भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी २०२० चा एशिया कप रद्द करण्यात आल्याचे परवा सांगितले. त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिलेला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, सतर्कता म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
आशियामध्ये क्रिकेटचा प्रसार व्हावा, या उद्देशाने १९८४ पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. आत्तापर्यंत भारताने ७ सातवेळा या स्पर्धेचेचे जेतेपद मिळवले आहे. भारतापाठोपाठ श्रीलंकाने ५ व पाकिस्तानने २ विजेतेपदे पटकावली आहेत.
आज आपण भारतीय संघाला विजेतेपदे मिळवून देणाऱ्या पाच कर्णधारांविषयी जाणून घेऊया.
१) सुनील गावसकर ( Sunil Gavaskar) १९८४
भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली आशिया कपच्या पहिल्या आयोजनात भारताने आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत भारत पाकिस्तान व श्रीलंका हे तीन संघ सहभागी झाले होते. साखळी सामन्यात या दोन्ही संघांवर मात करत भारत अशिया कपचा पहिला मानकरी ठरला. या स्पर्धेचे आयोजन शारजा मध्ये करण्यात आले होते.
२) दिलीप वेंगसरकर ( Dilip Vengsarkar) १९८८
अशिया कपच्या तिसऱ्या आयोजनाचे विजेतेपद भारताने मुंबईकर दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वाखाली जिंकले. भारत-पाकिस्तान आणि श्रीलंके व्यतिरिक्त पहिल्यांदाच स्पर्धेचे नियोजन करणारा बांगलादेश अशिया कप मध्ये सहभागी झाला होता. भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला सहा गड्यांनी पराभुत केले.
३) मोहम्मद अजहरुद्दिन (Mohammad Azharuddin) १९९१ व १९९५
प्रथमच भारतीय संघ मोहम्मद अजहरुद्दिन याच्या नेतृत्वाखाली आशिया चषकात सहभागी झाला होता. आशिया चषकाचे हे सत्र भारतात आयोजित करण्यात आले होते. राजकीय कारण देत पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला नाही. श्रीलंकेला अंतिम सामन्यात हरवत भारताने आपले विजेतेपद राखले.
१९९३ ची स्पर्धा भारत व पाकिस्तान दरम्यान राजकीय ताणतणाव वाढल्याने रद्द करण्यात आली.
१९९५ मध्ये अशिया कप स्पर्धा ११ वर्षानंतर आखाती देशांमध्ये आयोजित केली गेली. पुन्हा एकदा श्रीलंकेला मात देत भारताने अशिया कप विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. मोहम्मद अजहरुद्दिन भारताला सलग २ अशिया कप मिळवून देणारा पहिला कर्णधार ठरला.
४) एमएस धोनी (MS Dhoni) २०१० व २०१६
१९९५ नंतर पंधरा वर्ष भारताला आशियाचा बादशहा होता आले नाही. २०१० मध्ये श्रीलंकेत आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमानांना पराभूत करत भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वात विजेतेपद आपल्या नावे केले.
२०१६ मध्ये टी२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून प्रथमच आशिया कप स्पर्धा टी२० स्वरूपात घेण्यात आले. सलग तिसऱ्यांदा बांगलादेश स्पर्धेचे आयोजन करत होता. अंतिम सामन्यात भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या बांगलादेशला धुळ चारली. वनडे आणि टी२० या दोन्ही प्रकारात विजेतेपद मिळवून देणारा एम एस धोनी पहिला कर्णधार ठरला.
५) रोहित शर्मा ( Rohit Sharma) २०१८
आशिया कपच्या इतिहासातील सर्वात रोमांचकारी सत्र म्हणून या सत्राची नोंद आहे. यूएई मध्ये आयोजित स्पर्धेत भारत विराट कोहलीच्या अनुपस्थित रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला. अफगाणिस्तान या स्पर्धेत जायंट किलर ठरला. त्यांनी श्रीलंकेला मात दिली, भारतासोबतचा सामना बरोबरीत सोडवला, तसेच पाकिस्तान व बांगलादेशला विजयासाठी झगडवले. अंतिम सामना भारत-बांगलादेश दरम्यान झाला. बांगलादेशने दिलेले २२२ धावांचे लक्ष्य भारताने अखेरच्या चेंडूवर पार करत विजयाला गवसणी घातली.