१९८३ साली जेव्हा भारतीय संघ विश्वचषकासाठी इंग्लंडसाठी रवाना झाला तेव्हा जगातील कोणीही या संघावर पैज लावली नसती की हा संघ विश्वचषक जिंकेल. खरंतर याचाच फायदा भारतीय संघालाही झाला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाने १९८३ च्या विश्वचषकात वेस्ट इंडीजच नव्हे तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्या विरुद्ध सामने जिंकत विश्वचषक जिंकला.
२२ जून १९८३ ही तारीख भारतीय क्रिकेटसाठी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापेक्षा कमी नाही. कारण या दिवशी टीम इंडियाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा त्यांच्या घरच्याच मैदानावर पराभव केला होता आणि विश्वविजेतेपद आपणच मिळू शकतो असा आत्मविश्वास निर्माण केला. मज्जा-मस्तीसाठी इंग्लंडमध्ये गेलेल्या संघाला कर्णधार कपिल देवने एक मिटिंग घेऊन संघामध्ये विश्वास निर्माण केला. त्याने आपल्या टीमला सांगितले की, ”जवानों….! चलो खेलो, लड़ो, हम खेलेंगे, मज़ा करेंगे.”
स्पर्धेला सुरुवात-
गटफेरीत पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले. पुढे झिम्बाब्वेवरील विजयानंतर संघाची ताकद वाढली. कारण झिम्बाब्वेच्या याच संघाने या सामन्याआधी बलवान ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. परंतु दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाची विजयी गाडी रुळावरून घसरली आणि प्रथम ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर वेस्ट इंडिजने भारताला पराभूत केले. परंतु यानंतर, ऐतिहासिक सामन्यात कपिलच्या १७५ धावांच्या खेळीमुळे भारताने पुन्हा झिम्बाब्वेला पराभूत केले तसेच अ गटातील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. या विजयांमुळे भारतीय संघात कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला की आता आम्ही कोणत्याही संघाचा पराभव करू शकतो.
२२ जून १९८३ – भारत वि. इंग्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड, उपांत्य फेरी सामना-
ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठल्यानंतर पुढे इंग्लंड विरुद्ध खेळायचं होतं. पण माध्यमांमधून संपूर्ण जग अजूनही असे गृहित धरत होते की इंग्लंडमध्ये इंग्लंडला हरवणे सोपे नाही.
भारतीय संघाचा प्रवास उपांत्य फेरीच्या पलीकडे जाऊ शकणार नाही असे काहींना वाटत होते. इंग्लंडचा संघ भारतीय संघाकडे अशा रीतीने पाहत होता की, जणू त्यांचा उपांत्य फेरीतील सामना एखाद्या सामान्य शाळेच्या संघाबरोबर होणार आहे. पण इंग्लंडच्या याच अतिआत्मविश्वासाने भारताला मदत झाली.
ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford Cricket Ground) मैदानावर इंग्लंडचा कर्णधार बॉब विलिसने (Bob Willis) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीची निवड केली. इंग्लंडकडून ग्रीम फॉलर (Graeme Fowler) ३३ धाव आणि ख्रिस टॉवर (Chris Tavaré) या सलामी जोडीने ३२ धावा करत चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. पण रॉजर बिन्नीने (Roger Binny) ख्रिस टॉवरला बाद करत संघाला पहिला बळी मिळवून दिला. यानंतर, बिन्नीनेच इंग्लंड ८४ धावांवर असताना फॉलरला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.
पण जेव्हा इंग्लंडच्या १५० धावांवर जेव्हा ५ विकेट गेल्या होत्या तेव्हा भारतीय संघाच्या दृष्टीने इयान बोथम (Ian Botham) याची एक महत्त्वपूर्ण विकेट बाकी होती. त्याआधी इंग्लंडचा सर्वात मजबूत फलंदाज एलन लंबही (Allan Lamb) २९ धावा करून धावबाद झाला होता. अखेर कीर्ती आझादने (Kirti Azad) बोथमची अवघ्या ६ धावांवर अशी दांडी उडवली, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया सामना पाहणारा माणूस वाचू शकेल. बघता-बघता इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाज कपिल देव, अमरनाथ, आझाद आणि बिन्नीने यांनी ६० षटकांत २१३ धावांवर रोखले.
पहिला डाव संपून संघ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला-
ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव आणि अनुभवी खेळाडू सुनील गावस्कर यांनी संपूर्ण संघाला समजावून सांगू लागले. ते प्रत्येक खेळाडूला वारंवार सांगत होते – ”एक चांगली सुरुवात आणि दोन चांगल्या भागीदारीनंतर सामना आपलाच आहे.”
पण भारतीय संघाची सुरुवात पाहिजे तशी झाली नाही. भारतीय संघाने ५० धावांमध्ये दोन गडी गमावले. संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर २५ धावा आणि कृष्णमाचारी श्रीकांत (K. श्रीकांत) १९ धावा करून पॅवेलियनमध्ये परतले होते. पण त्यानंतर मोहिंदर अमरनाथ आणि यशपाल शर्मा यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. संपूर्ण स्पर्धेत अमरनाथ संघाचे तारणहार होते. ते वेळे प्रसंगी स्वतःचा खेळ बदलत होते. ते संघाच्या फलंदाजीचा कणा होते. त्यावेळी अमरनाथ आणि यशपालने ९२ धावांची भागीदारी केली.
