अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात येत्या ४ मार्चपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
सध्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला ही मालिका जिंकण्याबरोबरच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल होण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय किंवा मग सामना अनिर्णित ठेवणे गरजेचे आहे. तर इंग्लंड संघ मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल.
यावर्षीचा सर्वात यशस्वी संघ बनण्याची दोन्ही संघांना संधी
चालू २०२१ वर्षात दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ कसोटी सामने खेळले आहेत. या ५ सामन्यांपैकी दोन्ही संघांना प्रत्येकी ३ सामने जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात जो संघ जिंकेल तो यावर्षात आत्तापर्यंत (८ मार्चपर्यंत) सर्वाधिक सामना जिंकणारा संघ ठरेल.
आत्तापर्यंत भारताने ५ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले असून १ सामना इंग्लंड विरुद्ध पराभूत झाला आहे आणि १ सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनिर्णित राहिला आहे. त्याचबरोबर इंग्लंडला ५ सामन्यांपैकी २ सामन्यात भारताविरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. तसेच त्यांनी मिळवलेल्या ३ विजयांपैकी २ विजय श्रीलंकेविरुद्ध मिळवले आहेत आणि १ विजय भारताविरुद्ध मिळवला आहे.
गेल्या २ महिन्यात २ भारतीय क्रिकेटपटूंनी झळकावली शतके
या वर्षात भारताने खेळलेल्या ५ कसोटी सामन्यांमध्ये केवळ २ भारतीय क्रिकेटपटूंना शतके झळकावण्यात यश आले आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध शतके झळकावली आहेत. तर इंग्लंडकडून केवळ जो रुटला शतक करता आले आहे.
तसेच यंदाच्या वर्षात आत्तापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रुट अव्वल क्रमांकावर आहे. त्याने ५ सामन्यात २ द्विशतके आणि १ शतकासह ७५.९० च्या सरासरीने ७५९ धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आहे. त्याने ४ सामन्यात २२५ धावा केल्या आहेत. सध्या याबाबतीत तरी रुट अन्य फलंदाजांच्या बराच पुढे आहे.
यावर्षी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
यंदाच्या वर्षात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत भारताचा फिरकीपटू आर अश्विन आणि इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहेत. अश्विनने ४ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत. तर लीचने ५ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ १८ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेल आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ पूर्वी धोनीनी दिली ‘या’ मंदिराला भेट, चाहत्यांबरोबर सेल्फीही काढले, पाहा फोटो