– प्रणाली कोद्रे.
प्रिय, सुरेश रैना,
काल वाईट वाटलं, कशाच काय अर्थातच तू निवृत्ती घेतली याचं. म्हणजे तू निवृत्ती जवळच्या काही दिवसात घेशील असं अपेक्षित होतंच. कारण गेले २ वर्ष तू आयपीएल सोडून असं कितीसं क्रिकेट खेळला आहेस आणि त्यात तूला झालेल्या दुखापती. पण तरी वाईट वाटलं मला, तू निवृत्त झाल्यापेक्षाही तू काल धोनीच्या मागोमाग निवृत्ती घेतली याचं. आता अनेकजण मला हे देखील ऐकवतील की तू धोनीचा मित्र आहेस आणि तू या मैत्रीला जागून निवृत्ती घेतली. सगळं मान्य आहे. तू मैत्रीच एक नवीन उदाहरण सर्वांसमोर मांडलस, पण मित्रा तूझ्यातील खेळाडूला का हरवलंस.
अनेकांना तू मैत्रीची मिसाल वैगरे वाटला आणि आहेसच, त्यात वादच नाही. पण तरीही तूझा कालचा निर्णय जरा चूकलाच असे मला तरी वाटते. यामागे काही कारणे आहेत. तीच कारणे तूझ्या समोर मांडायची आहेत. अर्थात तूझा निर्णय पटला नाही म्हणजे काही मी तूझा तिरस्कार वैगरे करते अशातला भाग नाही. तू माझा आवडत्या खेळाडूंपैकी एक होतास आणि आहेस. पण खेळाडू म्हणून.
बरं तूझा निर्णय न पटण्यामागची कारणं –
१. मैत्रीचं दिलं वेगळं उदाहरण, पण सर्वांचा आवडता रैना कुठेय यात?
सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणताही खेळाडू खेळ खेळतो त्यामागे, त्याची स्वत:ची मेहनत असते. तू एकदा विचार करुन पहा जेव्हा तू क्रिकेट खेळायला सुरुवात केलीस आणि टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न पाहिले, तेव्हा तूझ्या भावना काय होत्या. तू क्रिकेटमध्येच करियर करायचं हा निर्णय तूझ्या मित्राने घेतला म्हणून घेतलास का? नाही ना, तू एक खेळाडू म्हणून तूझं खेळावरचं प्रेम म्हणून घेतला असशील ना. त्यासाठी तू किती मेहनत घेतलीस. अगदी हॉस्टेलमध्ये सिनियरचं रॅगिंगही सहन केलंस. त्या मेहनतीचं फळ म्हणून तूला भारतीय संघाचा भाग बनता आले. मग असं असताना निवृत्तीचा निर्णय मित्राने घेतला म्हणून मी सुद्धा हे तूझं तूला तरी पटतं का.
तूझी इतक्या दिवसांच्या मेहनतीचं काय. तू खेळाडू म्हणून केलेल्या कामगिरीचं काय. लोकांनी तूझ्यावर प्रेम केलं ते तू धोनीचा मित्र म्हणून नाही तर एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून. तूझं भारतीय क्रिकेटमधील योगदान दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नव्हतं. पण मग तू याच खेळाला धोनीचा मित्र म्हणून अलविदा कसं म्हटलंस. अरे मान्य आहे, मैत्रीच नातं खूप मोठं असतं. मैत्रीला सगळेच मानतात. क्रिकेटमध्ये तूझ्या आणि धोनीच्या मैत्रीप्रमाणे अनेक खेळाडूंची मैत्री आहे. संगकारा-जयवर्धने, एबीडी-डु प्लेसिस, अँडरसन-कूक, पण मैत्री आहे म्हणून त्यांनी त्यांच्यातील स्वाभिमान गमावला नाही. तूझी आणि धोनीची मैत्री नक्कीच ग्रेट आहे, पण या मैत्रीला जपताना तू मात्र तूझ्यातल्या खेळाडूचा अपमान केलास. ज्यासाठी तू इतकी मेहनत घेतली होतीस.
२. निवृत्ती मागचा विचार –
प्रत्येक खेळाडूसाठी त्याची निवृत्ती हा फार मोठा निर्णय असतो आणि तूमच्या सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंसाठी तर तो अधिक मोठा आणि भावनिक. हा निर्णय घेताना प्रत्येक खेळाडूचा एक विचार असतो. धोनीने घेतलेला निर्णय फार विचार करुन घेतलेला असेल, हे त्याच्या व्हिडिओवरुन स्पष्ट होते. त्याने क्रिकेटमध्ये सर्वकाही मिळवले होते. त्यामुळे तो हा निर्णय लवकरच घेणार होता हे स्पष्ट होते.
