भारतीय क्रिकेटमध्ये नेहमी मैदानावर प्रेक्षकांची गर्दी पहायला मिळते. हा केवळ भारतीय संघाच्या कामगिरीचा परिणाम आहे, की चाहत्यांकडून त्यांना इतके प्रेम मिळत आहे. लहान शहरापासून ते मोठ्या शहरापर्यंत भारतीय संघाचे चाहते प्रत्येक ठिकाणी पहायला मिळतात. खेडेगावातील चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहणे थोडे कठीण होते. परंतु ते देखील एक दिवसापूर्वीच शहरात जाऊन आपली सोय करत सामना पाहण्याचा आनंद घेतात.
भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये क्रिकेट स्टेडियम आहेत. काही असेही राज्य आहेत, जिथे ३ किंवा त्यापेक्षा अधिक स्टेडियम आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातचे नाव यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाऊ शकते. तरी रांची, धरमशाला आणि रायपूरचे स्टेडियमदेखील नवीनच आहेत. काही स्टेडियम असेही आहेत, जिथे नवीन स्टेडियम तयार करण्यात आले आहेत. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम याचे उदाहरण आहे. नागपूर येथील विदर्भ क्रिकेट ग्राऊंडदेखील नवीनच तयार करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त इतरही अनेक स्टेडियम असे आहेत, ज्यांमध्ये सुधारणा झाली आहे. यादरम्यान अनेक स्टेडियम असेही आहेत, जिथे वर्षानुवर्षे क्रिकेटचे सामनेच झाले नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, तर ते स्टेडियम एकप्रकारे विसरल्यासारखेच आहेत. १० ते १५ वर्षांचा काळ लोटल्यानंतरही तिथे एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. नवीन दर्जेदार मैदानांमुळे ही मैदाने एकप्रकारे पडद्याआड गेली आहेत. यांतील ३ निवडक स्टेडियमचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे, जिथे मागील १० वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यानंतरही तिथे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.
१० वर्षांपासून एकही सामना न खेळलेले ३ स्टेडियम- 3 Indian Cricket Stadiums where no match played from 10 years
कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर
ग्वाल्हेर येथील कॅप्टन रूप सिंग स्टेडियम (Captain Roop Singh Stadium, Gwalior) हे तेच स्टेडियम आहे, जिथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जागतिक वनडे क्रिकेटमधील पहिले नाबाद द्विशतक ठोकले होते. येथे २४ फेब्रुवारी २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सचिनने हा कारनामा केला होता. त्यानंतरपासून ग्वाल्हेरच्या या स्टेडियमवर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यात आलेला नाही. या स्टेडियमच्याऐवजी आता इंदोरमध्ये सामन्यांचे आयोजन केले जाते. तर या स्टेडियमकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कीनन स्टेडियम, जमशेदपूर
जमशेदपूर येथील कीनन स्टेडियमवर (Keenan Stadium, Jamshedpur) शेवटचा वनडे सामना २००६ साली भारत आणि इंग्लंड संघात खेळण्यात आला होता. त्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला ५ विकेट्सने नमवले होते. यानंतर इथे आतापर्यंत कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. रांची येथे स्टेडियम बनल्यानंतर या स्टेडियमकडे दुर्लक्ष करण्यात आले. अनेक क्रीडा प्रेमींना कदाचित हे माहितही नाही, की शेवटी त्या स्टेडियमवर सामना केव्हा खेळण्यात आला होता.
बरकतुल्लाह खाँ स्टेडियम, जोधपूर
जोधपूर येथील बरकतुल्लाह खाँ स्टेडियममध्ये (Barkatullah Khan Stadium, Jodhpur) शेवटचा सामना होऊन १८ वर्षे झाली आहेत. या स्टेडियमवर २००२ साली भारत आणि वेस्ट इंडिज संघात वनडे सामना खेळण्यात आला होता. भारतीय संघाने तो सामना ३ विकेट्सने जिंकला होता. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमला अधिक प्राधान्य दिल्यामुळे जोधपूरच्या या स्टेडियमकडे दुर्लक्ष झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम असूनही या स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन केले जात नाही.