मुंबई । इंग्लंड विरुद्ध मॅंचेस्टर येथे खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटीच्या दुसर्या दिवशी शान मसूदने शानदार शतक ठोकले. पहिल्या दिवशी 46 धावांवर नाबाद असलेल्या मसूदने दुसर्या दिवशी आपले चौथे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने 251 चेंडूत शतक पूर्ण केले. या शतकी खेळीत 13 चौकार ठोकले. त्याचे हे शतक खूप खास आहे, कारण पाकिस्तानी क्रिकेट इतिहासातील तो फक्त दुसरा सलामीवीर आहे ज्याने हे खास कामगिरी बजावली आहे.
सर्वांची नजर स्टायलिश फलंदाज बाबर आझमकडे होती परंतु मॅंचेस्टरच्या पहिल्या डावात शन मसूदने बाजी मारली.
मसूदने आपल्या कसोटी कारकीर्दीत शतकाची हॅटट्रिक साधली. मँचेस्टरमधील शतक हे शान मसूदचे सलग तिसरे शतक आहे. त्याने श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. यानंतर त्याने मॅनचेस्टरमध्ये इंग्लंडविरूद्ध शतकही केले आहे. ही कामगिरी करणारा तो दुसरा पाकिस्तानी सलामीवीर आहे. शान मसूदच्या आधी मुदस्सर नझरने 1983 साली सलग तीन कसोटी शतके केली होती. त्याचबरोबर पाकिस्तानकडून शतकांची हॅटट्रिक झहीर अब्बास, मोहम्मद युसूफ, युनिस खान, मिसबाह-उल-हक यांनीही केली आहे.
गेल्या 24 वर्षांत इंग्लंडमध्ये शतक करणारा शान मसूद पहिला पाकिस्तानी सलामीवीर आहे. त्याआधी 1996 मध्ये सईद अन्वरने शतक केले होते. इंग्लंडमध्ये फक्त दोन पाकिस्तानी सलामीवीरांनी दुहेरी शतक ठोकले आहे. 1982 मध्ये लॉर्ड्स येथे मोहसीन खानने 200 धावा केल्या आणि मँचेस्टरमध्ये 1992 मध्ये आमिर सोहेलने 205 धावा केल्या. याशिवाय मुदस्सर नाझर आणि आमिर सोहेल यांनी इंग्लंडमध्ये शतके ठोकली आहेत. आता या यादीमध्ये शान मसूदही आला आहे.
शान मसूदच्या शतका मागे त्याचे धैर्य दडलेले आहे. सन 2016 मध्येही शान मसूद इंग्लंडच्या दौर्यावर आला होता आणि तो सतत स्लिपमध्ये बाद होत होता. त्या दौर्यावर मसूदने 4 डावांत केवळ 177 चेंडू खेळला आणि त्याला एकूण 71 धावा करता आल्या. पण यावेळी मसूदने आपले तंत्र बदलले. त्याने ऑफ स्टंपला कव्हर करून फलंदाजी केली आणि बाहेरचे चेंडू सोडले.
शान मसूदने 156 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 251 चेंडूत त्याने चौथे कसोटी शतक झळकावले.
गेल्या 24 वर्षातील इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात 200 पेक्षा जास्त चेंडू खेळणारा मसूद पहिला पाकिस्तान सलामीवीर आहे.
शान मसूदच्या आधी 1996 मध्ये सईद अन्वरने इंग्लंड दौर्यावर 264 चेंडूत 176 धावांची नाबाद खेळी खेळली होती. इंग्लंडमध्ये 200 हून अधिक बॉल खेळणारा शान मसूद सहावा पाकिस्तानी सलामीवीर आहे.