावधपणे खेळायचे असते. आयपीएलमध्ये काही चांगले गोलंदाज आहेत आणि काही फार चांगले नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याकडे पाच सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत, त्यातील काही गोलंदाजांना निवडून त्यांच्याविरुद्ध आक्रमक खेळण्यात तो माहीर आहे,” असे मांजरेकर यांनी सांगितले.