-अतुल वाघमारे
५ मार्च, २०२०. सिडनीमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे दिवसाच अंधाराचे सावट पसरले होते. त्यावेळी असे वाटत होते, की आज पाऊस कोणालाही घरातून बाहेर निघूच देणार नाही. त्यादिवशी संपूर्ण जगाच्या नजरा सिडनीवर होत्या. कारणही तसेच होते. त्यादिवशी महिला टी२० क्रिकेट विश्वचषकाचा उपांत्य सामना होता. सिडनीमध्ये भारत आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात उपांत्य फेरीचे सामने रंगणार होते. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि इंग्लंडचा सामना झालाच नाही. खरंतर कदाचित तो असा पहिलाच सामना होता, ज्यामध्ये वातावरण किंवा कोणत्याही कारणामुळे थांबलेल्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे वरचढ होते. ग्रूप स्टेजमध्ये अव्वल क्रमांक मिळवत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. त्यामुळे पुढे विश्वचषकाचा अंतिम सामना झाला, तोही भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात.
नव्वदच्या दशकात जन्मलेली कित्येक मुले त्या दिवशी थेट २००३ मध्ये पोहोचली होती. विशेष म्हणजे त्यांना २००३ला पोहचायला टाईम मशिन देखील लागली नाही. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, की असं कसं होईल? हे काय आम्ही आहोतच इथे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. तर २०११मधील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने ठोकलेल्या षटकाराचा फोटो आपण सर्वांनीच पाहिला आहे आणि नेहमी पाहत असतो. तो फोटो आणि १९८३ साली झालेल्या विश्वचषकात कपिल पाजींचा ट्रॉफी ऊंचावतानाचा फोटो यादरम्यान आणखी एक फोटो आला होता. तो म्हणजे २००३ मध्ये. जेव्हा सचिनने पुल शॉट खेळला खरा, परंतु चेंडू बाऊंड्रीलाईनच्या पलीकडे न जाता थेट हवेत उडत उडत गेला ग्लेन मॅकग्राच्या हातात.
तो दिवस होता २३ मार्च. हा दिवस तसा भारतीयांना फार काही आठवावा वाटत नाही. १९८३ किंवा २०११ या दोनही विश्वचषकांपेक्षा अनेकांचा आवडता विश्वचषक आजही २००३च आहे. अगदी भारतीय संघ अंतिम फेरीत पराभूत होऊनही. आणि जर तुम्ही नव्वदीतील पोरं असालं ना, तर शंभर टक्के २००३ विश्वचषकच.
हा तर २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना होता २३ मार्चला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकली होती. आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती, की भारतीय संघ नक्की कोणता निर्णय घेईल. फलंदाजी की क्षेत्ररक्षण?सर्वांना अशी अपेक्षा होती, की सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग येऊन ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट लीला आपल्या अशा काही लीला दाखवून देतील की भारताला आता कोणाचीही भीती नाही. परंतु घडले वेगळेच. गिलख्रिस्ट आणि हेडन मैदानावर उतरत आहेत. तसेच, सौरव गांगुली आपल्या संघाचा उत्साह वाढवत सर्वांना मैदानाच्या दिशेने घेऊन येत आहे.
म्हणजेच भारताने घेतला होता क्षेत्ररक्षणाचा निर्णय. तसं भारतीय चाहत्यांना जगात खेळपट्टी, तेथील वातावरण काहीही असो, फलंदाजी पहिली लागते. अगदी गल्ली क्रिकेटमध्ये पण ६ वर्षांचं पोरगं म्हणतं, माझी बॅट मग मीच पहिली बॅटींग करणार. खरंय ना? तर २००३ला देखील कोणालाच ही अपेक्षा नव्हती. परंतु सर्वांनी आपल्या मनाशी पक्के केले की जो काही निर्णय घेतलाय तो विचार करूनच घेतला असेल. परंतु त्यानंतर जे काही घडले ते अघटीत होते. म्हणजेच एक- एक चेंडूबरोबर अपेक्षाही खचत होत्या. तरीही शेवटी ते भारतीय संघाचे चाहते होते. जे त्या काळात शेवटच्या चेंडूवर ८ धावांची आवश्यकता असली, तरी भारतीय संघाच्या विजयाची अपेक्षा ठेवत होते. (खास बात- गमतीचा भाग म्हणजे जगात शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना जगातील फक्त दोन फलंदाजांनी षटकार मारला आहे. एक शिवनारायण चंद्रपाॅल तर दुसरा आयर्लंडचा स्टुअर्ट पाॅईंटर. अशी आकडेवारी मित्रांबरोबर गप्पा मारताना कामाला येते. दुसरं काही नाही.)
