नवी दिल्ली – क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे सुरुवातीच्या काळात एकच स्वप्न असते, ते म्हणजे राष्ट्रीय संघात खेळता यावे. मात्र, काही खेळाडूंना यापुढे जाऊन देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील मिळते. यातील काही खेळाडू या भुमिकेत यशस्वी होतात. तर, काहींच्या पदरी अपयश येते.
यशस्वी कर्णधार प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात…
भारताचा महान फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर अनेक विक्रमांमुळे चाहत्यांच्या मनात कायम आहे. परंतु एक संघनायक म्हणून सचिन तितका यशस्वी झालेला रेकॉर्डवर दिसत नाही. याउलट सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे सारखे खेळाडू मात्र, यशस्वी कर्णधार म्हणून प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. कारण, यशस्वी कर्णधार नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात.
संघातील कर्णधाराची भुमिका नेहमीच महत्वाची असते….
भारतीय संघातील अनेक खेळाडूंना वेळोवेळी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यातील काही खेळाडूंनी दिर्घ कालावधीपर्यंत संघाचे नेतृत्व केले. तर काही खेळाडूंची कर्णधार म्हणून कारकिर्द अतिशय मर्यादीत होती. संघाच्या कर्णधाराची प्रत्येक मालिका आणि सामन्यातील भूमिका महत्वाची असते. त्यातही महत्वाचे म्हणजे कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघाने मिळवलेल्या विजयाची टक्केवारी नेहमीच तपासली जाते.
या लेखात आपण भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलेल्या काही कर्णधारांची यादी पाहणार आहोत. विशेष म्हणजे या सर्व कर्णधारांनी त्यांच्या नेतृत्वात संघाला फक्त विजयच मिळवून दिला असल्याने त्यांच्या नावावर शंभर टक्के विजय असाच विक्रम कायम राहिलेला आहे.
३. अनिल कुंबळे (१ सामन्यात विजय)
जम्बो या नावाने क्रिकेट जगतात परिचित असलेला भारताचा पुर्व खेळाडू आणि महान गोलंदाज अनिल कुंबळे हा देखील या यादीत आहे. अनिल कुंबळे याने आपल्या कारकिर्दित फक्त एकदाच भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व केले होते. ज्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. २००२ मध्ये चेन्नई येथे इंग्लंडच्या संघाविरुद्ध झालेला सामना, अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळण्यात आला होता. जो सामना भारताने ४ विकेट राखुन जिंकला. यानंतर मात्र अनिल कुंबळेला एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. कसोटी संघात मात्र तो दिर्घकाळ कर्णधार राहिलेला आहे.
२. गौतम गंभीर (६ पैकी ६ सामने)
अनिल कुंबळे प्रमाणेच गौतम गंभीर हा देखील भारताच्या एकदिवसीय संघाचा पुर्णवेळ कर्णधार कधीही नव्हता. त्याला दोनवेळा संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मात्र, गंभीरने या संधीचे सोने केले. एकदा महेंद्र सिंगच्या अनुपस्थित २०१० मध्ये न्युझीलंड संघासोबत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या पाचही सामन्यात भारताचे नेतृत्व गौतम गंभीरने केले होत आणि सर्व सामन्यात संघाला विजयी केले होते. तसेच दुसऱ्यांदा वेस्ट इंडीजसोबत एका सामन्यासाठी गंभीर कर्णधार राहिला होता. तो सामनाही भारताने आपल्या खिशात घातला होता. एकंदरीत सहा एकदिवसीय सामन्यात गंभीर कर्णधार होता. जे सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.
३. अजिंक्य रहाणे (३ पैकी ३ सामन्यात विजय)
मुंबईकर अजिंक्य रहाणेची एकदिवसीय संघातील कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. त्यातही त्याने संघाचा कर्णधार म्हणून यशस्वी भुमिका निभावली आहे. २०१५ मध्ये झिम्बाम्ब्वे दौऱ्यावर भारतीय संघ गेला असता, एकदिवसीय सामन्यांमध्ये रहाणेने संघाच्या नेतृत्वाची धुरा संभाळली होती. तसेच या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजय प्राप्त केला होता. रहाणेला त्यानंतर कधीच एकदिवसीय सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्याच्या खात्यावर आजही शंभर टक्के विजय प्राप्त केल्याची नोंद आहे.