क्रिकेटचे मैदान गाजवणारे अनेक दिग्गज क्रिकेटपटू इतिहासात होऊन गेले आहेत. तसेच त्याच मैदानावर आपल्या पंचगिरीने स्वतःचा नावलौकिक करणारेही अनेक पंच क्रिकेटच्या इतिहासात होऊन गेले आहेत, अथवा सध्या कार्यरत आहेत.
“मैदानावर खेळाडू प्रमाणेच पंचांची भूमिका देखील महत्वाची असते. त्यातही एखादा खेळाडू जसा आपल्या कामगिरीने सामन्याचा निकाल बदलू शकतो, तसेच पंचाचा एखादा योग्य-अयोग्य निर्णय देखील सामन्याचे रुपडे पालटू शकतो.”
क्रिकेटमधील प्रत्येक सामन्यात प्रत्यक्ष मैदानावर 2 आणि मैदानाबाहेर 1, असे एकूण 3 पंच असतात. याचबरोबर टीव्ही पंचदेखील असतात. संपूर्ण खेळावर नियंत्रण ठेवणे आणि खेळ नियमांमध्ये सुरु ठेवण्याचे महत्वाचे कार्य, या पंच मंडळींना करावे लागत असते. क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात असे अनेक पंच होऊन गेले आहेत, ज्यांनी आपल्या प्रामाणिकतेने आणि अचुकतेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु क्रिकेटच्या इतिहासात काही पंच असेही होऊन गेलेत, ज्यांच्या खराब कामगिरी आणि निर्णयांमुळे काही संघाचेच बारा वाजले होते.
“योग्य आणि अचुक निर्णय देणाऱ्या अंपायरला तर सर्वजण अगदी आदराने लक्षात ठेवतात. मात्र, मोक्याच्या ठिकाणी चुकीचे निर्णय देऊन एखाद्या संघाचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरलेल्या पंचाला तो संघच काय, कोणताही क्रिकेटप्रेमी सहजासहजी विसरत नाही.”
आजच्या या लेखात आपण असे 3 पंच आणि काही सामन्यांमधील त्यांची कामगिरी पाहणार आहोत, ज्यात त्यांनी अगदी मोक्याच्या ठिकाणी चुकीचे निर्णय देत समोरील संघाला नुकसान सहन करायला लावले होते. त्यातील काही पंच आणि सामने असाही होते, ज्यात प्रत्यक्ष भारतीय संघ आणि सहकाऱ्यांना चुकीच्या निर्णयाचा फटका बसला होता.
#३ – मार्क बेंसन (इंग्लंड)
या अंपायरचे नाव घेताच कित्येक भारतीय क्रिकेट प्रेमींना आजही राग अनावर होतो. बेंसनने आपल्या क्रिकेट पंच कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी 2008 साली सिडनी येथे केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कित्येक सामन्यांमध्ये मार्क बेंसन यांनी तेव्हा कित्येक चुकीचे आणी भारतीय संघाविरुद्धचे निर्णय दिले होते.
सिडनी येथे झालेल्या एका सामन्यात भारतीय फलंदाज सौरव गांगुलीचा झेल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटींगने पकडला होता. मात्र, या झेलाबाबत पंच मार्क बेसनला निश्चित खात्री नव्हती. त्यावेळी बेंसनने हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे न करता झेल घेणाऱ्या रिकी पाँटींगकडेच निर्णयाची खात्री करुन आपला निर्णय दिला होता.
अशाच प्रकारचा चुकीचा निर्णय मार्क बेंसनने राहुल द्रविडबाबत देखील दिला होता. बेंसनने त्या संपूर्ण मालिकेत असे पाच ते सहा निर्णय चुकीच्या पद्धतीने दिले होते, ज्याचा फटका भारतीय संघाला सहन करावा लागला होता. त्यामुळे आजही या पंचाचे नाव घेतल्यावर कित्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते.
बेेंसन यांनी ११८ आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली. एक क्रिकेटपटू म्हणून ते इंग्लंडकडून १ कसोटी व १ वनडे सामनाही खेळले होते.
#२ – अशोक डी सिल्वा (श्रीलंका)
अशोक डी सिल्वा या पंचाला देखील काही सामन्यांमध्ये त्यांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे लक्षात ठेवले जाते. त्यातही श्रीलंकेच्या या अंपायरने भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेत भारताविरोधात दिलेले आश्चर्यकारक निर्णय क्रिकेट रसिकांना चक्रावून टाकणारे होते.
2002 साली पंच डी सिल्वा यांनी सौरव गांगुलीला वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात अतिशय चुकीच्या पद्धतीने बाद घोषीत केले होते. त्याशिवाय अशोक डी सिल्वा यांच्या अशाच खराब पंचगिरीचा अनेक संघांनाही 2011 च्या विश्वचषकात फटका बसला होता. अशोक डिसिल्वा यांनी १८२ सामन्यात पंचगिरी केली तर २८ सामने ते खेळाडू म्हणून श्रीलंकेकडून खेळले.
“मैदानावरील खराब कामगिरीनंतर अशोक डि सिल्वा यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पंचांच्या एलिट पॅनेलमधून काढून टाकले होते. पुढे पंच म्हणूनही त्यांना नाकरण्यात आले.”
#१ – स्टीव बकनर (वेस्ट इंडिज)
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने जर त्याच्या कारकिर्दीत काही शतके कमी साकारली असतील, तर त्यामागे एक कारण वेस्ट इंडीजचे पंच स्टीव बकनर हे देखील आहेत. या अंपायरने सचिन तेंडुलकरला कित्येक वेळा अतिशय चुकीचा निर्णय देत, बाद घोषीत केले होते. त्यातही या लेखात ज्या अंपायरचे नाव आपण यादीत सर्वात अगोदर घेतले, त्या मार्क बेंसन सोबतच स्टीव बकनर हे देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2008 साली सह पंच म्हणून होते. त्यामुळे तेव्हाच्या परिस्थितीची क्रिकेट रसिकांनीच कल्पना केलेली बरी.
गमतीची गोष्ट म्हणजे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी करणाऱ्या पंचात बकनर ३०९ सामन्यांसह तिसरे आहेत.
“क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अयशस्वी आणि चुकीचे निर्णय देणारा पंच म्हणूव स्टीव बकनर यांना ओळखले जाते. त्यांच्या कारकिर्दीतील चुकीच्या निर्णयांची यादी तशी मोठीच आहे. त्यात फक्त सचिन तेंडूलकरच नाही, तर इतर देशांच्या खेळाडूंनाही फटका सहन करावा लागला आहे.”