मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतात आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक हा त्याची पत्नी सानिया मिर्झाला भेटण्यास भारतात येऊ शकत नाही. सानिया आणि शोएब मलिक गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना भेटले नाहीत. दोघेही भेटीसाठी आतुर झाले आहेत.
मलिक आणि सानिया मिर्झा जुलै महिन्यात भेटतील असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मलिकला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी चार आठवड्यांच्या प्रशिक्षणातून मुभा दिली होती. पण भारतात लॉकडाऊन असल्यामुळे तो येऊ शकला नाही.
मे महिन्यामध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सानिया म्हणाली की, “माहीत नाही आम्ही पुन्हा कधी भेटणार. तो पाकिस्तानमध्ये अडकून पडला आहे आणि मी भारतात. आमचा छोटा मुलगा इजहान त्याच्या वडिलांची कधी भेट घेणार हे माहित नाही.”
“आम्ही दोघेही सकारात्मक लोक आहोत. त्यांची आई पासष्ट वर्षांची आहे. त्यामुळे मलिकाला त्याच्या आईजवळ राहणे गरजेचे आहे. आम्ही सर्वजण चांगले असून या संकटातून बाहेर पडू,” असे सानिया मिर्झाने सांगितले.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विमानसेवा बंद आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतरच मलिकला भारतात येण्यास परवानगी मिळू शकते. भारतात विमानसेवा सुरू झाली नाही तर तो इंग्लंड दौऱ्याकडे रवाना होऊ शकतो.