भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये एक नव्हे, तर तब्बल 3 द्विशतक ठोकले आहेत. अशामध्ये जिथे शतक ठोकणेच मोठी कामगिरी मानली जाते, तिथे रोहितने 3 द्विशतक ठोकले आहेत. यावरून समजते, की तो किती मोठा फलंदाज आहे.
भारतीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर सर्वप्रथम सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये द्विशतक करण्याचा कारनामा आपल्या नावावर केला होता. त्यानंतर विरेंद्र सेहवागने वनडेत द्विशतक ठोकले होते. तसेच, त्यानंतर रोहितने ही कामगिरी केली होती. रोहितने तर ३ वेळा वनडेत द्विशतक ठोकले आहे. परंतु अनेकदा प्रश्न हा उपस्थित होतो, की आणखी कोणकोणते भारतीय फलंदाज अशी कामगिरी करू शकतात.
चला तर मग जाणून घेऊया, त्या 3 भारतीय फलंदाजांबद्दल, जे रोहित व्यतिरिक्त वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याची क्षमता ठेवतात.
रोहित व्यतिरिक्त वनडेत द्विशतक ठोकू शकणारे 3 भारतीय फलंदाज- 3 Indian Batsman who are able to make Double Century after Rohit Sharma
3. केएल राहुल
यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आता भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला आहे. मागील काही महिन्यांपासून त्याने ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, ती पाहून वाटते की तो येत्या काही काळामध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
राहुलने आतापर्यंत 32 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 31 डावांमध्ये एकूण 1239 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 87.06 इतका राहिला आहे. याव्यतिरिक्त त्याने आतापर्यंत 4 शतके आणि 7 अर्धशतके ठोकली आहेत. त्याची वनडेतील सर्वात्तम धावसंख्या ही 112 धावा आहे.
वनडे क्रिकेटमध्ये त्याने नुकतेच 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकले आहे. यावरून समजते की तो किती सक्षम आहे. जर त्याला वनडेमध्ये सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर तो नक्कीच द्विशतक करण्याची क्षमता ठेवतो.
2. विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. जेव्हा तो फॉर्ममध्ये असतो, तेव्हा तो कोणताही विक्रम आपल्या नावावर करण्याचा कारनामा करू शकतो, यामध्ये तिळमात्र शंका नाही.
विराटची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या ही 183 धावा इतकी आहे. यावरूनच समजते, की तो द्विशतक करण्याच्या किती जवळ होता. विराट फलंदाजी करताना सुरुवातीला वेळ घेतो. परंतु एकदा का त्याने खेळपट्टीवर आपले पाय रोवले, की तो वेगाने धावा करतो. तो तिसऱ्या क्रमांकावर बऱ्याचदा फलंदाजी करतो. अशामध्ये त्याच्याकडेही द्विशतक करण्याची संधी आहे.
1. रिषभ पंत
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तरीही पंतकडे मोठी धावसंख्या करण्याची खूप कमी संधी असते. कारण तो मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी येतो. परंतु अनेकवेळा संघाच्या 2-3 विकेट्स लवकर पडल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजाला शेवटपर्यंत फलंदाजी करण्याची संधी मिळते.
पंत आक्रमक फलंदाज करु शकतो. हे त्याने अनेकवेळा दाखवून दिले आहे. जर पंत लवकर फलंदाजी करण्यासाठी आला आणि शेवटच्या षटकापर्यंत खेळला, तर तो नक्कीच द्विशतक ठोकण्याचा कारनामा करू शकतो.
वाचनीय लेख-
-सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात मैदान गाजवत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज