मुंबई । आयसीसीने टी20 विश्वचषक पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल 2020 ची तयारी सुरू केली आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी हा लीग आयोजित करण्याच्या तयारीविषयी बोलताना हे स्पष्ट केले की, आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. त्यानंतर हा प्रश्न कायम आहे की उर्वरित क्रिकेट बोर्ड त्यांच्या देशातील खेळाडूंना या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी एनओसी (ना हरकत पत्र) देतील की ही लीग केवळ भारतीय खेळाडूंमध्ये आयोजित केले जाईल.
अलीकडेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की, या लीगमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या खेळाडूंना एनओसी देण्यास तयार आहे. त्यानंतर आता क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या खेळाडूंना एनओसी देण्याबाबतचे प्रतिक्रिया दिली आहे.
या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या खेळाडूंना एनओसी देण्यास तयार असल्याचे दक्षिण आफ्रिकेने स्पष्ट केले आहे. एएनआयशी बोलताना दक्षिण आफ्रिकेचे मीडिया मॅनेजर कोकेटो गोफेटोजे म्हणाले की, “क्रिकेट दक्षिण आफ्रिका निश्चितपणे इंडियन प्रीमियर लीगसाठी एनओसी देईल.”
दक्षिण आफ्रिकेपूर्वी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या क्रिकेट मंडळानेही आपल्या खेळाडूंना एनओसी देण्याचे स्पष्ट केले आहे.
एबी डिव्हिलियर्स (आरसीबी), ख्रिस मॉरिस (आरसीबी), डेल स्टेन (आरसीबी), क्विंटन डी कॉक (मुंबई इंडियन्स), फाफ डु प्लेसिस (सीएसके), इम्रान ताहिर (सीएसके), लुंगी एन्गीडी (सीएसके), कॅगिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल), हार्दस विलोसेन (किंग्ज इलेव्हन पंजाब), आणि डेव्हिड मिलर (राजस्थान रॉयल्स) हे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल 2020 मध्ये खेळताना दिसतील.