आता आपण सामन्यात परत येऊ असा आत्मविश्वास भारतीय ड्रेसिंग रूममध्ये त्यांनी जागृत झाला. त्या सामन्याचे वातावरण इतके तणावपूर्ण होते की ही भागीदारी पाहता, कीर्ती आझाद, संदीप पाटील आणि स्वत: कर्णधार कपिल देवही पॅड बांधून सज्ज होते. सुनील गावस्करदेखील तणावात दिसत होते. कपिल देव इतके दबावामध्ये होते की ते एका जागी बसून राहूही शकले नाहीत. ते वारंवार खाली येत होते. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी संघाचा सर्वात अनुभवी स्टार सुनील गावस्कर यांना विचारले, की पुढच्या विकेटनंतर कोणाला पाठवावे. गावस्करांनी एकाच उत्तर दिले,
“घाबरण्याची गरज नाही, जी फलंदाजीची क्रमवारी आहे त्याच प्रमाणे पुढील फलंदाज पाठव, हा सामना आपण नक्की जिंकणार आहोत.”
भागीदारी तुटली आणि…
अमरनाथ आणि यशपाल खूप चांगले खेळत होते. भारताला आता १०८ चेंडूत ८६ धावांची गरज होती. परंतु विजयासाठी अवघ्या ७२ धावा हव्या असताना अमरनाथ ४६ धावांवर धावबाद झाले आणि इंग्लंड संघात आनंदाचे वातावरण पसरले. मैदानावर बसलेल्या ब्रिटिश चाहत्यांना विजयाचा सुगंध येऊ लागला. एकीकडे षटकामागे धावांची सरासरी वाढत होती आणि दुसरीकडे भारताची महत्त्वपूर्ण भागीदारी तुटली होती.
संदीप पाटीलने इंग्लंडच्या घशातून सामना खेचून काढला….
आता कपिल देव यांनी संदीप पाटील यांना मैदानात पाठवले. ते मैदानावर आले आणि यशपाल शर्मा यांना एकच सांगितले, “तू बस ६० षटकांपर्यंत टिकून राहा, मी माझं काम करतो”
मैदानात उतरताच, जशी गोलंदाजी होईल त्यानुसार फलंदाजी करणार हे संदीप यांनी मनामध्ये ठाम केले होते. बॉब विलिसने एक कमी गतीचा चेंडू टाकला आणि संदीप यांनी त्या चेंडूला सीमारेषा दाखवत चौकार मिळवला. संदीप यांनी मारलेला तो फटका क्रिकेटच्या कोचिंग बुकमध्ये कुठेच नाही. पण त्या फटक्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ते त्यांच्या नैसर्गिक पद्धतीने खेळायला लागले. या सामन्याआधीही त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध ९२.५९ च्या सरासरीने तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२० च्या सरासरीने खेळ केला होता. पाटील यांनी ३२ चेंडूंत ८ चौकारांसह ५१ धावांची तुफानी खेळी केली आणि हा सामना भारताच्या बाजूने झुकवला.
विजयापूर्वीच भारतीय चाहते मैदानात धावले…
५५ व्या षटकात कपिल देव यांनी २ धावा घेतल्याबरोबर मैदानावरील भारतीय चाहत्यांचा असा समज झाला की भारतीय संघाने हा सामना जिंकला. सर्व चाहत्यांनी सुरक्षा घेरा फोडून मैदानात धाव घेतली.
हे पाहून सुरक्षा रक्षक आणि पंच डॉन ओस्लर आणि डेव्हिड इव्हान्स खेळाडूंच्या बचावासाठी खेळपट्टीवर पोहोचले. पंचांनी हातात स्टंप घेऊन चाहत्यांना पळवून लावण्यासाठी उभे राहिले. त्वरित सर्व प्रेक्षकांना मैदानातून बाहेर हटवले.
पण त्यानंतर, जे मॅनचेस्टरच्या मैदानावर घडले, ते क्रिकेटच्या इतिहासात फारच कमी वेळा घडले. इंग्लंडचा कर्णधार बॉब विलिसने आपल्या सर्व खेळाडूंना ऑफ साइडच्या विकेटजवळ बोलावले. वास्तविक, भारतीय प्रेक्षक ऑन साइडला मोठ्या संख्येने होते. यामुळे, इंग्लंडचा कर्णधार समजून गेला की आपल्या खेळाडूंना धक्का-बुक्की होऊ शकते.
भारताला विजयासाठी आता फक्त १ धाव हवी होती. यष्टीरक्षक आणि गोलंदाज वगळता संपूर्ण इंग्लंडचा संघ ऑफ साईडला एकत्र उभा होता, हे सर्व पाहून संदीप पाटील आणि कपिल देव मोठ्याने हसत होते.
यानंतर विलिसच्या चेंडूवर विकेटच्या मागे चौकार मारला आणि टीम इंडियाने हा ऐतिहासिक उपांत्यफेरीचा सामना जिंकली. जसा चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे गेला तसे भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी प्रेक्षकांना टाळण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने ड्रेसिंग रूमच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी भारतीय संघ विश्वचषकाच्या अगदी जवळ पोहचला होता. केवळ १ पाऊल मागे होता. हे शेवटचे पाऊल भारतीय संघाने २५ जूनला क्लाईव्ह लॉईडच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत पुढे टाकले आणि विश्वचषक हाती घेतला.