मुंबई । बॉलिवूडचा स्टार अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करत जीवन संपवले. सुशांतची ही बातमी कळताच अनेकांना धक्का बसला. बॉलिवूडसह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. त्याच्या आत्महत्येचे अद्याप कारण कळले नाही. मात्र तो गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक तणावात होता. मानसिक तणावामुळे त्याने हे अंतिम टोकाचे पाऊल उचलले असे सांगितलं जात आहे.
आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच भुरळ घालणाऱ्या सुशांतने भारताचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी यांच्यावर आधारित ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली. या चित्रपटामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशामुळे सुशांत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर देखील चित्रपट काढण्याच्या विचारात होता. यासाठी तो सौरव गांगुली यांना भेटण्यासाठी 2018 साली कोलकात्याला गेला होता. त्यावेळी सौरव गांगुली एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. ज्या ठिकाणी ही शूटिंग चालू होती त्या ठिकाणी सुशांत सौरव गांगुली यांना भेटण्यासाठी गेला. दोघांमध्ये चित्रपटासंदर्भात तासभर चर्चा झाली.
या भेटीदरम्यानचा एक फोटो सुशांतने सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, “मी माझा उत्साह दाबून ठेवू शकलो नाही. दादासोबत हा फोटो काढताना चेहऱ्यावरचे हावभाव. दादा एक खूप चांगले व्यक्तिमत्त्व आहे. महान लोकांपैकी एक.”
एमएस धोनीच्या चित्रपटात केलेल्या अभिनयाने सुशांतचे सारे जण कौतुक केले होते. गांगुलीने देखील सुशांतचे कौतुक केले होते. सुशांतने आपल्या भेटीदरम्यान दादाला डाव्या हाताने फलंदाजी करतानाचे त्याचे व्हिडिओ दाखवला होता. दादांच्या चित्रपटात क्रिकेटची माहिती देण्याचे ठरले होते. पण हा चित्रपट तयार झाला नाही. सौरव गांगुलीवर आधारित चित्रपट काढण्याचे सुशांतचे स्वप्न अपूर्ण राहिले.