कसोटी फॉरमॅटमध्ये शतक आणि द्विशतक हे फलंदाजांसाठी फार महत्त्वाचे असतात. अनेक फलंदाज शतक तर सहज पूर्ण करतात, परंतु ते त्याचं दुहेरी शतकात रुपांतर करू शकत नाहीत. कधी कधी असंही घडतं की, फलंदाज द्विशतकाच्या जवळ असतो, मात्र कर्णधार संघाचा डाव घोषित करतो. रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीतही हेच दृश्य पाहायला मिळालं.
पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान द्विशतकाच्या जवळ असताना कर्णधार शान मसूदनं डाव घोषित केला. त्याच्या या निर्णयावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र एखाद्या कर्णधारानं आपल्या फलंदाजासोबत असं करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा 3 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना कर्णधारानं डाव घोषित केल्यामुळे द्विशतक पूर्ण करता आलं नाही.
(3) मोहम्मद रिझवान (171*) – पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्टपासून रावळपिंडीत सुरू झाला. या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननं शानदार शतक झळकावलं. रिझवान चांगल्या लयीत दिसत होता. तो आपलं द्विशतक सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र कर्णधार शान मसूदनं 448/6 धावांवर डाव घोषित केला. अशाप्रकारे रिजवान 239 चेंडूत 176 धावा करून नाबाद राहिला.
(2) रवींद्र जडेजा (175*) – या यादीत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचाही समावेश आहे. जडेजानं 2022 साली श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटीत शानदार फलंदाजी केली होती. तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावण्याच्या अगदी जवळ होता. मात्र, कर्णधार रोहित शर्मानं डाव घोषित केला. रोहितच्या या निर्णयामुळे जडेजा 228 चेंडूत 175 धावा करून नाबाद राहिला.
(1) सचिन तेंडुलकर (194*) – 2004 साली मुलतानमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेला कसोटी सामना वीरेंद्र सेहवागच्या त्रिशतकासाठी लक्षात ठेवला जातो. परंतु या सामन्यात सचिन तेंडुलकर द्विशतकापासून चुकला होता, ज्याची आजही चर्चा होते. तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडनं टीम इंडियाचा डाव 675/5 या धावसंख्येवर घोषित केला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर 194 धावांवर नाबाद होता. द्रविडच्या या निर्णयावरून सचिनचे चाहते आजही त्याच्यावर टीका करतात.
हेही वाचा –
इंग्लंड क्रिकेटला मिळाला नवा स्टार खेळाडू! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून मोडला 94 वर्ष जुना विक्रम
काय सांगता! 5 नव्हे तर चक्क 6 दिवस चालेल एक कसोटी सामना! काय आहे कारण?
क्रिकेटविश्वात खळबळ! भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दिग्गज खेळाडूवर हत्येचा आरोप