भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स येथे सुरू आहे. लॉर्ड्सचे मैदान जगभरात प्रसिद्ध आहे आणि हे मैदान कसोटी क्रिकेटशी संबंधित आहे. जगभरातील प्रत्येक खेळाडूचे या मैदानावर खेळण्याचे स्वप्न असते. परंतू, त्यातील काही मोजकेच हे स्वप्न पूर्ण करू शकतात. लॉर्ड्स मैदान हे इंग्लंडच्या ऐतिहासिक मैदानांपैकी एक आहे. जेव्हा एखादा फलंदाज शतक झळकावतो किंवा गोलंदाज या मैदानावर पाच बळी घेतो, तेव्हा त्याचे नाव लॉर्ड्स ऑनर्स बोर्डावर नोंदवले जाते.
भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना या मैदानावर खेळायलाही आवडते आणि अनेक भारतीय खेळाडूंनीही या मैदानाला त्यांचे आवडते मैदान असे वर्णिले आहे. या मैदानावर भारतीय संघाचा कसोटी विक्रम फारसा चांगला नाही आणि संघाने येथे खेळलेल्या 18 कसोटींपैकी फक्त दोन जिंकून फक्त चार सामने बरोबरीत सोडवले आहेत. असे असूनही, भारतीय फलंदाजांनी या मैदानावर काही संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत आणि त्या डावांचे अजूनही कौतुक केले जाते. या लेखात, आम्ही भारतीय फलंदाजांनी लॉर्ड्सवर खेळलेल्या 3 सर्वोत्तम खेळींचा उल्लेख करणार आहोत.
लॉर्ड्सवर भारतीय फलंदाजांनी खेळलेल्या 3 सर्वोत्तम खेळी
3 अजिंक्य रहाणे (103 धावा), 2014
इंग्लंड दौऱ्यावर 2014 मध्ये भारतीय संघ पहिला कसोटी सामना बरोबरीत सोडवण्यात यशस्वी झाला आणि त्यानंतर त्यांचे पुढील आव्हान लॉर्ड्स कसोटीचे होते. लॉर्ड्सवर भारताला ग्रीन टॉप मिळाला आणि प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले गेले. भारताची सुरुवात विशेष नव्हती आणि 86 धावा होईपर्यंत संघाने 3 गडी गमावले होते. येथून अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला आणि एका बाजूने संघाचा डाव सावरला. 153 चेंडूंचा सामना करताना त्याने 103 धावांची झुंजार शतकी खेळी केली होती. भारताने हा सामना 95 धावांनी जिंकला होता.
2 दिलीप वेंगसरकर (126* धावा) 1986
लॉर्ड्स मैदानावर भारतासाठी सर्वाधिक यश मिळवणारे माजी भारतीय खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी 1986 मध्ये लॉर्ड्सवर भारताच्या पहिल्या कसोटी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 294 धावांवर संपला होता. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने एका वेळी 90 धावांत आपले दोन बळी गमावले होते आणि वेंगसरकर अमरनाथला पाठिंबा देण्यासाठी क्रीजवर आले होते. पुढे भारताने आपल्या पहिल्या डावात 341 धावा फटकावल्या होत्या. वेंगसरकरांच्या शानदार खेळीमुळे भारताला इतक्या धावा करण्यात यश आले होते.
त्यांनी 213 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने नाबाद 126 धावा केल्या होत्या. वेंगसरकरांच्या या खेळीच्या मदतीने भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली आणि इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 180 धावांवर गुंडाळला गेला. परिणामी भारताला विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने 5 गडी गमावून हे लक्ष्य साध्य केले आणि या ऐतिहासिक मैदानावर पहिला कसोटी विजय नोंदवला.
1 सौरव गांगुली (131 धावा) 1996
सौरव गांगुलीने लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केले होते. भारतीय संघाच्या 1996 च्या इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या सामन्यात संघाचा 8 गडी राखून पराभव झाला होता. अशा स्थितीत लॉर्ड्सवरील पुढील कसोटी संघासाठी सोपी नव्हती. भारतीय संघाकडून या सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. गांगुलीने आपल्या पहिल्याच डावात एक अविस्मरणीय शतक झळकावले होते. भारताच्या पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या गांगुलीने 301 चेंडूत 20 चौकारांच्या मदतीने 131 धावांची अद्भुत खेळी खेळली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
पुजाराच्या फ्लॉप खेळीवर चहूबाजूंनी टीका; ‘एंड ऑफ द एरा’ म्हणत अनेकांनी दिल्या निवृत्तीच्या शुभेच्छा
व्हिडिओ: टाळ्यांचा कडकडाट अन् कौतुकाची थाप; शतकवीर राहुलचे ड्रेसिंग रूममध्ये शानदार स्वागत