भारतात क्रिकेट महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातही विश्वचषकाला खूप महत्त्व दिले जाते. साल १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर पुढे २८ वर्षांच्या कालावधीनंतर भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने श्रीलंकाला पराभूत करत, हा कारनामा केला होता. त्या यशामध्ये जेवढा अनमोल वाटा धोनीचा होता. तेवढाच भारतीय संघातील इतर खेळाडूंचाही होता.
त्यावेळी भारतीय संघातील काही खेळाडू दमदार प्रदर्शन केल्यानंतरही पुढे संघाचा भाग राहिले. मात्र, असेही काही खेळाडू होते, ज्यांची कारकिर्द २०११च्या विश्वचषकानंतर संपुष्टात आली.
३ भारतीय खेळाडू ज्यांची कारकिर्द २०११च्या विश्वचषकानंतर संपुष्टात आली. 3 Indian Players Who’s Career Ended After 2011 World Cup
१. मुनाफ पटेल
मुनाफ पटेल या भारतीय वेगवान गोलंदाजाला २०११च्या विश्वचषकात खेळण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी ३२.०९च्या सरासरीने त्याने ८ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा ५.३६ इतका होता. यात त्याच्या एका सामन्यातील ४८ धावा देत ४ विकेट्स घेण्याच्या गोलंदाजी कामगिरीचाही समावेश होता. मात्र, त्यानंतर मुनाफला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. २००६मध्ये भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या मुनाफने त्याचा शेवटचा वनडे सामना सप्टेंबर २०११ला इंग्लंडविरुद्ध खेळला. तो त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनादेखील होता. मुनाफने त्याच्या वनडे कारकिर्दीत ७० वनडे सामन्यात ४.९५च्या इकोनॉमी रेटने ८६ विकेट्स घेतल्या होत्या.
२. यूसुफ पठाण
यूसुफ पठाण हा भारतीय संघातील दमदार खेळाडू होता. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये पारंगत होता. मात्र, २०११सालच्या विश्वचषकानंतर तो संघातून अचानकच बाहेर झाला. यूसुफने संपू्र्ण विश्वचषकात ६ सामन्यात एकूण ७४ धावा आणि १ विकेट घेतली होती. त्यानंतर त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च २०१२ला खेळला. यूसुफने त्याच्या वनडे कारकिर्दीत एकूण ५७ सामने खेळले. दरम्यान त्याने ११३.६च्या स्ट्राईक रेटने ८१० धावा केल्या होत्या. शिवाय, ५.४९च्या सरासरीने ३३ विकेट्स घेतल्या होत्या. युसूफने शुक्रवारी(२६ फेब्रुवारी) निवृत्तीची घोषणा केली. त्याचा छोटा भाऊ इरफान देखील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
३. एस श्रीसंत
भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतला २०११च्या विश्वचषकात जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. तो केवळ २ सामन्यात संघातील ११ जणांमध्ये सामाविष्ट होता. यावेळी त्याने ८.०७च्या इकोनॉमी रेटने १०५ धावा देत एकही विकेट घतेली नव्हती. २००५मध्ये आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या श्रीसंतने २ एप्रिल २०११ला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. हाच त्याचा शेवटचा वनडे सामना ठरला. त्याने वनडे कारकिर्दीत एकूण ५३ सामन्यात ७५ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याच्या ५५ धावा देत ६ विकेट्स घेण्याच्या कामगिरीचा समावेश होता. श्रीसंतने अजून निवृत्तीची घोषणा केली नसून त्याने २०२३ विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनच्या अखेरच्या वनडेत खेळलेले ११ खेळाडू सध्या करतात तरी काय?
लॉकडाऊनच्या काळात केली कठोर मेहनत, आता मिळत आहेत फळे! अश्विनने उलगडले ४०० बळींमागील रहस्य
ब्रेकिंग! भारताच्या २ विश्वविजेत्या संघाचा भाग असलेला युसुफ पठाण क्रिकेटमधून निवृत्त