हा, तर भारतीय चाहते विजयाची अपेक्षा बाळगुन होते. ही अपेक्षा यासाठीही होती. कारण २३ मार्च, २००३ला झालेल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती, ज्यामुळे सर्वांच्या मनात एकच गोष्ट होती. ती म्हणजे, १९८३ चा विश्वचषक नाही पाहिला, परंतु २००३चा विश्वचषक पाहण्याचे भाग्य मात्र आम्हाला लाभले. सचिनने त्या सामन्यापूर्वी स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत ६६९ धावा ठोकल्या होत्या. नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, झिंबाब्वे, नामीबिया, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका किंवा केनिया यांपैकी एकही असा देश नव्हता, ज्याला २००३ विश्वचषकात सचिनने झोडपून काढले नव्हते.
असं समजा सचिनने यावेळी ठरवलेच होते, की संपूर्ण जगाला दाखवून द्यायचे आहे क्रिकेट विश्वचषकाचा अर्थ सचिन तेंडुलकर असा आणि असाच होतो. सचिनबद्दल विश्वचषकात जो विश्वास निर्माण झाला होता, त्याचे प्रमुख कारण होते ते पाकिस्तानविरुद्ध त्याने खेळलेली ९८ धावांची खेळी. त्या खेळीत १५० किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करणाऱ्या शोएब अख्तरला सुरुवातीलाच सचिनने अस्सा षटकार ठोकला, की जसे काही पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी तो सामना संपलाच होता. आणि भारतीय संघाने आपला झेंडा फडकावला होता. याच विश्वचषकात वसिम अक्रमने ५०० विकेट्सचा टप्पा पार केल्यावर त्याला ५०० गुलाब फुलांचा गुच्छ भेट देण्यात आला होता.
सचिनव्यतिरिक्त आशिष नेहराने इंग्लंडविरुद्धच्या ३० व्या सामन्यात आपल्या पायाला दुखापत होऊनही ६ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तर गांगुली सचिननंतर विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला होता. सेहवागनेही अनेकवेळा महत्त्वाच्या वेळी सचिनची साथ दिली होती. द्रविड आणि युवराजने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचे काम केले होते. भारतीय संघातील खेळाडूंच्या या कामगिरीमुळेच चाहत्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या. हे सर्व पाहता कोणीही म्हणू शकत होते, की २००३ चा विश्वचषक भारताच्याच पारड्यात पडणार आहे.
सामना सुरु झाला. परंतु भारतीय गोलंदाजीच्या ५० षटकामध्ये काय काय झाले हे सांगून पुन्हा पाँटिंगची आठवण काढायची नाही. कारण हे आपण मागील १७ वर्षांपासून ऐकत आलो आहोत. ऑस्ट्रेलियाचा डाव संपला होता. स्कोअरबोर्डवर तितक्या धावा होत्या, ज्या त्या काळात विजयाच्या स्कोरपेक्षाही जवळपास ७०-८० धावा अधिक होत्या. म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता २ बाद ३५९. परंतु तरीही मनात अपेक्षा तर होतीच. अपेक्षा होती सचिनकडून. तोच सचिन ज्याचा विक्रम १७ वर्षांनंतरही तुटलेला नाही. तो सचिन जो आपल्या मनाप्रमाणे गोलंदाजांकडून गोलंदाजी करवून घेत होता.
