आयपीएलचा १३ वा हंगाम येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि हा हंगामही खूप धमाकेदार होईल अशी अपेक्षा आहे. कोरोना विषाणूमुळे, खेळाडू गेल्या कित्येक महिन्यांपासून घरीच होते आणि ते आता क्रिकेट मैदानात उरतण्यास नक्कीच आतुर असतील. आयपीएलचे नियोजन या वेळी युएईमध्ये होणार आहे, त्यामुळे तेथील परिस्थिती काही वेगळी असेल.
आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्या सलामीच्या जोडीला चांगली कामगिरी करणे खूप महत्वाचे आहे. जर सलामीच्या जोडीने चांगली कामगिरी केली तर त्या संघाच्या विजयाची शक्यता वाढते. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत अनेक दिग्गज सलामीवीर झाले आहेत.
या मोसमात प्रत्येक संघांमध्ये सलामीच्या अनेक धोकादायक जोड्या आहेत. या लेखामध्ये आयपीएलच्या या हंगामातील सर्वात धोकादायक ठरु शकणाऱ्या ३ सलामीच्या जोडींबद्दल सांगणार आहोत.
या आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी करतील अशा ३ सलामीच्या जोड्या-
३. ख्रिस लिन आणि क्विंटन डी कॉक – मुंबई इंडियन्स
ख्रिस लिनसारखा दिग्गज फलंदाज या मोसमात मुंबई संघाचा भाग आहे. यामुळे या मोसमात सलामीला मुंबई इंडियन्सकडे आणखी एक पर्याय आहे. लिलावापूर्वी केकेआरने ख्रिस लिनला सोडले आणि मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी केले. ख्रिस लिन एक जबरदस्त स्फोटक फलंदाज आहे. बिग बॅश लीगच्या यंदाच्या मोसमात त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे.
क्विंटन डी कॉक देखील हा एक अतिशय धोकादायक टी-२० खेळाडू असल्याचे मानले जाते. मागील हंगामात त्याने मुंबई इंडियन्सकडून ५०० हून अधिक धावा केल्या. जर ख्रिस लिन आणि डी कॉक सलामीला आले तर ते समोरच्या संघाला खूप धोकादायक ठरू शकतील. दोन्ही फलंदाज असे आहेत की ते गोलंदाजांवर आपला दरारा निर्माण करू शकतील आणि पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात.
परंतु आता हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल की मुंबई इंडियन्स या परदेशी जोडीसह फलंदाजीची सुरुवात करतात की संघांचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील एकासह सलामीला फलंदाजीला उतरतो.
२. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो – सनरायझर्स हैदराबाद
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो ही सलामीची जोडीही अत्यंत धोकादायक आहे. मागच्या आयपीएल मोसमात या जोडीने जबरदस्त कामगिरी केली होती. जॉनी बेअरस्टोने मागील हंगामात १० सामन्यांत ५५.६२ च्या प्रभावी सरासरीने ४४५ धावा केल्या. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरची कामगिरीही जबरदस्त होती. त्याने ६९.२ च्या उत्कृष्ट सरासरीने ६९२ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती.
तसेच मागील मोसमात वॉर्नर आणि बेअरस्टोमध्ये मोठ्या भागीदारीही झाल्या होत्या. त्यामुळे त्या दोघांचा एकमेकांशी असलेला समन्वय पहाता पुन्हा एकदा ही जोडी यावर्षीही धमाकेदार कामगिरी करुन प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकेल.
१. केएल राहुल आणि ख्रिस गेल – किंग्ज इलेव्हन पंजाब
यंदाच्या आयपीएल हंगामात ही सर्वात धोकादायक सलामी जोडी ठरू शकते. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे एकट्या गेलमध्ये सामना फिरविण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर केएल राहुलही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केएल राहुलकडे या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीत आणखी सुधारणा होऊ शकेल.
केएल राहुल आणि ख्रिस गेल हे दोघेही तसे आक्रमक खेळाडू आहेत. या जोडीने मागील २ हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून शानदार प्रदर्शन केले आहे. तसेच त्या दोघांना एकत्र खेळण्याचा अनुभव देखील आहे. त्याचा फायदा संघाला होऊ शकतो. केएल राहुलने आयपीएल २०१८ मध्ये ६५९ धावा केल्या तसेच गेल्या मोसमात ५९३ धावा केल्या. त्याचबरोबर ख्रिस गेलने मागील २ आयपीएल मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबकडूनही चांगली कामगिरी बजावली आहे.
त्यामुळे यंदाच्या हंगामात ही सलामीची जोडी विरोधी संघांसाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.