आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे. निवडसमितीने काही आश्चर्यकारक निर्णय घेत अपेक्षित नसलेल्या अनेक अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिले. जवळपास मागील चार वर्षापासून भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग नसलेल्या अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालादेखील या विश्वचषकासाठी पाचारण करण्यात आले. मात्र, हा विश्वचषक त्याच्यासाठी अखेरचा टी२० विश्वचषक ठरू शकतो.
अनपेक्षीतपणे मिळाली संधी
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू असलेल्या रविचंद्रन आश्विनने आपला अखेरचा टी२० सामना ९ जुलै २०१७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला अचानकपणे या विश्वचषकासाठी संघात संधी देण्यात आली. भारताचा प्रमुख फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असल्याने एक ऑफस्पिनर म्हणून अश्विनची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. अश्विनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असल्याने तसेच युएईतील मैदाने फिरकीला पोषक असल्याने अश्विन या स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतो.
या कारणाने ठरणार अखेरचा विश्वचषक?
रविचंद्रन अश्विनला या टी२० विश्वचषकात संधी मिळाली असली तरी, पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात तो खेळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. २०२२ मध्ये होणारा टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलिया येथे खेळला जाईल. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांसाठी तितक्याशा अनुकूल मानल्या जात नाहीत.
यासोबतच सध्या भारतीय संघात अनेक युवा फिरकीपटू सामील झाले आहेत. राहुल चाहर, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर हे युवा क्रिकेटपटू सातत्याने प्रभाव पाडताना दिसतायेत. महत्त्वाचे म्हणजे अश्विनचे वय त्याच्या विरुद्ध जाऊ शकते. अश्विन १७ सप्टेंबर रोजी ३५ वर्षांचा होईल. त्यामुळे, पुढील वर्षभरात त्याची तंदुरुस्ती व कामगिरी टी२० क्रिकेटला साजेशी न राहिल्यास तो २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी२० विश्वचषक खेळण्याची शक्यता धूसर असेल.






