नव्वदच्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचं वर्णन एक सर्वसाधारण संघ म्हणून केलं जायचं. घरच्या मैदानावर वाघ असलेल्या भारतीय संघाची विदेशात शेळीसारखी अवस्था व्हायची, कपिल देवने जरी 1983 च्या विश्वकपावर नाव कोरले असले तरी विदेशात भारत जिंकूच शकत नाही अशी परिस्थिती होती. परंतु म्हणतात ना, वेळ नेहमी बदलत असते , आणि साल 2000 नंतर भारतीय संघाची वेळ बदलायला सुरवात झाली.
आजचा भारतीय संघ अश्वमेधाच्या अजेय, अबलख वारू सारखा झुंजारपणे दौडतोय. दृष्ट लागावी अशी कामगिरी आज हा संघ करतोय परंतु ही कामगिरी म्हणजे काही एका दिवसात घडलेला चमत्कार नाही. त्यामागे अनेक व्यक्तींची मेहनत , चाहत्यांनी दिलेलं प्रेम आणि सर्वात महत्वाचं प्रशिक्षकांच योगदान आहे. तर आज आपण या लेखात अशा तीन भारतीय प्रशिक्षकांची माहिती घेणार आहोत ज्यांनी भारतीय संघाला विजयाच स्वप्न दाखवलं.
1)रवी शास्त्री- 2017 साली अनिल कुंबळे नंतर भारतीय प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळताना रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. आपल्या काळातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू असलेल्या रवी शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून केलेली कामगिरी निश्चितीच कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच भूमीवर लोळवण्याचा पराक्रम एकदा नाही तर दोनदा त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने केला आहे. 2018 आणि नुकतेच 2020-2021 साली भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला. रवी शास्त्री हे ज्याप्रमाणे “जांबुवंताने हनुमंताला त्यांच्या शक्तीची आठवण करून देत असत” त्याचप्रमाणे त्यांच्यात भारतीय खेळाडूंत देखील जोशपूर्ण उत्साह उत्पन्न करण्याची कला आहे. निधास ट्रॉफी, आशिया कप , इंग्लंडला मायदेशातील मालिकेत मात व तसेच 2019 च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत प्रवास भारतीय संघाने शास्त्रींच्या नेतृत्वाखाली केला आहे.
2)गॅरी कर्स्टन- दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर राहिलेले गॅरी कर्स्टन यांनी भारताचे प्रशिक्षक म्हणून देखील अतिशय शानदार काम केले. ज्यावेळी भारतीय संघाला कसोटी क्रमवारीत पहिल्या 3 स्थानी राहण्यासाठी झगडावे लागत होते, त्या भारतीय संघाला त्यांनी अव्वल स्थानी विराजमान केले. त्यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाची सर्वात दैदिप्यमान कामगिरी म्हणजे 2011 चा विश्वकप. 28 वर्षांनंतर भारताने विश्वचषक विजयाचा सोहळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला.
३)जॉन राईट- जॉन राइट भारतीय संघाचे प्रथम विदेशी प्रशिक्षक होते. त्यांनी 2001-2002 मध्ये ज्यावेळी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा संघाला ‘सामना निश्चितीच’ ग्रहण लागलेले होते. त्यावेळी सौरव गांगुलीला मोलाची साथ ह्या प्रशिक्षकाने दिली. जॉन राइट यांच्या कारकिर्दीत भारतीय संघाने 2003 च्या विश्वचषक स्पर्धत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. या व्यतिरिक्त 2001 ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात मालिका बरोबरीत करण्याची कामगिरी संघाने केली होती. साल 2004 साली तब्बल 14 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यात त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला होता. आणि नेटवेस्ट मालिका विजयापासून विदेशात जिंकायची सवय त्यांनी भारतीय संघाला लावून दिली.