पण तू तर भारतीय संघात कमबॅकची स्वप्न पाहत होतास. तू लॉकडाऊन असतानाही किती मेहनत घेतलीस, तूझ्या दुखापतीनंतरही तू पुन्हा जिद्दीने सरावाला सुरुवात केली होतीस. तू सतत धडपडत होतास. या लॉकडाऊन दरम्यान मेहनत घेताना खूप कमी क्रिकेटर दिसले, त्यात तू होतास आणि तू सर्वांपेक्षा अधिक कष्ट करताना दिसत होतास. तू प्रत्येकवेळी जेव्हाही सोशल मीडियातून लाईव्ह येत होतास तेव्हा, हेच सांगत होतास मला टीम इंडियात परत यायचं आहे. तूझी मेहनत आणि इच्छा पाहून वाटत होतं, कदाचीत हा यशस्वी होईल आणि पुन्हा भारतीय संघात येईलही. तसं तूझं वयही तूझ्या बाजूने होतंच की तू आत्ताशी ३३ वर्षांचा आहेस. हे सगळं तू टीम इंडियात परतण्यासाठी करत होतास. पण काल भावनिक होतं तू झटक्यात निर्णय बदललास, कशासाठी? बरं घेतलास निर्णय त्यात काहीच चूक नाही. पण तू निवृत्ती घेतानाही काय पोस्ट केलीस? तर ”माही, तुझ्यासोबत खेळने हा एक चांगला प्रवास होता. अतिशय़ अभिमानाने मी तुझ्यासोबत माझ्याही निवृत्तीची घोषणा करत आहे.”
या पोस्टनंतर वाटलं की तूझ्यातील खेळाडूला काही इज्जत राहिली का मग. मित्राने केले म्हणून मी पण करणार, म्हणजे मैत्री का? एखाद्या खेळाडूची निवृत्ती ही नक्कीच त्याचा वैयक्तिक निर्णय असतो. पण प्रत्येक खेळाडूच्या भावना त्या खेळाशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूसाठी हा निर्णय जितका मोठा असतो तितकाच भावनिक. पण तू मात्र माझा मित्र थांबतोय म्हणून मी पण थांबतो, असं केलसं. अरे पण मित्र असला तरी तूम्ही व्यक्ती म्हणून वेगळे आहात, तूमच्या क्षमता वेगळ्या होत्या आहेत, तूला धोनीची मैत्री लाभली कारण तू सुद्धा एक क्रिकेटपटू होतास, हे कसं विसरला तू.
३. प्रसिद्धी फक्त धोनीलाच –
आज भारतात सचिननंतर कोणत्या क्रिकेटपटूला सर्वाधिक प्रेम मिळाले असेल, तर तो धोनी होता. त्यामुळे धोनीचा निवृत्तीचा निर्णय अनेकांना चटका लावून गेला. जरी तो अपेक्षित असला तरी. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर फक्त सगळीकडे धोनीच आहे. अगदी जो रोज क्रिकेटला फॉलो करत नाही त्यालाही धोनी माहित आहे, आणि तोही आज म्हणतोय, अरे धोनी निवृत्त झाल्याच वाईट वाटलं. अगदी भारतीय आजी-माजी खेळाडूच नाही, तर परदेशी खेळाडू, राजकिय नेते, अभिनय क्षेत्र, अशा विविध क्षेत्रातून धोनीबद्दल प्रतिक्रिया आल्या. अगदी आयसीसी देखील कालपासून धोनीबद्दल सातत्याने पोस्ट करत आहे. त्यातही तूझा उल्लेख आहे थोडाफार म्हणा, पण तोही नगण्यच.
पण या सर्वांमध्ये प्रत्येकजण हे विसरला की सुरेश रैना नावाचा एक खेळाडू होता, जो धोनीबरोबर भारतीय संघाकडून खेळला. त्यानेही निवृत्ती घेतली. यात हाईट म्हणजे बीसीसीआयने तर तूझ्याबद्दल एक पोस्टही केली नाही. आरपी सिंग या तूझ्या संघसहकाऱ्याला तूझ्याबद्दल पोस्ट करताना म्हणावं लागलं ‘कदाचीत लोक रैनाही निवृत्त झालायं हे विसरलेत.’ तसं तूझ्याबद्दल अनेकांनी पोस्ट केलं पण ज्याप्रमाणे धोनीबद्दल लिहिलं गेल, तसं तूझ्याबद्दल फक्त लिहावं लागतंय किंवा शास्त्र असंत ते, असं म्हणून लिहिलं गेलं.
