भारतीय क्रिकेट संघाने सुरुवातीच्या काही वर्षांपासूनच वनडे क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे, वनडे विश्वचषकाची सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्याच विश्वचषकावर (१९८३) भारताने आपल नाव सुवर्ण अक्षरात कोरलं होतं.
जेव्हा संघ एकजुटीने खेळून चांगलं प्रदर्शन करतो, तेव्हा त्यांना नक्कीच यश मिळतं आणि भारताला याच कारणाने वनडे विश्वचषकावर दोनदा (१९८३ आणि २०११) आपलं नाव कोरता आलं. यामध्ये सर्वच खेळाडूंनी महत्वपूर्ण योगदान दिलं होतं.
९० च्या दशकापासून भारतीय संघाला आजपर्यंत एका पेक्षा एक प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत. या सर्वच खेळाडूंनी जगभरातील क्रिकेट प्रेमींना आपल्या खेळीने प्रेरित केलं आहे. पण ज्यावेळी एखादा खेळाडू वनडे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करतो, तेव्हा त्या खेळाडुकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वांपेक्षा वेगळाच असतो. यामध्ये ५ भारतीय खेळाडू आहेत, ज्यांनी आपला खेळ आणि आक्रमकतेच्या जोरावर हे शिखर गाठलं आहे.
पण त्यातील ३ फलंदाज असे आहेत ज्यांनी जागतिक स्तरावर वनडेत सर्वात जलद १० हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. म्हणजेच जगातील सर्वात जलग १० हजार वनडे धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पहिल्या ३ क्रमांकावर भारतीय फलंदाज आहेत. याच ३ भारतीय फलंदाजांबद्दल आज या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
सर्वात जलद १० हजार धावा पूर्ण करणारे ३ फलंदाज- 3 Batsman Fastest 10 Thousand Runs ODI Cricket
३. सौरव गांगुली
माजी भारतीय कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष ज्याला “दादा” या नावाने ओळखलं जातं. तो सौरव गांगुली ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणानंतर आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. त्याच्या आक्रमक फलंदाजीने फिरकी गोलंदाजांना चिंतेत टाकलं होतं. त्यामुळेच गांगुली वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.
गांगुलीने (Sourav Ganguly) हा आकडा पूर्ण करण्यासाठी २६३ डाव खेळले आहेत. तर २००५ मध्ये श्रीलंकेविरूद्ध दांबुला येथे त्याने १० हजारावी धाव पूर्ण केली होती. त्याने कारकीर्दीच्या १३ वर्षे आणि २०४ दिवसांनंतर हे शिखर गाठलं होतं. वनडे कारकिर्दीत त्याने ३११ सामन्यांत २२ शतके आणि ७२ अर्धशतकांच्या जोरावर ११३६३ धावा केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासात गांगुलीचे विशेष स्थान आहे. वनडे सामन्यात सचिन बरोबरची त्याची विश्वविक्रमी भागीदारी, ग्रेग चॅपेल बरोबरची त्याचे वाद, युवा संघ तयार करण्यात कर्णधार म्हणून त्याची भूमिका, या सर्वांमुळे क्रिकेट प्रेमींच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवलं. ज्यावेळी भारतीय क्रिकेटला फिक्सिंगचा काळा डाग लागला होता. त्या पडत्या काळात त्याने कर्णधार पदाचा पदभार स्वीकारला होता आणि तो आपल्या युवा सेनेला घेऊन २००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडला होता.
२. सचिन तेंडुलकर
वनडे क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रत्येक जागी उपस्थित असायचा. त्याने वनडे क्रिकेटमध्ये आपली शंभरावी धाव २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदोर वनडे सामन्यात पूर्ण केली होती. त्याने २५९ वनडे डावात हा आकडा पूर्ण केला. आणि यासाठी त्याने कारकीर्दीची ११ वर्षे आणि १०३ दिवस खर्च केले होते.
सचिनने कारकिर्दीत ४६३ वनडे सामन्यात ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. तर वनडेत नाबाद २०० ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती.
सचिनने (Sachin Tendulkar) त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत २४ वर्ष देशाचं ओझं वाहिलं आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत ६ वनडे विश्वचषक खेळले. ज्यात त्याने २ विश्वचषकाच्या (२००३ आणि २०११) अंतिम सामान्यांपर्यंत मजल मारली. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला. पण २०११ साली अंतिम सामन्यात श्रीलंकेला मात देत भारताने विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं आणि सचिनचं विश्वचषक जिंकण्याच स्वप्न पूर्ण झालं. शेवटी २३ डिसेंबर २०१२ रोजी त्याने वनडे क्रिकेटला अलविदा केलं.
१. विराट कोहली
जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याने फक्त २०५ वनडे डावात हा विक्रम केला आहे.
महत्वाचं म्हणजे अन्य कोणताही फलंदाज त्याच्या विक्रमाच्या आसपासही नाही. त्याने १० वर्षे आणि ६७ दिवसांत हा आकडा पार केला आहे. २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यात विशाखापट्टणम येथे त्याने १० हजारावी धाव पूर्ण केली.
त्याने आत्तापर्यंत वनडे कारकिर्दीत २४८ सामन्यांत ४३ शतकं आणि ५८ अर्धशतकांच्या मदतीने ११८६७ धावा केल्या आहेत.
वाचनीय लेख-
-बाप योगायोग! क्रिकेटमधील ७ असे योगायोग, ज्यावर विश्वास बसणे केवळ कठीण
-जेव्हा वाजपेयी हसत म्हणाले, मग आपण पाकिस्तानमध्ये निवडणुकाही सहज जिंकू!
-वेस्ट इंडीजचा ‘द्रविड’ म्हणून ओळख असलेला चंद्रपाॅल डोळ्याखाली का लावायचा काळी पट्टी?