सर्वांचे लक्ष सचिनवर होते. कारण स्वत: क्रिकेटचे दिग्गज समालोचक हर्षा भोगले यांनी त्या सामन्यापूर्वीच भविष्यवाणी केली होती, की ऑस्ट्रेलिया आणि विश्वचषकाच्यामध्ये सचिन उभा आहे. २००३ विश्वचषकात ‘गोल्डन बॅट’ने फलंदाजी करणारा सचिन अंतिम सामन्याच्या पहिल्या षटकातील पाचव्याच चेंडूवर मॅकग्राच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. आणि मग जे घडले ते अनपेक्षित होते. जवळपास ३ महिन्यांपूर्वी अर्थात २३ मार्च, २०२० रोजी १३० कोटी लोक लॉकडाऊनमध्ये आहेत. पण ते सरकारच्या आदेशानुसार. मात्र १७ वर्षांपूर्वीही कोणत्याही सरकारी आदेशाविना २३ मार्चला संपूर्ण भारत देश लॉकडाऊन झाला होता. क्वचितच असे काही लोक असतील ज्यांना धक्का बसला नसेल.
कारण काय होते? काय झाले असेल? असे प्रश्न आता तुमच्या मनात घर करत असतील. तर झाले असे की सर्वांच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता. सचिन (४) आणि गांगुली (२४) बाद झाले होते. यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. कोण तर सचिन बाद झाला आहे. जो खेळत असताना कोणालाही विजयाची चिंता नव्हती. परंतु आता सचिन आणि गांगुलीही बाद झाल्यामुळे अवघा देश विजयाची प्रार्थना करत होता. भारतात सचिन बाद झाल्यावर अनेक टीव्ही सेट फुटले होते. विज महामंडळावर आलेला ताण लाखो टीव्ही बंद झाल्याने क्षणात कमी झाला होता. अनेक घरात सन्नाटा पसरला होता.
गांगुलीनंतर मोहम्मद कैफ शून्यावर बाद झाला होता. सचिन आणि गांगुलीने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. परंतु काय फायदा?, ज्यावेळी त्या धावा कामी यायला पाहिजे होत्या, नेमकं त्याचवेळी ते बाद झाले होते. त्यानंतर द्रविडने सेहवागसोबत मिळून किल्ला लढवत भारताचा स्कोर १४७ धावांपर्यंत पोहोचविला. परंतु यादरम्यान जोपर्यंत हे धडाकेबाज खेळाडू खेळपट्टीवर होते, तेव्हा असे वाटत नव्हते की विजय निश्चित आहे. सेहवाग वेगवान खेळी करत होता. परंतु स्कोरमध्ये काही वाढ मात्र होत नव्हती.
सेहवाग २४ व्या षटकात बाद झाला. त्यानंतर आता क्रिकेट जवळून पाहिलेल्या लोकांना कळून चुकले होते, की आता बस्स झालं. परंतु काही चाहत्यांच्या मनात थोडी का होईना अशी अपेक्षा होती की मागील वर्षी नेटवेस्टमध्ये इंग्लंडला पराभूत केले आहे. आतातर युवराज सिंगदेखील आहे. तो करेलच की तेही द्रविडसोबत मिळून. परंतु हळू-हळू सर्व खेळाडू नियमित अंतराने पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत होते. आणि चाहत्यांच्या मनातील अनपेक्षित भीती वाढत होती. शेवटी तेच झाले, जे व्हायला नको होते. गांगुलीच्या नेतृत्वातील संघाने संपूर्ण भारताला दाखविलेले स्वप्न तुटले होते.
भारतीय संघ २००३चा विश्वचषक घेतानाचा फोटो असावा ही केवळ इच्छाच राहिली. हे घडलं असत तर तो फोटो १९८३ आणि २०११ च्या मधल्या फ्रेममध्ये दिसला असता. परंतु त्या दिवशी एका चूकीने भारताने आपले स्वप्न आणि कितीतरी कोटी चाहत्यांची मने तोडली होती.
हा लेख तुम्हाला कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा. आमचा ट्विटर आयडी- @Maha_Sports