तूझं भारतीय क्रिकेटमधलं योगदान इतकं कमी होतं का की तूला विसरलं जावं. आता हे म्हणणं चूकीचं ठरेल की तूला धोनीच्या लोकप्रियतेबद्दल कल्पना नव्हती. हे जर जगाला माहित होतं की ज्या दिवशी धोनी निवृत्त होईल त्यावेळी क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास सर्वदेशांमधून त्याला सन्मान दिला जाईल. असं असताना तूझ्या निवृत्तीचा निर्णय धोनीच्या निर्णयानंतर तासाभरात येणं आणि तेही एक खेळाडू म्हणून नाही तर धोनीचा मित्र म्हणून येणं हे न समजण्यासारखं आहे.
४. लोकांसाठी आठवणी राहिल्याच नाहीत –
सुरेश रैना, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. भारताचा तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करणारा पहिला खेळाडू, टी२०मध्ये भारताचा सर्वात युवा कर्णधार. मला वाटतं असे अनेक विक्रम तूझ्या नावावर आहेत. तू कसोटी पदार्पणात शतक केलं होतंस आणि तू २०११ च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध युवराज बरोबर ६ व्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ७४ धावांची भागीदारी केली, तसेच उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अन्य फलंदाजांच्या विकेट जात असताना एक बाजू सांभाळत नाबाद ३६ धावा करून भारताला २६० धावांपर्यंत पोहचवण्यात तू उचललेला महत्त्वाचा वाटा. हे सर्व लक्षात ठेवण्यासारखं आहे. खरंतर २०११ च्या विश्वचषकात तू केलेली कामगिरी दुर्लक्षित राहिली असली तरी ती फार महत्त्वाची होती. खरं म्हणजे तू अशा अनेकदा छोटेखानी पण महत्त्वाच्या खेळी केल्यास. हे सर्व सांगण्यामागचा हेतू इतकाच तूझं भारतीय क्रिकेटमधील योगदान नक्कीच महत्त्वाचं होतं आणि ते तूझ्या निवृत्तीनंतर सर्वांना समजायलाही हवं होतं. पण तूझ्या निवृत्तीनंतर चर्चा कशाची झाली, याचा एकदा विचार कर.
प्रत्येकाने धोनीबरोबर तूझ्याबद्दलही स्टेटस टाकले. पण त्याचं कॅप्शन काय होतं माहित आहे, ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’,’कट्टर मित्र’ वैगरे. अरे पण तूला असं वाटत नाही का यातून तू मित्र म्हणून नक्कीच जिंकलास, पण खेळाडू म्हणून तूझा अपमान झाला आणि तो तू स्वत: करुन घेतलास. काल असं वाटलं तूझ्यासाठी जे काही केलं ते धोनीनेच केले, धोनीनेच तूला घडवलं, पण तूझ्या कारकिर्दीत तूझी मेहनत होतीच ना. तूझी धडपट होतीच ना. पण आता हे कोणीच बोलत नाही. उद्या तूझ्याबद्दल काय आठवण काढली जाईल, अरे तो सुरेश रैना ज्याने धोनीने निवृत्ती घेतली म्हणून निवृत्ती घेतलेला, अरे मैत्री असावी तर अशी. वैगरे. पण मग तूझ्या कारकिर्दीच्या आठवणी काय?
आत्ताच्या पिढीला ज्यांनी नुकतेच क्रिकेट पहायला सुरुवात केली असेल, त्यांना काल धोनीबद्दल एक खेळाडू, कर्णधार म्हणून खूप काही ऐकायला वाचायला मिळाले, पण तूझ्याबद्दल. तूझी केवळ मित्र म्हणूनच ओळख कळाली. तू कसा खेळाडू होता, तू किती भारी होता. हे कोणाला कळालंच नाही आणि बहुदा कळणारही नाही. कारण यापुढे तूझी ओळख धोनीचा मित्र अशीच राहिल, तू धोनीपाठोपाठ निवृत्ती घेऊन मित्रता राखली पण खेळाडू म्हणून तूझ्या असणाऱ्या ओळखीला मोठा धक्का दिलास इतकं नक्की मित्रा.
तू जर एक खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली असतीस तर चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं. तूझ्याल्या खेळाडूला प्रत्येकानी सलाम केला असता. पण…
असो, म्हणूनच वाईट वाटलं की तूझ्या कामगिरीबद्दल कोणीच बोलले नाही. पण मला असं करायचं नाही, म्हणून सुरुवातीला सांगितलं तेच पुन्हा सांगते तू माझा आवडता खेळाडू आहेस आणि राहशील. तूझ्यातल्या मित्रत्वाला मानलं, पण तरीही तूझ्यामधल्या खेळाडूला सलाम!