क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध असताता, तेव्हा चाहत्यांचा उत्साह एका वेगळ्याच पातळीवर पोहोचतो. टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत एकूण ६ वेळा आमने-सामने आले आणि त्यापैकी फक्त एकदा पाकिस्तान संघाला विजय मिळाला आहे. उर्वरित पाच सामने भारताने जिंकले आहेत. पाकिस्तानने टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये पहिल्यांदाच भारतावर विजय मिळवला आहे. पाकिस्तानने या सामन्यात १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी यावर्षीच्या टी-२० विश्वचषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने केले. या सामन्यात भारतासाठी विराट कोलहीव्यतिरिक्त कोणताही फलंदाजी जास्त धावा करू शकला नाही. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा संघाला चांगली सुरुवात देऊ शकला नाही आणि शून्य धावांवर बाद झाला. तसेच तो पाकिस्तानविरुद्ध शून्य धावा करणाऱ्यांच्या यादीत सामील झाला आहे.
आपण या लेखात अशाच तीन भारतीय खेळाडूंची माहिती घेणार आहोत, जे टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या शून्य धावांवर बाद झाले होते.
टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शून्य धावांवर बाद होणारे ३ भारतीय फलंदाज
३. रोहित शर्मा
टी-२० विश्वचषक २०२१ च्या त्यांच्या पहिल्या सामन्यातच भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदीने या सामन्यात चौथ्याच चेंडूवर सलामीवीर रोहित शर्माला पायचीत पकडले आणि त्याला तंबूत माघारी पाठवले. रोहीत शून्य धावांवर बाद झाला.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मर्यादित २० षटकांमध्ये १५१ धावा केल्या होत्या आणि पाकिस्तानला विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे लक्ष्य एकही विकेट न गमावता आणि १३ चेंडू शिल्लक ठेऊन सहज गाठले. पाकिस्तानने भारताविरुद्ध विश्वचषकात मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला.
२. सुरेश रैना
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ च्या सुपर १० फेरीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १८ षटकांमध्ये ११८ धावा केल्या होत्या आणि भारतासमोर एक सोपे लक्ष्य ठेवले होते. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते आणि पाकिस्तानला जास्त धावा करण्यापासून रोखले होते.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला, तेव्हा संघाची सुरुवत खूपच खराब झाली होती. भारताने २३ धावांपर्यंत त्याचे तीन विकेट्स गमावले होते. दिग्गज फलंदाज सुरेश रैना या सामन्यात पहिल्याच चेंडूवर शून्य धावा करून बाद झाला होता. पाकिस्तानच्या मोहम्मद सामीने त्याला क्लीन बोल्ड केले होते. असे असले तरी, भारतीय संघाने या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवला होता.
१. गौतम गंभीर
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर एकमेव खेळाडू आहे, जो टी-२० विश्वचषकात पाकिस्ताविरुद्ध दोन वेळा शून्य धावांवद बाद झाला आहे. टी-२० विश्वचषक २००७ च्या साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध गौतम गंभीर मोहम्मद असिफच्या गोलंदाजीवर शून्य धावा करून झेलबाद झाला होता. या सामन्यात गंभीरने अवघ्यात तीन चेंडूंचा सामना केला होता. मोहम्मद असिफने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने त्याच्या चार षटकांच्या कोट्यामध्ये अवघ्या १८ धावा दिल्या होत्या आणि चार महत्वाचे विकेट्स घेतले होते.
याव्यतिरिक्त गंभीर २०१२ साली पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शून्य धावा करून बाद झाला होता. या सामन्यात पाकिस्ताने भारताला १२९ धावांचे लक्ष्य दिले होते आणि त्याचा पाठलाग करताला गंभीर भारताच्या डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला होता. तो पाकिस्तानच्या राजा हसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लडने बंद केली बांगला वाघांची डरकाळी; नोंदविला सलग दुसरा विजय
याला म्हणतात खिलाडूवृत्ती! बेन स्टोक्सच्या पुनरागमनाबाबत स्टीव्ह स्मिथने दिली मोठी प्रतिक्रिया
मॉरिसचा धक्कादायक निर्णय; दक्षिण आफ्रिका क्रिकेटला केला रामराम; मात्र निवृत्तीची घोषणा नाही